Monday, 23 October 2017

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 23.10.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 October 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबण्यासाठी राज्यातलं सिंचनक्षेत्र वाढण्याची आवश्यकता केंद्रीय परिवहन तसंच जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर इथं विविध विकासकामांचं भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात सध्या केवळ १५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली येतं, हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. येत्या काळात ‘मागेल त्याला वीजपुरवठा’ देण्याचा सरकारचा निश्चय असल्याचं गडकरी म्हणाले. नांदेड जिल्ह्यातल्या रस्त्यांचं चित्र बदलण्यासाठी साडेआठ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प दिले असून, जिल्ह्यातल्या चार मार्गाबरोबरच सारखणी-मांडवी-आदिलाबाद या ४५ किमी अंतराच्या रस्त्याचं काम लवकरच सुरु करण्यात येईल, अशी घोषणाही गडकरी यांनी केली.

****

माजी ेंद्रीय कृषी मंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे दिलदार विरोधक असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पवार यांचा आज अमरावती इथं जाहीर नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयातही पवार यांनी राज्य सरकारला योग्य सल्ला देण्याचं काम केलं, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

दरम्यान, या सत्कार समारंभापूर्वी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना पवार यांनी राज्य सरकारने केलेली कर्जमाफी नियोजनशून्य पद्धतीने झाली असल्याची टीका केली.ज्या शेतकऱ्यांनी कर्जच घेतले नाही, अशांना कर्जमुक्तीची पत्रे देण्यात आल्याचं पवार म्हणाले. सरकारनं पंधरा दिवसांत जर या त्रुटीत सुधारणा केली नाही तर, पुढची दिशा ठरवावी लागेल असा इशारा त्यांनी दिला.

****

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्यासह अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्ते सहभागी झाले होते. सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला हमी भाव, परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची तत्काळ भरपाई देण्यात यावी, भारनियमन बंद करावं, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.का महिन्यात जर सरकारने या मागण्या मान्य केल्या नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा धनंजय मुंडे यांनी यावेळी दिला.

****

सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावीत, या मागणीसाठी नांदेड इथं शिवसेनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पक्षाच्या वतीनं आपल्या मागण्यांचं निवेदन निवासी जिल्हाधिकारी जयराज कारभारी यांना सादर करण्यात आलं.

****

ठाणे जिल्ह्यात फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण तसंच डोंबिवली इथले पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा एकूण बारा जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांविरोधात गुन्हे दाखल झाल्यानं, हे सर्व जण स्वत:हून पोलिसात दाखल झाले होते.

****

शेगाव ते पंढरपूर या पालखी मार्गाची गुणवत्ता आणि दर्जा उत्तम राहील याची दक्षता घेऊन हा मार्ग जलदगतीने पूर्ण करावा, असे निर्देश जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दोन हजार कोटी रुपये खर्चून हा पालखी मार्ग तयार करण्यात येणार आहे. या रस्त्याची कामं आता प्रत्यक्षात सुरू झाली असून, महामार्गामुळे सहा लाख वारकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या मार्गावर वारकऱ्यांना पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहं, धर्मशाळा आदी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं.

****

न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेण्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आज मुंबईत वार्ताहर परिषदेत संघाची घोषणा केली. या संघात मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर आणि हैदराबादचा उदयोन्मुख गोलंदाज मोहम्मद सिराज याचा समावेश करण्यात आला आहे. या मालिकेतल्या पहिल्या सामन्यानंतर गोलंदाज आशिष नेहरा निवृत्त होत असल्यानं, त्याचा फक्त पहिल्या सामन्यासाठीच संघात समावेत करण्यात आला आहे. उर्वरित संघ याप्रमाणे -

विराट कोहली कर्णधार, रोहित शर्मा उपकर्णधार, एम एस धोनी, शिखर धवन, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, केएल राहुल, मनीष पांडे, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, आणि भुवनेश्वर कुमार. एक, चार आणि सात नोव्हेंबरला अनुक्रमे दिल्ली, राजकोट आणि तिरुवनंतपुरम् इथं हे सामने खेळवण्यात येणार आहेत.

श्रीलंकेसोबतच्या आगामी कसोटी मालिकेतल्या तीन पैकी पहिल्या दोन सामन्यांसाठीही संघाची घोषणा यावेळी करण्यात आली.

****

No comments: