Sunday, 22 October 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 22.10.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२२ ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात हजनी करालगुंड भागात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. आज पहाटे ही चकमक सुरु झाली. या परिसरात आणखी दोन दहशतवादी असून, चकमक अद्याप सुरु आहे. चकमकीच्या ठिकाणाहून शस्र जप्त करण्यात आली आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या भावनगर इथं दहेज दोघा नौका परियोजनेचा शुभारंभ करणार आहेत. यामुळे दक्षिण गुजरात क्षेत्र आणि सौराष्ट्रादरम्यान समुद्री मार्गानं एका तासापेक्षा कमी वेळात प्रवास करता येणार आहे. ६१५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

****

देशभरात दुरुस्तीला आलेल्या रेल्वेपुलांचा आढावा घेण्याचा आदेश रेल्वे महामंडळानं घेतला आहे. एकूण पुलांपैकी केवळ २३ पुलांवर वेगमर्यादा लागू केल्याचं लक्षात आल्यानंतर हा आदेश देण्यात आला. उर्वरित पुलांवरुन रेल्वेगाड्या कोणतीही वेगमर्यादा न पाळता धावत असल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू शकतो, असं या आदेशात म्हटलं आहे.   

****

राज्य सरकारनं राबवलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी २५ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार नाही, असं राज्य सहकार विभागाच्या एका वरीष्ठ अधिकार्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. यापूर्वी राज्य सरकारनं जूनमध्ये योजना जाहीर करताना ही रक्कम ३४ हजार कोटी रुपये राहील, असं म्हटलं होतं. कर्जमाफीसाठी पात्रतेचा निकष निर्धारित केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या कमी झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 

****

अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातल्या राजापूर परिसरात घोड नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या चार फायबर बोटी श्रीगोंदा प्रांताधिकारी गोविंद दानेज यांच्या पथकानं उध्वस्त केल्या. घोड नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बोटींसह अंदाजे २० लाख किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

****

बँक खातेधारकांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करणं बंधनकारक असल्याचं, भारतीय रिजर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. या संदर्भात गेल्या काही दिवसांत माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर बँकेनं, हा खुलासा केला.

No comments: