आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
३० ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
लोहपुरुष सरदार
वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभर आज `राष्ट्रीय एकता दिवस' साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ
कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र
मोदी यांनी आज नवी दिल्ली इथल्या पटेल चौकातल्या सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्प
अर्पण करत आदरांजली वाहिली.
यानिमित्त आज देशभरात एकता दौडचं आयोजन
करण्यात आलं. पंतप्रधानांनी नवी
दिल्लीत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर
झालेल्या मुख्य कार्यक्रमात 'एकता दौड'ला हिरवा झेंडा
दाखवला.
मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं आयोजित एकता
दौडला राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
झेंडा दाखवला.
****
औरंगाबाद शहरातही आज सकाळी क्रांती
चौकातून एकता दौडचं आयोजन करण्यात आलं. लातूर इथं अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांनी एकतेची
शपथ दिली.
जालना इथंही पालकमंत्री बबनराव लोणीकर
यांनी हिरवा झेंडा दाखवून एकता दौडला सुरुवात केली. नांदेड इथं जिल्हाधिकारी अरूण डोंगरे
यांनी एकता दौडच्या समारोप प्रसंगी उपस्थितांना शपथ दिली. ठिकठिकाणच्या या आयोजनांमध्ये
विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.
****
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज ३३
वी पुण्यतिथी. यानिमित्तानं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरील संदेशाच्या
माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे. आज देशभरात अनेक कार्यक्रमांच्या आयोजनतून इंदिरा
गांधी यांना अभिवादन करण्यात येत
आहे.
****
कार्तिकी एकादशी आज साजरी होत आहे.
पंढरपूर इथं आज पहाटे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय
महापूजा करण्यात आली. दर्शनबारीत उभ्या असलेल्या वारकऱ्यांपैकी कर्नाटकातल्या विजापूर
जिल्ह्याच्या हडगल्ली इथले बळीराम चव्हाण आणि शिनाबाई चव्हाण या वारकरी दाम्पत्याला
महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. औरंगाबाद नजिक प्रति पंढरपूर इथं भाविकांनी विठ्ठल
रखुमाईच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी केली आहे.
****
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
निवडणुकीत सभापती आणि उपसभापती पदावर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले असून,
भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या गटाची सरशी झाली आहे. शिवसेनेला मात्र या निवडणुकीत
पराभव पत्करावा लागला.
****
No comments:
Post a Comment