Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 OCT. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** गहू आणि कडधान्याच्या हमी भावात वाढ
करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
** नगरपरिषदांच्या धर्तीवर नगरपंचायतींच्या
नगराध्यक्षांचीदेखील निवड थेट मतदानानं करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मंजुरी
** महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामासाठी दुय्यम कंपनी स्थापन
** मराठा समाजातल्या तरुणांना उद्योगासाठी सवलतीच्या दरानं कर्ज देणार
** प्रख्यात ठुमरी गायिका गिरजादेवी
तसंच उद्योजक रसिकसेठ धारीवाल यांचं निधन
आणि
** भारत आणि न्युझीलंडदरम्यान आज पुण्यात
दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना
****
सरकारनं गहू आणि कडधान्यांच्या किमान हमी भावात वाढ केली
आहे. गव्हाच्या हमी भावात आता क्विंटलमागे एकशे दहा रुपयांनी वाढ होऊन, तो एक हजार
७३५ रुपये एवढा असेल, तर कडधान्यांच्या हमीभावात क्विंटलमागे चारशे रूपयांपर्यंत वाढ
करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार सामितीनं काल या हमी भावांना
मंजुरी दिली. यामुळे हरभऱ्याचा हमीभाव प्रतिक्विंटल चार हजार चारशे रुपये तर मसूराचा
भाव प्रतिक्विंटल चार हजार दोनशे पन्नास रुपये झाला आहे. मोहरीच्या हमी भावात तीनशे
रूपयांनी, सूर्यफुलाच्या हमी भावात चारशे रूपयांनी आणि बार्लीच्या हमी भावात ८५ रूपयांनी
वाढ झाली आहे.
****
राज्यातल्या नगरपरिषदांच्या
धर्तीवर नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचीदेखील निवड थेट मतदान पद्धतीनं घेण्यासाठी राज्य
नगरपरिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियमामध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश
काढण्यास कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे नगरपरिषद
आणि नगरपंचायती असलेल्या शहरांमध्ये नगराध्यक्ष निवडणुकीत समानता निर्माण होणार आहे.
यात होणाऱ्या दुरुस्तीमुळे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या पदाचा कालावधी सध्याच्या
अडीच वर्षाऐवजी पाच वर्षांचा होईल. विहित केलेल्या प्रक्रियेप्रमाणे नामनिर्देशन करण्याचा
आणि निर्णायक मत देण्याचाही अधिकार अध्यक्षांना प्राप्त होणार आहे.
राज्यातल्या रस्ते आणि
पूलांच्या बांधकाम आणि देखभालीसाठी स्वीकारण्यात आलेल्या हायब्रीड ॲन्युईटीच्या धोरणात
सुधारणा करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या सुधारणेनुसार कामाची निविदा
काढताना कमीत कमी ५० किलोमीटरचे तुकडे करून निविदा मागविण्यात येणार आहेत. या सुधारणा
प्रकल्पाच्या संनियंत्रणासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि वित्त मंत्री यांची उच्चाधिकार
समिती नेमण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
बंद पडलेल्या आणि बंद पडण्याची शक्यता असलेल्या
शासकीय दूध योजना आणि शीतकरण केंद्रांचं खाजगी-सार्वजनिक सहभाग-पीपीपीच्या
तत्त्वावर पुनरुज्जीवन करण्यासह, त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती
करण्यासदेखील मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातल्या दुग्धोत्पादनास
उर्जितावस्था प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर
सहअध्यक्ष हे नवीन पद निर्माण करण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत
घेण्यात आला. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील धार्मिक विधी पार पाडण्यासाठी समितीच्या
अध्यक्षांसह वारकरी संप्रदायाच्या चालीरिती आणि प्रथांची जाण असणाऱ्या अनुभवी
सदस्याच्या नियुक्तीसाठी सहअध्यक्ष पदाची निर्मिती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची अंमलबजावणी, निधी उभारणी आणि इतर कामांसाठी रस्ते विकास महामंडळ - एमएसआरडीसीची दुय्यम कंपनी म्हणून नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन
एक्सप्रेसवे लिमिटेड या नावाने विशेष उद्देश वाहन कंपनी स्थापन करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली.
****
मराठा समाजातल्या तरुणांना उद्योगासाठी कर्ज
उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास
महामंडळामार्फत व्याज सवलत योजना तयार करण्याची सूचना
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी
दिल्या आहेत.
मराठा मोर्चाच्या मागण्यासंदर्भात स्थापन
मंत्रीमंडळ उपसमितीची तिसरी बैठक पाटील यांच्या
अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते. स्वयंरोजगारासाठी
दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज बँकेमार्फत घेतल्यास, व्याज या
महामंडळामार्फत देण्यात येईल. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी
वसतीगृह, इतर मागास वर्गाचं जात प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात कार्यवाही, छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेत ६०५ नव्या अभ्यासक्रमांचा समावेश, सारथी
संस्थेचे कामकाज, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आदींबाबतच्या निर्णयांचा आढावा या बैठकीत
घेण्यात आला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
येत्या २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान १८ व्या प्रल्हादजी अभ्यंकर
स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा युवक विकास मंडळाचे अध्यक्ष
प्रविण घुगे यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ही तीन दिवसीय
व्याख्यानमाला औरंगाबाद इथल्या तापडीया नाट्यगृहात रोज संध्याकाळी साडेपाच वाजता होणार
आहे. या व्याखानमालेत विविध विषयांवर प्रदेश, राष्ट्रीय पातळीवरील प्रसिध्द वक्ते मार्गदर्शन
करणार असल्याचं घुगे यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद शहरातल्या हर्सुल भागातल्या हरसिध्दी माता मंदिरातल्या
कुंडात मंदिर परिसरात राहणाऱ्या दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला. अनिरूध्द आणि
अनुजा बल्लाळ अशी मृत मुलांची नावे आहेत.
****
औरंगाबाद शहरातल्या वीज गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी
आणि वीजचोरी पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली
जात आहे. महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. यासाठी २८५ जणांचं पथक तैनात करण्यात आलं असून, हे पथक
घरोघरी जाऊन विद्युत मीटर, विद्युत भार तपासणी
करणार आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात कृषीपंपाची दोन
हजार ३६४ कोटी रूपये थकबाकी असून या ग्राहकांचा विद्युत पुरवठा
खंडीत करण्यात येत असल्याचं गणेशकर यांनी सांगितलं.
****
ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका, पद्मविभूषण गिरिजादेवी
यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं काल रात्री कोलकाता इथं रुग्णालयात निधन झालं. त्या
८८ वर्षांच्या होत्या. बनारस आणि सेनिया घराण्यातून गायकीचं शिक्षण घेतलेल्या गिरिजादेवी
या ठुमरीसम्राज्ञी म्हणून प्रख्यात होत्या.
****
माणिकचंद उद्योगसमूहाचे प्रमुख आणि
शिरूरचे माजी नगराध्यक्ष उद्योजक रसिकलाल धारिवाल यांचं काल कर्करोगानं निधन झालं.
ते ७८ वर्षांचे होते. २१ वर्ष ते शिरूरचे नगराध्यक्ष होते. माणिकचंद गुटखा, सुपारी,
पिण्याचं पाणी आदी उद्योग त्यांनी सुरू केले होते.
****
औरंगाबाद शहराच्या प्रदूषणानं धोक्याची
पातळी गाठली असून हवेतले धूलिकण, कार्बन डायऑक्साईड आणि सल्फरडायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यानं
तातडीनं उपाययोजना करण्याची सूचना राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं महानगरपालिकेला केली
आहे. याबाबत कृती आराखडा तयार करून नियंत्रण मंडळाला सादर करण्यात आला असल्याचं महापालिका
आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितलं.
****
भारत आणि न्युझीलंडदरम्यान सुरु असलेल्या
तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज पुणे इथं होणार आहे. दुपारी
दीड वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल. गेल्या रविवारी झालेला पहिला सामना जिंकून
न्युझीलंडनं मालिकेत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. मालिकेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी
भारताला आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे.
****
उस्मानाबाद
इथं सोयाबीनचं हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात
आली आहे. तालुका प्रमुख दिलीप जावळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचं निवेदन
जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.
****
दहावी आणि बारावीच्या
परिक्षेसाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्यात आला आहे. आधार क्रमांकाशिवाय आता कोणत्याही
विद्यार्थ्याला परीक्षा देता येणार नाही, असं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं
म्हटलं आहे.
****
लातूर शहरातल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाला कालपासून सुरुवात आली आहे. शहरातल्या शिवाजी चौकात महापौर सुरेश पवार आण उपमहापौर देविदास काळे यांच्या
उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला. शहरातले खड्डे बुजवण्यासंदर्भात विविध सामाजिक संघटनांनी महापालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.
****
नाशिक जिल्ह्यात दाभाडी-अजंग-मालेगाव मार्गावर ट्रॅक्टरची
ट्रॉली एका बंधाऱ्यात कोसळून झालेल्या अपघातात सहा महिला शेतमजूर ठार तर १३ महिला जखमी झाल्या. काल संध्याकाळी शेतातलं मजुरीचं काम आटोपून या महिला घरी परत जात
असताना हा अपघात घडला.
****
No comments:
Post a Comment