आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२८ ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या आठ ग्रामपंचायतींसाठी
झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. काल या ग्रामपंचायतींसाठी सुमारे ८७ टक्के एवढं मतदान झालं.
****
सहकार क्षेत्र आर्थिक उत्पन्नाचं साधन नसून सेवा क्षेत्र आहे,
त्यामुळे सेवावृत्तीनं सहकार क्षेत्राचं नाव उज्ज्वल करा, असं प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. राज्य सहकारी संघ शतकपूर्तीनिमित्त नागरी सहकारी पतसंस्था
विशेष कार्यशाळेचं उद्घाटन काल औरंगाबाद इथं बागडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते
बोलत होते. पारदर्शकता, प्रामाणिकपणा, विश्वासपात्रता आणि निकोपवृत्तीनं सहकारी संस्थांची
पत चांगली राहण्यास मदत होते असंही ते यावेळी म्हणाले.
****
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाच घेतांना रंगेहाथ पकडलेले औरंगाबाद
महापालिकेचे उपायुक्त अय्युब खान पठाण यांच्या घराची काल पथकानं
झडती घेतली. या झडतीत दीड किलो सोने, २ किलो चांदी
तसंच जवळपास ५ लाख रुपये रोख रक्कम सापडल्याचं वृत्त आहे. दरम्यान, या लाच प्रकरणी
अयुब खान पठाण आणि अन्य एकास न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली
आहे.
****
जालना जिल्ह्यात सहा कापूस खरेदी केंद्रावर येत्या एक
नोव्हेंबरपासून सी.सी.आय खरेदीला सुरुवात होणार आहे. राज्याचे पाणी पुरवठा
आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली.
यामध्ये जालना, बदनापूर, परतूर,
मंठा, भोकरदन, जाफ्राबादचा
समावेश आहे.
****
पंढरपूर इथं कार्तिकी यात्रेसाठी मध्य रेल्वे लातूर ते पंढरपूर
आणि मिरज ते पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. आजपासून तीन नोव्हेंबरपर्यंत
दररोज मिरज ते पंढरपूर गाडी धावणार असून, परवा सोमवारपासून तीन नोव्हेंबरपर्यंत लातूर
ते पंढरपूर गाडी धावणार आहे.
****
अखिल मराठी बुद्धीबळ संघटना आणि जालना जिल्हा बुद्धीबळ संघ यांच्या
संयुक्त विद्यमानं जालना इथं आयोजित ३१ व्या राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचं उद्घाटन
काल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेसाठी
राज्यभरातून अकरा वर्षाखालील २१० बुद्धीबळ पटूंनी नोंदणी केली असून, यात ६० आंतरराष्ट्रीय
मानांकन प्राप्त खेळाडूंचा सहभाग आहे.
****
No comments:
Post a Comment