Saturday, 21 October 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 21.10.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 October 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

खतांचा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर तसंच रोकडरहित व्यवहार करण्यासाठी शेतकऱ्यांना इफको या सहकारी संस्थेनं दिलेलं प्रशिक्षण, यामुळे २०२२ सालापर्यंत शेतकऱ्यांची मिळकत दुप्पट होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  व्यक्त केला आहे. इफको या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त पाठवलेल्या संदेशात असा विश्वास व्यक्त करतानाच,शेतकऱ्यांच्या आणि सहकारी संस्थांच्या प्रगतीमध्ये इफकोचा मोठा वाटा असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

देशभरातल्या,दुरुस्तीची गरज असलेल्या रेल्वेपुलांचा आढावा घेण्याचा आदेश रेल्वे महामंडळानं दिला आहे. देशभरातल्या अशा पावणेदोनशे पुलांपैकी फक्त तेवीस पुलांवर वेगमर्यादा लागू केलेली असल्याची बाब स्पष्ट झाल्यानंतर मंडळानं हा आदेश दिला आहे.बाकीच्या अशा दोनशे बावन्न पुलांवरुन रेल्वेगाड्या कोणतीही वेगमर्यादा न पाळता नेहमीच्या वेगानं धावतात आणि त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू शकतो, असं याआधी घेतलेल्या आढाव्यात दिसून आलं आहे.

****

जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात कमलकोट सेक्टरमध्ये नियंत्रणरेषेवर पाकिस्ताननं अकारण केलेल्या गोळीबारात, भारतीय सैन्यासाठी भारवाहक म्हणून काम करणारा एक नागरिक मारला गेल्याचं आणि एक मुलगी जखमी झाल्याचं वृत्त आहे. पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याच्या घटनांमध्ये यावर्षी मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ तारखेला आकाशवाणीवरच्यामन की बातया कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ३वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. नागरिकांनी येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत आपल्या सूचना १८०० ११ ७८०० या निशुल्क क्रमांकावर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

राज्यातल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधून एमबीबीएस आणि बीडीएस असे वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातल्या रूग्णालयांमध्ये एक वर्षाची बंधपत्रित  सेवा पूर्ण केल्याशिवाय एमडी, एमएस, पदव्युत्तर पदविका इत्यादी अभ्यासक्रमांना आता प्रवेश घेता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवीसाठीची  प्रवेश परीक्षाही देता येणार नाही. राज्यातल्या ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात तसंच सरकारी रुग्णालयांमघ्ये डॉक्टरांची कमतरता जाणवत असल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे.

****

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज औरंगाबाद इथल्या हर्सूल कारागृहातल्या कैद्यांसोबत दिवाळी साजरी केली. कैदी महिला आणि त्यांच्या मुलांना दिवाळीचा फराळ आणि नवीन कपड्यांचं यावेळी वाटप करण्यात आलं. कारागृहात असलेल्या महिलांसाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं लवकरच सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि सोलर वॉटर हिटर लावण्यात येणार असल्याची माहिती रहाटकर यांनी यावेळी दिली. कारागृहातल्या पुरुष कैद्यांनाही यावेळी फराळ तसंच १०० ब्लॅंकेटसची भेट देण्यात आली.

****

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या कार्यकारी समितीच्या सदस्यपदी नांदेड इथले बालरोगतज्ज्ञ डॉक्टर अजित गोपछडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यासाठीची निवडणूक गेल्या तीन तारखेला परिषदेच्या मुंबईतल्या कार्यालयात पार पडली होती. या समितीत डॉक्टर गोपछडे हे मराठवाड्यातले एकमेव सदस्य आहेत. परिषदेच्या अध्यक्षपदी डॉक्टर शिवकुमार उत्तुरे यांची तर उपाध्यक्षपदी डॉक्टर मनोहर लेले यांची निवडही बिनविरोध झाली.

****

पुण्यातल्या वारजे इथल्या एका मिठाईच्या दुकानातून अडीचशे किलो भेसळयुक्त खवा आणि मिठाई जप्त करण्यात आली आहे. वारजे इथल्या एका हॉटेलमध्ये भेसळयुक्त मिठाई बनवली जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यावर पुण्याच्या गुन्हे शाखेनं अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकासह या ठिकाणी छापा घातला.गेल्या दोन वर्षांपासून अशी भेसळ करत असल्याची कबुली हॉटेलमालकानं दिली आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं या मिठाईचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.याआधीही पुण्यातल्या पिंपळे सौदागर भागातल्या गोदामातून पावणेपाच लाख रुपये किमतीची भेसळयुक्त मिठाई जप्त करण्यात आली होती.

****

मध्यरेल्वेच्या वांगणी आणि शेलू या स्थानकांदरम्यान रुळांमध्ये भेग पडल्यामुळे कर्जत आणि खोपोलीला जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक आज प्रभावित झाली. पुण्याला जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्याही विलंबानं धावत आहेत.

***

जालना इथल्या श्री. आर.डी. भक्त फार्मसी महाविद्यालयात येत्या २३ आणि २४ तारखेला आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दयानंद भक्त यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या ७० महाविद्यालयांमधले महिला आणि पुरुष कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

****

No comments: