Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 27 October 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
स्वस्त
धान्य दुकानदार सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असल्याचं, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी म्हटलं
आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं आयोजित कार्यशाळा आणि मेळाव्याच्या
उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं
संगणकीकरण करुन ई पॉस मशिनच्या माध्यमातून धान्य वितरण करण्यात येणार असल्यामुळे या
व्यवस्थेतला काळाबाजार संपूर्णपणे थांबवला जाईल, असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला.
****
ऊस गाळप हंगामात यंदा तीन
हजार रुपये पहिली उचल देण्याची मागणी करत बळीराजा शेतकरी संघटनेच्या
कार्यकर्त्यांनी आज पंढरपूर इथं सहकार मंत्री सुभाष देशमुख
यांची गाडी अडवली. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचं उद्घाटन
करण्यासाठी देशमुख आले असता, हा प्रकार घडला. मंत्र्यांच्या
गाडीपुढे रस्त्यावर झोपलेल्या दहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी
ताब्यात घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या देसाईगंज न्यायालयानं राज्याचे
पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना १५ हजार रुपयांच्या
जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. देसाईगंज नगर परिषद निवडणुकीतील
एका उमेदवाराला निवडणूक चिन्ह देण्यासंदर्भात निवडणूक निर्णय
अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा जानकर यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी जानकर आज
न्यायालयात हजर झाले असता, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
****
नांदेड
वाघाळा महानगर पालिकेच्या महापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज
दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाकडून शिला
किशोर भवरे आणि उपमहापौर पदासाठी विनय गिरडे पाटील यांनी अर्ज दाखल केले, तर भारतीय जनता पक्षाकडून बेबीताई गुपिले आणि उपमहापौर पदासाठी गुरूप्रीतकौर सोडी यांनी अर्ज दाखल केले आहेत. महापौर आणि
उपमहापौर पदासाठी एक नोव्हेंबरला निवडणूक होत आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या
घनसावंगी तालुक्यातल्या आठ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झालं. दुपारी
साडेतीन वाजेपर्यंत ८३ टक्के मतदानाची नोंद झाली. उद्या घनसावंगी
इथल्या तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. सरपंचपदाच्या सात जागांसाठी १८, तर सदस्यपदाच्या
२४ जागांसाठी ११२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गाढे सावरगाव इथं सरपंचांची
बिनविरोध निवड झाली आहे.
****
औरंगाबाद
इथं वीज
महावितरणच्या तपासणी मोहिमेत ९३ जणांवर वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले, तर १५४ वीज मीटर जप्त करण्यात आले. सोमवार पासून सुरू
झालेल्या या विशेष मोहिमेत आतापर्यंत दहा
हजार ८०६ ग्राहकांचे वीज मीटर तपासण्यात आले.
तपासणीत एकूण ९३ वीज ग्राहकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात
आले आहेत. या मोहिमेत ४७१ वीज ग्राहकांचे वीजमीटर जागेवर
बदलून देण्यात आले तर वीज बिल न
भरल्यामुळे ८१८ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा
खंडीत करण्यात आला.
****
जालना जिल्ह्यातल्या
भोकरदन इथं अन्न सुरक्षा विभागानं आज केलेल्या कारवाईमध्ये १७ लाख तीन हजार ९५० रुपयांचा
गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला आहे. औरंगाबाद इथल्या
अन्न सुरक्षा विभाग तसंच, जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी
दोन ठिकाणी छापा टाकून गुटख्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी संशयित मुजाहेद रफीक शेख आणि शाकेर ताहेर खान यांच्याविरुद्ध अन्न
सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड कृषी
उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाला एका ठेकेदाराकडून २४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात
आलं. गोरक्षनाथ निवृत्ती गांगुर्डे असं त्याचं नाव आहे. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीच्या
दुरुस्ती कामाचा धनादेश आणि काम पूर्ण झाल्याचा दाखला देण्यासाठी गांगुर्डे
यानं ही लाच मागितली होती.
****
ग्रंथोत्सवाप्रमाणे गावागावात
वाचकोत्सव व्हावा असं मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी
व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं आयेाजित जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवाचं आज बागडे यांच्या हस्ते उद्घाटन
झालं, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, या उद्घाटन सोहळ्यापूर्वी
आज सकाळी क्रांतीचौक इथून ग्रंथदिंडी काढण्यात आली. दोन दिवस
चालणाऱ्या या ग्रंथोत्सवात विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत.
****
बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगांव
इथले काँग्रेस नेते संजय पाटील ठाकरे यांचं काल दिल्ली इथं हृदय विकारानं निधन झालं. पक्षाच्या बैठकीसाठी ते दिल्ली इथं
गेले होते, त्यांच्या पार्थिव देहावर उद्या खामगाव इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
ज्येष्ठ लेखिका इंदूमती थत्ते
यांचं मुंबई इथं वृद्धापकाळानं निधन झालं, त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांचं 'अरे संसार संसार' हे आत्मचरित्रपर
पुस्तक वाचकांच्या विशेष पसंतीत उतरलं होतं. ज्येष्ठ पत्रकार
अनिल थत्ते यांच्या त्या मातोश्री होत.
****
No comments:
Post a Comment