Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 OCT. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य
करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगाल सरकारनं सर्वोच्च न्यायालयात
दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं प्रश्न उपस्थित केला आहे. सांघिक शासन पद्धतीत
एक राज्य संसदेच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका कशी काय दाखल करु शकतं, असं न्यायालयानं म्हटलं आहे. दरम्यान, यासंदर्भात केंद्र सरकारनं चार आठवड्यात
उत्तर द्यावं, असंही न्यायालयानं सांगितलं आहे.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्या
प्रकरणाची सुनावणी परत सुरु करण्याच्या विरोधात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात
याचिका दाखल केली आहे. ७० वर्षांपूर्वी झालेल्या या हत्येच्या प्रकरणाचा परत एकदा तपास
करण्याची मागणी करणारी याचिका एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल केली आहे.
****
जम्मू काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्यावरून काँग्रेस
नेते पी चिदंबरम यांनी केलेल्या विधानावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कडक टीका केली आहे.
दहशतवादाविरोधात सरकार कडक उपाययोजना करत असताना, चिदंबरम
यांनी अत्यंत चुकीचं
विधान केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ते शिमला इथं आकाशवाणीच्या बातमीदारांशी बोलत होते. संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, दूरसंवाद आणि चलन वगळता, अन्य सर्व क्षेत्रातले हक्क जम्मू काश्मीरची जनता बजावत असताना, आणखी कोणते हक्क चिदंबरम यांना अपेक्षित आहेत, असा सवाल
जेटली यांनी यावेळी केला.
****
गुजरात इथं अटक करण्यात
आलेल्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या संशयित दहशतवाद्याबरोबर आपला संबंध
असल्याच्या कथित आरोपाची निःपक्षपाती चौकशी व्हावी, अशी
मागणी काँग्रेस पक्षाचे
ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केली
आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र
लिहून पटेल यांनी ही मागणी केली आहे. सुरत
इथं इस्लामिक स्टेटच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक झाल्यानंतर
पटेल यांच्याशी त्यांच्या कथित संबंधांवरून
राजकीय वादळ निर्माण झालं आहे. या प्रकरणी आपलं आपलं नाव जोडून, आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याचं पटेल यांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
इटलीचे पंतप्रधान पाओलो जेंटीलोनी
भारत दौऱ्यावर आले असून, राष्ट्रपती भवनात आज त्यांचं समारंभपूर्वक स्वागत करण्यात
आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेंटीलोनी यांच्यात नवी दिल्ली इथं शिष्टमंडळ स्तरावर
चर्चा सुरु आहे.
****
देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची
जयंती उद्या साजरी होत असून या निमित्त देशभरात एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे.
या एकता दौडमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केलं आहे.
****
रेल्वे विभाग पुढच्या पाच वर्षात
१५० बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्याचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी
म्हटलं आहे. ते मुंबईत एका
कार्यक्रमात बोलत होते. यामुळे १०
लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळेल, असं ते म्हणाले. सरकारच्या सुरक्षित आणि आरामदायक
प्रवास उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशात रेल्वे महत्वपूर्ण भुमिका बजावत असल्याचं ते
म्हणाले. पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत केल्यास स्थानिक उत्पादनात वाढ होऊ शकते,
असं त्यांनी नमूद केलं.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी
रचना अधिक आकर्षक बनवण्यासाठी उत्पादन आणि उपाहारगृहांच्या करात एक टक्क्यानं घट करण्याची शिफारस जीएसटी रचना
योजनेवर काम करणाऱ्या मंत्र्यांच्या समितीनं केली
आहे. सध्या वस्तू आणि सेवा कर भरणाऱ्या, एक कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना दोन टक्के आणि उपाहारगृहांना पाच टक्के कर भरावा लागतो.
****
माथेरान मधली प्रसिद्ध रेल्वेसेवा दिड वर्षाच्या
खंडानंतर आजपासून पुन्हा सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात माथेरान
ते अमन लॉज अशी शटल सेवा सुरू झाली आहे. एक नोव्हेंबर रोजी नेरळ स्थानकात रेल रोको करण्याचा इशारा माथेरानच्या
नागरिकांनी दिला होता, मात्र त्यापूर्वीच ही सेवा पुन्हा सुरू झाली. मागील वर्षी मे
मध्ये सलग दोन अपघात झाल्यानंतर ही रेल्वे बंद केली गेली होती. माथेरानच्या पर्यटन
व्यवसायाला या निर्णयाचा
मोठा फटका बसला होता.
****
फ्रेंच
खुल्या बॅटमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅटमिंटनपटू किदंबी श्रीकांतचं अभिनंदन केलं आहे. श्रीकांतनं
जिंकण्याची सवय लावून घेतली असल्याचं, राष्ट्रपतींनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं
आहे, तर मोदी यांनी श्रीकांतवर देशाला अभिमान असल्याचं ट्वीट केलं आहे. २३ वर्षीय श्रीकांतचं
हे गेल्या आठवठ्यातलं हे दुसरं, गेल्या पाच महिन्यात चौथं तर आजवरच्या कारकिर्दीतलं
सहावं अजिंक्यपद आहे. या वर्षात श्रीकांतनं आतापर्यंत डेन्मार्क, ऑस्ट्रेलियन, इंडोनेशिया
आणि आता फ्रेंच खुल्या बॅटमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे.
****
No comments:
Post a Comment