Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 OCT. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
वस्तू आणि सेवा
कर अंतर्गत ज्या व्यावसायिकांना ऑगस्ट तसंच सप्टेंबर महिन्याची जीएसटी विवरणपत्रं
भरण्यास विलंब झाला आहे, अशा व्यावसायिकांसाठी विलंब शुल्क अथवा दंड माफ करण्यात
आला आहे. केंद्रीय अर्थ मंत्री अरूण जेटली यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली.
यापूर्वी ज्यांनी विलंब शुल्क भरलं असेल, त्यांना ते परत केलं जाईल, असंही जेटली
यांनी म्हटलं आहे.
****
प्रमुख विरोधी
पक्ष आठ नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळणार आहेत. गेल्या वर्षी आठ नोव्हेंबरच्या सायंकाळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार आणि पाचशे रुपये मूल्याच्या नोटा चलनात बाद
केल्याची घोषणा केली होती. विमुद्रीकरणाच्या या घोषणेच्या निषेधार्थ हा काळा दिवस
पाळला जाणार असल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती
मोहम्मद अश्रफ गनी आज भारताच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आले. संरक्षण राज्यमंत्री सुभाष
भामरे यांनी नवी दिल्लीत विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. आपल्या दौऱ्यात मोहम्मद अश्रफ
गनी हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही
ते चर्चा करतील. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची अश्रफ गनी यांची भेट घेऊन विविध
द्वीपक्षीय मुद्यांवर चर्चा केली.
दरम्यान, अमेरिकेचे
परराष्ट्र मंत्री रॅक्स टिलरसन आज सायंकाळी भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत
आहेत.
****
उत्तर प्रदेशात
लखनौ आग्रा द्रुतगती महामार्गावर आज वायुदलानं विमान उड्डाण आणि अवतरणाचा सराव केला. जवळपास २० लढाऊ विमानं या सरावात सहभागी झाली. यामध्ये मिग 2000, सुखोई 30, सी 130 सुपर हरक्युलिस, जग्वार आणि ए एन 32 प्रकारातल्या विमानांचा समावेश आहे. लढाऊ विमानांच्या
या कसरती पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली आहे. देशभरात डझनभर महामार्ग विमान उड्डाण आणि अवतरणासाठी
पुरेशी रुंदी आणि आवश्यक गुणवत्तेचे आहेत. युद्धासारख्या आपातकालीन परिस्थिती या
महामार्गांचा धावपट्टीसारखा वापर केला जाऊ शकतो.
****
दहशतवादी
कारवायांना पैसा पुरवल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सईद शाहीद युसुफ याला
काश्मीर मध्ये अटक केली आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली. सईद हा हिजबुल
मुजाहिदीन या संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन याचा मुलगा आहे.
****
जम्मू
काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी आज पोलिसांच्या गस्ती पथकावर हल्ला
केला. रायफल ग्रेनेडच्या या हल्ल्यात दोन सुरक्षा जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे.
****
‘मुंबई पोलीस फाऊंडेशन’ या
ट्रस्टच्या स्थापनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. या
निर्णयामुळे मुंबई पोलिसांना आता खासगी संस्था तसंच उद्योग समुहांकडून सामाजिक
दायित्व निधी अंतर्गत देणगी स्वीकारता येणार आहे. मात्र विश्वासार्हता असलेल्या
संस्था आणि व्यक्तींकडूनच देणग्या स्वीकाराव्यात, अशी
अट गृहखात्याने ठेवली आहे.
****
कोट्यवधी रुपयांच्या
मुद्रांक घोटाळ्याप्रकरणातला आरोपी अब्दुल करीम तेलगीची प्रकृती अत्यवस्थ असून, तो
बंगळुरू इथल्या एका रुग्णालयात व्हँटिलेटर अर्थात कृत्रीम श्वासोच्छवास प्रणालीवर असल्याचं,
वृत्तसंस्थेकडून सांगण्यात आलं आहे. मेंदूज्वरानं आजारी असलेल्या तेलगीचे अनेक अंतर्गत
अवयव बंद पडले असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुद्रांक घोटाळा प्रकरणी तीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा
सुनावण्यात आलेला तेलगी गेल्या अकरा वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
****
मानव विकास
निर्देशांक आणि मुद्रा बँक यांची सांगड घालून मानव विकास निर्देशांकात मागे
असलेल्या १२५ तालुक्यांपैकी २५ तालुके रोजगारयुक्त करण्यात येणार असल्याचं वित्त
आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात
झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी आवश्यक मनुष्यबळ तसंच
तांत्रिक सहाय्य संयुक्त राष्ट्र संघाकडून मिळालं असून
राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी १०० कोटी रुपये
तरतूद करण्यात आली आहे.
****
राज्य
सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कारामध्ये यंदापासून क्रीडा
पत्रकारांचाही समावेश करण्यात येणार आहे. क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी ही
माहिती देताना, क्रीडा पत्रकारांना विशेष पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार
असल्याचं सांगितलं.
****
आंतराष्ट्रीय नेमबाजी
क्रीडा महासंघ - आय एस एस एफ च्या जागतिक स्पर्धेत
भारताची हिना सिद्धू आणि जीतू राय यांनी सुवर्णपदक पटकावलं आहे. नवी दिल्लीत आज सकाळपासून
सुरू झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघानं दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात ही कामगिरी
केली. या प्रकारात फ्रान्सच्या संघानं रजत पदक तर चीनच्या संघानं कांस्य पदक पटकावलं
आहे.
****
No comments:
Post a Comment