Sunday, 22 October 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 22.10.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 OCT. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ ऑक्टोबर २०१ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या भावनगर इथं दहेज - घोघा या महत्वाकांक्षी रो-रो सागरी फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं. हा प्रकल्प संपूर्ण देशासाठी महत्वाचा असल्याचं ते यावेळी म्हणाले. ६१५ कोटी रुपये खर्चाच्या या सागरी फेरी सेवेमुळे सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात दरम्यान प्रवासला एका तासापेक्षा कमी वेळ लागणार आहे. 

****

राज्यांमध्ये महिला आयोग कार्यरत आहेत की नाही, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला विचारला आहे. उत्तर प्रदेशातल्या वृंदावनसह देशातल्या अन्य भागात निराधार विधवांशी संबंधित दाखल याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं हा सवाल उपस्थित केला. ज्या राज्यांमध्ये महिला आयोग स्थापन केलेला नाही, त्यांनी त्वरित तो स्थापन करावा, असं न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं आहे. निराधार विधवांची स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उपाययोजनांसदर्भात एक शपथपत्र दाखल करणार असल्याचं केंद्र सरकारनं न्यायालयाला सांगितलं.    

****

इराकमध्ये तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या ३९ भारतीयांची ओळख पटवण्यासाठी कुटुंबियांची डीएनए चाचणी करण्यास सांगण्यात आलं आहे. २०१४ मध्ये ३९ भारतीय कामगारांचं इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी मोसुलमधून अपहरण केलं होतं. यात पंजाबच्या कामगारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. बेपत्ता झालेले कामगार भारतीयच आहेत की नाहीत याची खातरजमा करण्यासाठी संबंधित कामगारांच्या कुटूंबियांचे डीएनए नमुने गोळा करण्याचे आदेश उपायुक्तांनी आरोग्य खात्याला दिले आहेत.

****

भारत आणि इजिप्त दरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारताचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम जे अकबर यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल-फत्ताह-अल सिसी यांची काल भेट घेतली. अल-अल्मेनच्या ऐतिहासिक युध्दाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ही भेट घेण्यात आली. या भेटीत अनेक स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्दयांवर चर्चा करण्यात आली. 

****

गुजरातमधल्या पटेल आंदोलनाचे प्रमुख हार्दिक पटेल यांचे सहयोगी वरुपटेल आणि रेशमा पटेल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि राज्याचे पक्षप्रमुख जीतू वाघानी यांच्या उपस्थितीत या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गुजरात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष भरत सिंह सोळंकी यांनी हार्दिक पटेल यांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिल्यानंतर लगेचच पाटीदार आंदोलनातल्या दोन नेत्यांच्या भाजपात प्रवेशाच्या घडामोडी घडल्या.

****

मातंग समाजाचे विविध प्रश्र सोडवण्यासाठी वेळोवेळी साथ दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी मातंग समाजाच्या प्रतिनिधींनी काल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंन्द्रीय मंत्री रामदास आठवले यांची मुंबईत भेट घेतली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, मुंबईत दादर इथल्या गुलमोहर मिलच्या जमिनीवर त्यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी शासनानं निधीची तरतूद करावी तसंच अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणात अ, ब, क, ड अशी वर्गवारी करण्यात यावी अशा विविध मागण्यांचं निवेदन मातंग समाजाच्या वतीनं आठवले यांना देण्यात आलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ तारखेला आकाशवाणीवरच्यामन की बातया कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ३वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. नागरिकांनी येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत आपल्या सूचना आणि विचार  १८०० ११ ७८०० या निशुल्क क्रमांकावर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना आज मुंबईतल्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला दुसरा सामना २५ ऑक्टोबरला पुण्यात तर तिसरा सामना २९ ऑक्टोबरला कानपूर इथं होणार आहे.

****

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज भारताचा किदांबी श्रीकांत आणि दक्षिण कोरियाचा ली ह्युन ई यांच्यादरम्यान होणार आहे. श्रीकांतनं काल उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या वांग विंग की विन्सेन्टचा २१-१८, २१-१७ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

****

बांग्लादेशमधल्या ढाका इथं सुरु असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि मलेशिया संघादरम्यान होणार आहे. यापूर्वी भारतानं काल झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा चार शून्य असा पराभव केला. पाकिस्तान आणि कोरिया संघात आज कांस्य पदकासाठी लढत होणार आहे.

****

बल्गेरिया इथल्या सोफिया इथं झालेल्या तिसऱ्या बाल्कन ओपन युवा आंतरराष्ट्रीय मुष्टीयुध्द विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं चार सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली आहे. 

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...