Thursday, 26 October 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 26.10.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२६ ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं ग्राहक संरक्षणावरच्या जागतिक परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. ग्राहक संरक्षणाच्या बाबतीत संयुक्त राष्ट्रांच्या नियमांना लागू करण्यासंदर्भात आशियाई राष्ट्रात केलेल्या उपाययोजनांसदर्भात या संमेलनात चर्चा करण्यात येणार आहे. आर्थिक सेवा आणि ई कॉमर्सच्या ग्राहकांसमोर असलेल्या समस्यांवरही विचार करण्यात येणार आहे.   

****

छत्तीसगढ मधल्या राजनंदगाव जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी मारले गेले. कोपेनकडका जंगलामध्ये काल रात्रीच्या सुमारास ही चकमक झाली. या तीन नक्षलवाद्यांवर १३ लाखांचं बक्षिस होतं. घटनास्थळावरुन हत्यारं आणि बारुद जप्त करण्यात आलं. 

****

औरंगाबाद इथल्या सार्वजनिक बांधकाम विभगातला तत्कालीन लेखाधिकारी, राजेश शहारे आणि त्याची पत्नी गीता शहारे यांना बेहिशोबी मालमत्ता संपादीत केल्या प्रकरणी, औरंगाबादच्या विशेष न्यायालयानं तीन वर्ष सक्त मजुरी आणि तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बेहिशोबी मालमत्ता संपादीत केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तत्कालीन उपाधिक्षकांनी केलेल्या चौकशीत शहारे दांपत्य दोषी आढळून आलं होतं.

****

जामिनावर मुक्त झालेल्या आरोपीच्या हजेरीची नोंद करण्यासाठी एक हजार रूपयांची लाच मागणाऱ्या गंगापूर पोलिस ठाण्याचा उपनिरिक्षक भागवत मुठाळ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं. फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीला न्यायालयानं जामिनावर मुक्त करत ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. या हजेरीची नोंद करण्यासाठी प्रत्येक वेळी दोन हजार रूपये देण्याची मागणी मुठाळ यानं केली होती.

****

शेगाव ते पंढरपूर हा पालखी मार्ग २०१८ पर्यंत पूर्ण करुन, मराठवाड्याचा रस्ते विकास साधला जाईल, असं प्रतिपादन जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. या महामार्गाशी संबधीत सर्व अधिकाऱ्यांच्या उच्यस्तरीय बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. विदर्भातल्या भाविकांना पंढरपूर पर्यंत कमी वेळेत पोहोचता यावं यासाठी लोणार-परतूर-माजलगाव मार्गे शेगाव ते पंढरपूर या मार्गाला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूरी दिली होती.

****

No comments: