Saturday, 28 October 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.10.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 October 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

जनसामान्यांना जलदगतीनं न्याय मिळण्यासाठी न्यायव्यवस्थेला गती देण्याची आवश्यकता असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते कोची इथं केरळ उच्च न्यायालयाच्या हिरक महोत्सवाच्या समारोपपर भाषणात बोलत होते. तसंच सामान्यांना समजण्यासाठी न्यायालयीन आदेशाची प्रमाणित प्रत स्थानिक भाषेत उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. न्यायव्यवस्थेत डिजिटल तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजही राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली.

****

दारूवर पूर्णपणे बंदी असलेल्या बिहारमध्ये रोहतक जिल्ह्यातल्या दावर या गावांत अवैध दारूच्या सेवनाने चार जणांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. यासंदर्भात कच्छवा पोलिस ठाण्याच्या ठाणेदारास निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती राज्याचे पोलिस उपमहासंचालक मोहम्मद रेहमान यांनी दिली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून चौकशी अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहे.  

****

एच वन बी आणि एल वन व्हिसाची समस्या केवळ अमेरिकेतल्या भारतीय नागरिकांसाठीच त्रासदायक नसून, अमेरिकी अर्थव्यवस्थेला देखील यामुळे अडचणी निर्माण होतील असं परखड मत भारतानं अमेरिकेसमोर मांडल्याचं केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. भारत- अमेरिका द्विपक्षीय व्यापार धोरण मंचाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीयांचं योगदान अमेरिकेसाठी खूप महत्वपूर्ण ठरलं असल्याचंही प्रभू यांनी यावेळी सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३७वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारला ३१ ऑक्टोबर रोजी तीन वर्ष पूर्ण होत असून केंद्र आणि राज्य सरकारनं निर्माण केलेल्या विश्वास आणि विकासाच्या कामाला जनतेनं पाठिंबा दिला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं आज झालेल्या पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावागावात तसंच वॉर्डात जाऊन आपल्या सरकारनं केलेली विकासकामं जनतेपर्यंत पोहोचवावीत, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. सरकारनं केलेली कामं सांगताना कार्यकर्त्यांनी लोकांशी संवाद साधा, असा संदेश प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिला.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथं झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या खटल्याच्या अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. कोपर्डी इथल्या पीडित मुलीच्या बाजूनं विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी हा खटला चालवला. न्यायालयात आज उज्वल निकम यांचा अंतिम युक्तिवाद संपला असून, लवकरच या खटल्याचा निकाल देखील लागणार आहे. सरकारी पक्षातर्फे पाच महिन्यात ३१ साक्षीदार तपासण्यात आले आणि २४ पुरावे सादर करण्यात आले आहेत. त्यानंतर आरोपींच्या वतीनं युक्तिवाद सुरु झाला आहे.

****

नववं आखिल भारतीय मराठी गजल संमेलन नवी मुंबईतल्या वाशी इथं येत्या ११ आणि १२ नोव्हेंबरला होणार आहे. गजल सागर प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या या संमेलनाचं उद्घाटन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ गजलकार मधुसूदन नानिवडेकर या संमेलनाचे अध्यक्ष असतील.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या कामरगाव शिवारात पोलिसांनी दहा लाख रुपयांचं चंदन पकडलं असून, दोन आरोपींना अटक केली आहे. एकूण १६ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये आंतरराज्य टोळीचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या आठ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल आज जाहीर झाले. आठ पैकी चार ग्रामपंचायती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या, तर तीन ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात गेल्या आहेत. एका ग्रामपंचायतींवर सरपंच पदासाठी भाजप-राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार विजयी झाला आहे.

****

१७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड आणि स्पेन या संघादरम्यान आज कोलकाता इथं होणार आहे. रात्री आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तर स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ब्राझील आणि माली या संघांमध्ये सामना सुरु आहे.

****

३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढच्या वर्षी चार नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. गोव्याच्या क्रीडा प्राधिकरणानं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या तारखा निश्चित केल्या आहेत. या स्पर्धा नोव्हेंबर २०१६ मध्ये होणार होत्या, मात्र विधानसभा निवडणुकांमुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तारखा पुढे ढकलण्याची विनंती गोवा प्रशासनानं भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत केली होती.

****

No comments: