Sunday, 29 October 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 29.10.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 OCT. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ ऑक्टोबर २०१७ सकाळी .५० मि.

****

** केंद्र आणि राज्य सरकारनं निर्माण केलेल्या विश्वास आणि विकासाच्या कामाला जनतेचा पाठिंबा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

** ऊसाला विनाकपात पहिली उचल तीन हजार चारशे रुपये दिली नाही तर यंदाचा गळित हंगाम सुरू होऊ न देण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

** राज्य सरकारची कर्ज माफी ऐतिहासिक फसवणूक असल्याची विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

** ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते लक्ष्मीनारायण ऊर्फ लालाजी जैस्वाल यांचं निधन

आणि

**  फ्रान्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत अंतिम फेरीत दाखल

****

भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारला ३१ ऑक्टोबर रोजी तीन वर्ष पूर्ण होत असून केंद्र आणि राज्य सरकारनं निर्माण केलेल्या विश्वास आणि विकासाच्या कामाला जनतेनं पाठिंबा दिला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं काल झालेल्या पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावागावात तसंच वॉर्डात जाऊन आपल्या सरकारनं केलेली विकासकामं जनतेपर्यंत पोहोचवावीत, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. सरकारनं केलेली कामं सांगताना कार्यकर्त्यांनी लोकांशी संवाद साधा, असा संदेश प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिला.

****

यंदाच्या गाळप हंगामात ऊसाला पहिली उचल तीन हजार चारशे रुपये विनाकपात  द्यावी, अन्यथा यंदाचा हंगाम सुरू करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. काल कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर इथं संघटनेच्या सोळाव्या ऊस परिषदेत ते बोलत होते. गेल्या हंगामातला रास्त आणि किफायतशीर भाव अनेक कारखान्यांनी दिलेला नाही, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

****

राज्य सरकारनं शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्ज माफी दिली नसून ऐतिहासिक फसवणूक केली असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकारनं शेतकऱ्यांची दिवाळी गोड होऊ दिली नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.

****

येत्या ३१ तारखेपासून राज्यातल्या सहा विभागात जन आक्रोश आंदोलन मेळावे घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी दिली. ते काल अहमदनगर इथं बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फेही येत्या ३० ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.

****

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते लक्ष्मीनारायण ऊर्फ लालाजी जैस्वाल यांचं काल रात्री औरंगाबाद इथं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यात वयाच्या १९व्या वर्षी सहभागी होत त्यांनी  मोलाचं योगदान दिलं. लढ्यातील अग्रणी नेत्यांसोबत काम करत रझाकारांच्या जुलमी राजवटीचा प्रखर प्रतिकार त्यांनी केला होता. विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यातही त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. औरंगाबाद शहरातलं किराडपूरा राम मंदीर, समर्थ व्यायाम शाळा, सीमंत अनाथ वसतीगृहासह मंगल कार्यालय उभारणीच्या कामांत त्यांचा सहभाग होता. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसंच राज्य गांधी स्मारक निधी समितीचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. आज दुपारी दोन वाजता औरंगाबादच्या कैलासनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

***

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्यामन की बातया कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३७ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत फ्रान्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात श्रीकांतनं भारताच्याच एच.एस.प्रणॉयला नमवत अंतिम फेरी गाठली. दरम्यान, भारताच्या पी.व्ही.सिंधु चं या स्पर्धेतलं आव्हान काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं. सिंधुला जपानच्या अकाने यामागुची हिनं पराभूत केलं.

****

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा आणि अंतिम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना कानपूर इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता हा सामना सुरू होईल. यापूर्वी झालेल्या सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकून बरोबरी केलेली आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या आठ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल काल जाहीर झाले. आठ पैकी चार ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, तर तीन ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात गेल्या आहेत. एका ग्रामपंचायतींवर सरपंच पदासाठी भाजप-राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार विजयी झाला आहे.

****

कर्जमाफीची घोषणा करून अनेक महिने उलटले, मात्र कर्जमाफीचे पैसे प्रत्यक्ष कधी  देणार, असा सवाल शिवसेना नेते पशूसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केला आहे. ते काल जालना इथं नवनिर्वाचित सरपंच तसंच सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. ऐन दिवाळीतही शेतकऱ्यांना दमडी मिळाली नसून, जालना जिल्ह्यासह राज्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, असा प्रश्नही खोतकर यांनी विचारला आहे.

****

औरंगाबाद महानगरपालिकेनं अनुदान घेऊन शौचालय न बांधणाऱ्या एक हजार २०० नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अनुदान घेऊन शौचालय न बांधणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचं काम वॉर्ड कार्यालयांवर सोपवण्यात आल्याचं अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आदर्श संसद ग्राम योजनेच्या धर्तीवर प्रत्येक गावाचा विकास करणार असल्याचं शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद इथं झालेल्या जिल्हा दक्षता आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक गावाच्या विकासासाठी शासनानं वेगळा निधी द्यावा, असं ते यावेळी म्हणाले. 

****

लातूर पोलीस अधिक्षक कार्यालयात सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यात आलं आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ शिवाजी राठोड यांच्या हस्ते या पोलिस ठाण्याचं उद्घाटन करण्यात आलं. यामुळे जिल्ह्यातल्या पोलिस ठाण्यांची एकूण संख्या २४ झाली आहे.

****

केंद्रीय रस्ते विकास आणि दळण वळण मंत्री नितीन गडकरी आज औरंगाबाद दौऱ्यावर येत असून, चित्ते पिंपळगाव इथं छत्रपती संभाजी राजे साखर उद्योगाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित असतील. त्यानंतर सातारा परिसरातल्या श्रीयश इन्स्टिट्युट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्युटच्या इमारतीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते होईल. या संस्थेच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत.

****

औरंगाबाद इथं आज आंतरराष्ट्रीय बुद्धीस्ट फेस्टीवलचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी श्रीलंकेचे माजी राष्ट्र्पती महिंदा राजपक्षे, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदी मान्यवर उपस्थित असतील.

*** *

आपल्या सगळ्या सीमांचं रक्षण करण्यास भारतीय यंत्रणा सक्षम आहे आणि  सगळ्या शत्रुराष्ट्रांशी एकत्रित युद्ध प्रसंग उद्भवल्यास त्यालाही भारत सडेतोड उत्तर देईल असं पतिपादन ब्रिगेडीअर हेमंत महाजन यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं आयोजित प्रल्हादही अभ्यंकर स्मृती व्याख्यान मालेत महाजन यांनी दुसरं पुष्प गुंफलं त्यावेळी काल ते बोलत होते. सामान्य नागरिकांनीही देशात सैनिकाच्या भूमिकेत रहावं असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

शासन मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटनांची निवेदनं विचारात घेऊ नये अशी मागणी राज्य अपंग कर्मचारी-अधिकारी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी एका निवेदनाद्वारे विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

****

पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं आदिलाबाद-नांदेड-पंढरपूर आणि नांदेड-पंढरपूर अशा दोन विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. आदिलाबाद - नांदेड - पंढरपूर ही गाडी, आदिलाबाद इथून उद्या दुपारी दोन वाजता सुटून पंढरपूर इथं परवा म्हणज मंगळवारी सकाळी सव्वासात वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी पंढरपूर इथून ३१ तारखेला सकाळी आठ वाजता सुटेल.

No comments: