Tuesday, 24 October 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 24.10.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 October 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

सरकारनं गहू आणि दाळींच्या किमान हमी भावात वाढ केली आहे. गव्हाच्या हमी भावात आता क्विंटलमागे एकशे दहा रुपयांनी वाढ होऊन, तो एक हजार ७३५ रुपये एवढा असेल, तर दाळींच्या हमीभावात क्विंटलमागे दोनशे रुपये वाढ करण्यात आली आहे. यामुळे हरबरा दाळीचा हमीभाव प्रतिक्विंटल चार हजार दोनशे रुपये तर मसूर दाळीचा भाव प्रतिक्विंटल चार हजार एकशे पन्नास रुपये झाला आहे.

****

राज्यात अन्नप्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया धोरण लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे कृषी उत्पादकांना स्थानिक ते थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत बाजारपेठ उपलब्ध होणार असून, पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी थेट मतदान घेण्यास राज्य मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मान्यता दिली. यासाठी नगरपरिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम - १९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला.
बंद पडलेल्या तसंच आजारी शासकीय दूध योजना आणि शीतकरण केंद्रांचं खाजगी-सार्वजनिक सहभागाच्या तत्त्वावर पुनरुज्जीवन करून, त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यासह ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो - ५ मार्ग तसंच हायब्रिड ॲन्युईटी तत्त्वावर राज्यातल्या रस्ते तसंच पुलांची सुधारणा करण्याच्या प्रस्तावात बदलास मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची अंमलबजावणी, निधी उभारणी आणि इतर कामांसाठी रस्ते विकास महामंडळ - एमएसआरडीसीची दुय्यम कंपनी म्हणून नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे लिमिटेड या नावाने विशेष उद्देश वाहन कंपनी स्थापन करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मान्यता दिली.

****

राज्यातल्या पाच हजार शासकीय इमारतींमध्ये ऊर्जा बचतीसाठी उपयुक्त उपकरणं बसवण्याकरता केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतली एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिस लिमिटेड - E E S L आणि राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते. येत्या आठ महिन्यात राज्यातली दीड हजार शासकीय कार्यालयं ऊर्जा बचतीसाठी सक्षम करण्यात येणार असून, त्याद्वारे दरमहा सुमारे ११५ कोटी रुपयांची वीज बिलाची बचत होणार असल्याचं, पाटील यांनी सांगितलं.

या उपक्रमासाठी ईईएसएल सुमारे ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या वीज गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि वीजचोरी पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. यासाठी २८५ जणांचं पथक तैनात करण्यात आलं असून, हे पथक घरोघरी जाऊन विद्युत मीटर, विद्युत भार तपासणी करणार आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात कृषीपंपाची दोन हजार ३६४ कोटी रूपये थकबाकी असून या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येत असल्याचं गणेशकर यांनी सांगितलं.

****

वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात सुरुवातीला पावसानं ओढ दिल्यानं, तर सुगीच्या काळात परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी रिसोडचे आमदार अमित झनक यांनी केली आहे. जिल्ह्यात बाजार समित्यांचे व्यवहार दिवाळीसुटीनंतर कालपासून सुरू झाले, मात्र व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी शेतमाल खरेदी करत असल्यानं, हमीभाव खरेदी केंद्रं सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

****

उस्मानाबाद इथं सोयाबीनचं हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. तालुका प्रमुख दिलीप जावळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.

****

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात नव्या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन परीक्षा पद्धतीचा समावेश होणार आहे. कुलगुरू डॉ देवानंद शिंदे यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली.

****

सोलापूर जिल्ह्यात यंदा सरासरी १०७ टक्के पाऊस पडला आहे. यामध्ये सात तालुक्यात शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला. उर्वरित चार तालुक्यांनी पावसाची सरासरी ओलांडली नसली तरी या ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...