Tuesday, 31 October 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 31.10.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 OCT. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑक्टोबर २०१७ सकाळी .५० मि.

****

** लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४२वी जयंती; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

** कृषीपंप धारक शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७जाहीर; दंड आणि व्याज माफ

** हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार, महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांचा समावेश करणार- मुख्यमंत्री

** राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संप काळाची भरपाई म्हणून ३६ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय

आणि

** बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फसवणूक प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या सह एकूण २८ जणांविरूध्द गुन्हा दाखल

****

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४२वी जयंती आज राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातल्या ६२३ जिल्ह्यात या निमित्त एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्ली इथल्या मेजर ध्यानचंद मैदानात होणाऱ्या मुख्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. औरंगाबाद शहरातही आज सकाळी क्रांती चौकातून एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाड्यातल्या जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातही एकता दौडसह विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. काही वेळातच सर्व जिल्ह्यांमध्ये एकता दौडला प्रारंभ होणार आहे.

नांदेड विभागातल्या विविध रेल्वे स्थानकावर आज राष्ट्रीय एकता दिवस साजरा होत असून या निमित्त, एकता दिंडी काढण्यात येणार आहे. विविध शाळांचे विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक आणि रेल्वे अधिकारी तसच कर्मचारी या दिंडीत हभाग होतील.

****

वीज बिलांची थकबाकी असलेल्या कृषीपंप धारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७जाहीर केली आहे. या योजनेमध्ये वीजबिलांची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दंड आणि व्याज माफ करून मूळ थकबाकीची रक्कम पाच समान हप्त्यात भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आली असल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

तीस हजार रूपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकांना पाच समान हप्ते तर तीस हजार रूपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांना दहा समान हप्त्यात थकबाकी भरता येणार आहे. चालू वीज बिल नोव्हेंबर २०१७ पर्यंत भरावं आणि त्यानंतर समान हप्त्यातली थकबाकी भरण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी न होणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असं ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाईल आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांचा समावेश केला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारला आज  तीन वर्ष पूर्ण होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर ते काल मुंबईत बोलत होते. हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून नागपूर इथं सुरू होत असून काँग्रेस मधून बाहेर पडलेले, नारायण राणे भाजपच्या कोट्यातून मंत्रीमंडळात येतील असं ते म्हणाले. शिवसेना सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा एकाचवेळी दोन भूमिका घेऊ शकत नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी काही सेना नेत्यांना सरकारच्या प्रत्येक निर्णयाच्या विरोधात बोलण्याची सवय झाली असल्याचं सांगितलं. जनतेला ही बाब आवडत नसल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, गेल्या तीन वर्षात सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आजपासून आठवडाभर आंदोलन करणार आहे.

****

दिवाळीच्या कालावधीत संपावर गेलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय राज्यशासनाच्या वतीनं घेण्यात आला आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्यानं हा पगार कापला जाणार आहे.

चार दिवस पुकारलेला संप आणि त्यामुळे झालेल्या नुकसान भरपाई बाबत नियमानुसार एका दिवसामागे आठ दिवस असा ३६ दिवसांचा पगार कापला जाणार आहे. याबाबतचे आदेश काल परीवहन महामंडळाच्यावतीनं जारी करण्यात आले.

दरम्यान, ही पगार कपात अन्यायकारक असून, एस टी कर्मचारी संघटना मुंबई औद्योगिक न्यायालयाकडे दाद मागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं संप बेकायदेशीर ठरवल्यानंतर एस टी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला होता.

****

राज्यातल्या सुमारे ९६ हजार किलोमीटरच्या रस्त्यावरचे खड्डे येत्या १५ डिसेंबर पर्यंत बुजवण्यात येणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. शासकीय महापूजेनिमित्त पंढरपूर इथं आले असताना काल वार्ताहरांशी ते बोलत होते.

रस्ते बुजवण्याच्या कामासाठी निविदा काढण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या सह एकूण २८ जणांविरूध्द गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

अमरसिंह पंडित यांनी जय भवानी सहकारी साखर कारखान्यासाठी १४ कोटी रूपयांचं कर्ज घेतलं होतं. या कर्जासाठी तारण म्हणून कारखान्याची जमीन  ठेवली होती, मात्र  पंडित यांनी बनावट कागदपत्रं तयार करून एका व्यक्तीला परस्पर ही जमीन साडेतीन लाख रुपयांना विकली. या प्रकरणाबाबत बँकेचे सहव्यवस्थापक आसाराम पिराजी सुर्वे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

समाजातल्या विविध समस्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी जनएकता जनाधार आंदोलनच्या वतीनं काल सायंकाळी देशभरात मशाल मोर्चा काढण्यात आला. औरंगाबाद इथं ही पैठण दरवाजा ते सिटी चौक मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून शेतमालाला हमी भाव द्यावा, आरोग्य सेवेचं खासगीकरण करू नये, शिक्षण क्षेत्रासाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करावी, कामगारांच्या किमान वेतनात वाढ करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात पशु वैद्यकीय विद्यापीठाचं उपकेंद सुरू करण्यात येणार असल्याची माहिती, उस्मानाबादचे सहपालकमंत्री महादेव जानकर यांनी काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली.

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियानामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, या अभियानांतर्गत शेतकऱ्यासाठी काय केलं, याचा ‘उस्मानाबाद पॅटर्न’ संपूर्ण राज्यात राबवण्याचा विचार केला जाईल, असं उस्मानाबादचे  पालकमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं.

****

मराठवाड्यातल्या शेतीला बळ देण्याकरिता एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्याचा मानस असल्याचं प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकलचर यांच्या वतीनं आयोजित विभागीय सीताफळ कार्यशाळेत काल ते बोलत होते.

सीताफळाच्या माध्यमातून चांगलं उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गटशेतीला प्राधान्य द्यावं असं त्यांनी यावेळी केलं.

****

राज्यात कालपासून दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ झाला. काल यानिमित्तं, सरकारी तसंच निमसरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देण्यात आली. कालबाह्य आणि अतिरिक्त प्रक्रिया कमी करून, कामकाजातली पारदर्शकता वाढवल्यास, भ्रष्टाचारावर नियंत्रण आणता येऊ शकेल, असं राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यानिमित्त दिलेल्या आपल्या संदेशात म्हंटलं आहे.

****

शिक्षकांच्या बदलीच्या धोरणा विरुद्ध, बीड जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्यावतीन काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध संघटनांचे पदाधिकारी, आणि  शिक्षक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.  

समाजकल्याण विभागानं विविध योजना करिता मंजूर केलेला निधी, राज्य सरकार इतर कामासाठी वापरत असल्याच्या निषेधार्थ बीड इथं भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काल धरणं आंदोलन करण्यात आलं.

****

वाचनाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षक, अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन,  जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. दोन दिवसीय जालना ग्रंथोत्सवाचं उद्घाटन  पालकमंत्री  लोणीकर यांच्या हस्ते काल करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.  एकाच ठिकाणी अनेक ग्रंथ उपलब्ध करून देणाऱ्या या ग्रंथोत्सवाचा लाभ घेण्याचंही आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****










No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...