आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२३ ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
केंद्र
सरकारने देशभरातल्या चारशे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची मान्यता रद्द केली आहे. विद्यार्थ्यांना
व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक सुविधा तसंच प्रशिक्षकांचा या संस्थांमध्ये
अभाव आढळून आल्यानं, ही कारवाई करण्यात आल्याचं, कौशल्य आणि उद्योजकता विकास विभागाचे
संयुक्त सचिव राजेश अग्रवाल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला
सांगितलं. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या गुणवत्ता निकषांचं मूल्यांकन केलं
जात असून, संस्थांसाठी स्वयंमूल्यांकनाची व्यवस्था केली असल्याचंही अग्रवाल यांनी सांगितलं.
****
मुंबईत
आज एका रेल्वेच्या चालकाचा दुसऱ्या रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला. सौराष्ट्र जनता एक्सप्रेस
ही गाडी मागून येणाऱ्या ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसला पुढे जाऊ देण्यासाठी बोईसर इथं थांबली
असताना, गाडीचे चालक उमेशचंद्र आर हे इंजिनची पाहणी करत होते, त्याचवेळी मागून येणाऱ्या
ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला.
****
नागपूर इथं पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या २१ जणांना काल अटक केली.
त्यात काँग्रेस पक्षाचे नगरसेवक रमेश पुणेकर यांचा समावेश आहे. पुणेकर यांना काही वर्षांपूर्वीही
याच कारणासाठी अटक करण्यात आली होती. काल अटक केलेल्या उर्वरित जुगाऱ्यांमध्ये शहरातल्या
प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचा समावेश असून, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तीन लाख ६२ हजार
रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
****
अहमदनगर
शहरातल्या कुख्यात गुन्हेगारी टोळीला पोलिसांनी काल नाशिक इथं पाथर्डी फाटा परिसरातून
अटक केली. यामध्ये शाहरूख रज्जाक शेख आणि त्याच्या दोन साथीदारांचा समावेश आहे. त्यांच्या
ताब्यातून दोन परदेशी बनावटीची पिस्तुलं, ४० काडतुसं, चार मोबाईल आणि एक दुचाकी जप्त
करण्यात आली.
****
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीची रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा
होणार आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली. बँकांना
दिवाळीच्या सुट्या असल्यामुळे
ही रक्कम बॅंक खात्यात जमा व्हायला वेळ
लागल्याचं त्यांनी सांगितलं.
No comments:
Post a Comment