Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 OCT. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
राजकीय पक्षांमध्ये तरुण नेतृत्व
तयार होण्यावर चर्चा व्हायला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली इथं भारतीय जनता पक्षाच्या दिवाळी मिलन सोहळ्यात ते आज वार्ताहरांशी संवाद
साधत होते. माध्यमांनी आम्हाला राजकारणातले दोष दाखवून द्यावे, असं आवाहन त्यांनी यावेळी
केलं. स्वच्छ भारत अभियानातही माध्यमांनी केलेल्या सकारात्मक कामाचं पंतप्रधानांनी
यावेळी कौतुक केलं. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित
होते.
****
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार
हमी योजनेअंतर्गत राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरेसा निधी पुरवण्यासाठी सर्व
प्रकारचे प्रयत्न करत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या आर्थिक वर्षात आतापर्यंत
चाळीस हजार ४८० कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यात आला असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं
आहे.
****
काँग्रेसचे नेते अहमद
पटेल यांनी इस्लामिक स्टेटच्या संशयित दहशतवाद्याबाबत, त्यांच्यावर गुजरातचे मुख्यमंत्री
विजय रुपाणी यांनी केलेल्या आरोपाचं खंडन केलं आहे. संबंधित दहशतवादी ज्या रुग्णालयात
नोकरी करत होता, त्याच रुग्णालयाच्या विश्वस्तांमध्ये पटेल यांचं
नाव असल्याच्या पार्श्वभूमीवर रुपाणी यांनी पटेल यांना याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं
होतं. निवडणुकांसाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण करण्यात येऊ
नये, असं पटेल यांनी याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
****
उच्च न्यायव्यवस्थेमधल्या न्यायमूर्तींच्या
नेमणुकीसाठीचे ‘पद्धत ज्ञापन’ अर्थात नेमणुकीसाठीच्या पद्धतीचे नियम पूर्ण करण्यात
येत असलेल्या अडचणींचा आढावा घेणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. हे पद्धती
ज्ञापन तयार करण्यासाठी निश्चित अशी मुदत ठरवण्यात आलेली नसली तरी हा विषय अनिश्चित
काळासाठी प्रलंबित ठेवला जाऊ शकत नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं. न्यायालयानं
याबाबत २०१५ मध्ये आदेश पारित केला असल्याचं यावेळी सांगितलं.
****
विविध लवादांना अधिक
स्वातंत्र्य मिळावं, म्हणून केंद्रीय लवादांमध्ये अध्यक्ष
आणि उपाध्यक्ष यांच्या नियुक्तीसाठी मुख्य न्यायाधिशांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन
करण्याची शिफारस विधी आयोगानं केली आहे. विधी आयोगानं कायदा मंत्रालयाला याबाबत एक
अहवाल सादर केला. सर्व केंद्रीय लवादांना कायदा मंत्रालयाच्या अखत्यारित आणायला हवं,
अशी शिफारसही आयोगानं केली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे
येत्या ३० ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात
येणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती
दिली. राज्य सरकारनं महिला आणि शेतकरी यांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नसल्याचा आरोप
त्यांनी यावेळी केला.
****
औरंगाबाद महानगरपालिकेनं अनुदान
घेऊन शौचालय न बांधणार्या एक हजार २०० नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
केली आहे. अनुदान घेऊन शौचालय न बांधणा-या लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचं काम वॉर्ड
कार्यालयांवर सोपवण्यात आल्याचं अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितलं.
अनुदान मिळालेल्या आठ हजार लाभार्थ्यांपैकी सहा हजार लाभार्थ्यांनीच शौचालयाचं बांधकाम
केल्याचं सर्वेक्षणात आढळून आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आदर्श संसद
ग्राम योजनेच्या धर्तीवर प्रत्येक गावाचा विकास करणार असल्याचं शिवसेना उपनेते खासदार
चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद इथं झालेल्या जिल्हा दक्षता आणि संनियंत्रण
समितीच्या बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक गावाच्या विकासासाठी शासनानं वेगळा निधी द्यावा,
असं ते यावेळी म्हणाले.
****
लातूर पोलीस अधिक्षक
कार्यालयात सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यात आलं आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ शिवाजी
राठोड यांच्या हस्ते या पोलिस ठाण्याचं उद्घाटन करण्यात आलं. यामुळे जिल्ह्यातल्या
पोलिस ठाण्यांची एकूण संख्या २४ झाली आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांना
आता सी सी टी एन एस या तक्रार प्रणालीद्वारे घरबसल्या ऑनलाईन तक्रार करता येणार असल्याचं
विशेष पोलीस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. सी सी टी
एन एस ही प्रणाली राबवण्यात नांदेड परिक्षेत्र राज्यात पहिल्या क्रमांकाचं ठरलं असल्याचं
ते म्हणाले.
****
पॅरिस इथं सुरु असलेल्या
फ्रेंच खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू
पी व्ही सिंधू, किदंबी श्रीकांत आणि एच
एस प्रणय यांनी स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीत सिंधुनं
चीनच्या चेन युफेईचा २१-१४, २१-१४ असा सरळ सेट मध्ये पराभव केला,
तर पुरुष एकेरीत प्रणयनं जीऑन कोरिअनचा तर श्रीकांतनं चीनच्या शी युकीचा
पराभव केला. उपान्त्य फेरीत आज प्रणय आणि श्रीकांत यांच्यात सामना होणार आहे.
****
No comments:
Post a Comment