Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 30 October 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
सशक्त समाज आणि माध्यमं भ्रष्टाचाराविरोधातल्या
लढ्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू
यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज सतर्कता जागरुकता सप्ताहाचं उद्घाटन केल्यानंतर
ते बोलत होते. राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय कुशलता यामुळे भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन
होऊ शकतं, असं ते म्हणाले. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे काही काळासाठी अडचणी आल्या,
मात्र त्याचे दीर्घकालिन फायदे होतील, असं उपराष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं.
****
नवीन आव्हानांना सामोरं जाण्यास
राज्यांची पोलिस दलं अत्याधुनिक आणि सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरि पाठिंबा
देईल, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. हैदराबाद इथं सरदार वल्लभभाई
पटेल पोलीस अकादमीत एका कार्यक्रमात गृहमंत्री बोलत होते. तंत्रज्ञानामुळे उग्रवादाचे
नवीन मार्ग समोर येत असल्यामुळे पोलीस आणि जनतेनं सावध राहिलं पाहिजे, असं सिंग यांनी
नमूद केलं. काही शेजारी राष्ट्र तसंच आयसिस सारख्या संघटनांचे भारतात समस्या निर्माण
करण्याचे प्रयत्न गेल्या काळात यशस्वीपणे हाणून पाडल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांनी
सांगितलं.
****
राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएचे
प्रमुख म्हणून योगेश चंदर मोदी यांनी आज कार्यभार स्वीकारला. आसाम मेघालय कॅडरचे १९८४च्या
तुकडीचे भारतीय पोलिस सेवेतले अधिकारी असलेले मोदी २०२१ पर्यंत या पदावर राहणार आहेत.
****
वस्तू आणि सेवा कर अंतर्गत व्यावसायिकांना
जुलै महिन्यासाठी जीएसटी विवरणपत्र भरण्यासाठीची मुदत वाढवण्यात आली आहे. जीएसटी दोन
साठीची मुदत ३० नोव्हेंबर तर जीएसटी तीन साठीची मुदत अकरा डिसेंबर करण्यात आली आहे.
****
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल
यांची जयंती उद्या राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त
देशभरात एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्ली इथल्या मेजर ध्यानचंद मैदानात
होणाऱ्या मुख्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. एकता दौडमध्ये
नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. औरंगाबाद शहरातही उद्या
सकाळी क्रांती चौकातून एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
रायगड जिल्हा प्रशासनानं रायगड
किल्ल्यावर प्लास्टिकला बंदी केली आहे. ज्यांना पाण्याच्या बाटल्या किंवा प्लास्टिक
पिशव्या किल्ल्यावर न्यायच्या आहेत अशांना रोपवे जवळ प्रत्येक बाटली तसंच पिशवीमागे
२५ रूपये अनामत ठेवावी लागेल. किल्ल्यावरून परत आल्यानंतर बाटली आणि पिशवी परत केल्यावर
अनामत रक्कम परत मिळवता येईल. किल्ल्यावर होणाऱ्या अस्वच्छतेमुळे जिल्हाधिकारी विजय
सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला.
****
सर्वसामान्य गुंतवणुकदारांच्या
ठेवी सुरक्षित रहाव्यात यासाठी लवकरच कायदा करण्यात येणार असल्याचं सहकार आणि पणन मंत्री
सुभाष देशमुख यांनी सांगितलं आहे. आज सोलापूर इथं, आयोजित नागरी सहकारी पतसंस्था प्रतिनिधींच्या
कार्यशाळेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्यात अनेक पतसंस्था आर्थिक अडचणीत
सापडल्यानं ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकून पडलेल्या असल्यानं, हा निर्णय
घेतल्याचं देशमुख म्हणाले. पतसंस्थांनी व्यावसायिकता जपावी, तसंच ग्राहकांचं हित लक्षात
घेवून नेटका कारभार करावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
****
राज्यात मध्यावधी निवडणुका लढवण्यास
शिवसेना सज्ज असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं वार्ताहर
परिषदेत बोलत होते. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात घेतलेल्या विविध बैठका
म्हणजे निवडणूक तयारीचा एक भाग असल्याचं सांगून राऊत यांनी, सरकार पक्षच जाणीवपूर्वक
मध्यावधी निवडणुकीची चर्चा पसरवत असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय
राऊत यांचे आरोप हे राजकीय नैराश्येपोटी करण्यात आले असल्याचं, असं भाजपचे नेते आणि
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
****
समरसता साहित्य परिषदेचं अठरावं
समरसता साहित्य संमेलन येत्या नऊ आणि १० डिसेंबरला अहमदनगर मध्ये होणार आहे. भटके विमुक्तीचे
साहित्य आणि समरसता हा या संमेलनाचा विषय आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक
कार्यकर्ते आणि लेखक गिरिश प्रभुणे यांची निवड झाली आहे. या संमेलनात चार परिसंवाद,
कविसंमेलन आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती असे कार्यक्रम होणार आहेत.
****
रत्नागिरीत येत्या तीन ते पाच
नोव्हेंबर दरम्यान दहावा पुलोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तीन नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी
पौर्णिमेच्या अनुषंगानं एक हजार पणत्या प्रज्वलित करून या पुलोत्सवाला प्रारंभ होणार
असून, पाच नोव्हेंबरला रंगभूमीदिनी पुलोत्सवाची सांगता होणार आहे.
****
No comments:
Post a Comment