Thursday, 1 February 2018

AIR News Bulletin, Aurangabad 01.02.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 1 February 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

संसदेत आज सादर करण्यात आलेल्या २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात डिजिटल इंडियावर भर देण्यात आला आहे. देशभरात पाच लाख वाय फाय स्पॉट उभारले जाणार असून, एकूण डिजिटल इंडिया योजनेसाठी तीन हजार ७३ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. फाईव्ह जी तंत्रज्ञानासाठी चेन्नई इथं फाईव्ह जी टेस्टबेड उभारण्यात येणार आहे.
पथकर नाक्यांवर पथकर भरणाही आता ऑनलाईन पद्धतीनं केला जाणार आहे. त्यासाठी सर्व पथकर नाक्यांवर ई टोल प्रणाली कार्यान्वीत करणं प्रस्तावित आहे. उद्योगांसाठी स्वतंत्र विशेष ओळख क्रमांकाची व्यवस्था प्रस्तावित असून, निर्गुंतवणुकीच्या उद्दीष्टात सात हजार कोटी रुपयांनी वाढ करून हे उद्दीष्ट ८० हजार कोटी रुपये निर्धारित करण्यात आलं आहे.
या वर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती साजरी होत आहे, यासाठी १५० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या वेतनात वाढ प्रस्तावित करण्यात आली असून, राष्ट्रपतींचं वेतन पाच लाख रुपये, उपराष्ट्रपतींचं वेतन चार लाख रुपये तर राज्यपालांचं वेतन साडे तीन लाख रुपये करणं प्रस्तावित आहे. खासदारांच्या वेतनाचा दर पाच वर्षांनी आढावा घेण्यासंदर्भात एक एप्रिल २०१८ पासून नवे धोरण लागू करण्याचा मुद्दाही यात प्रस्तावित करण्यात आला आहे.
आरोग्य तसंच शिक्षण सेवेवरचा अधिभार एक टक्क्यानं वाढवून चार टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे
काही वस्तूंवरचं सीमा शुल्क पाच टक्क्यांनी वाढवण्यात आलं असून त्यामुळे खाद्य तेल, सिगारेटस्, लॅपटॉप, आरामदायी चारचाकी गाड्या, दूरचित्रवाणी संच, इमिटेशन दागिने, फर्निचर, घड्याळं, क्रीडा साहित्य, खेळणी, सौंदर्य प्रसाधनं, रेशमी कपडे, या आयात केल्या जाणाऱ्या वस्तू महागणार आहेत. तर सोलर पॅनेल, पादत्राणं, सुका मेवा आणि वाहनांमध्ये सीएनजी लावण्यासाठीचा संच, इत्यादी वस्तू स्वस्त होणार आहेत.

****

दरम्यान, हा अर्थसंकल्प विकासाला चालना देणारा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. व्यापारातल्या सुलभतेवर भर देण्याबरोबरच सामान्य माणसाचं जीवन अधिक सोपं बनवण्याकडेही या अर्थसंकल्पात लक्ष केंद्रीत केल्याचं ते म्हणाले. शेतकरी, दलित आणि आदिवासी समाजासाठी नवीन संधी निर्माण करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी नमूद केलं. सर्व प्रकारच्या शेतमालाची किमान आधारभूत किंमत दीडपट केल्याबद्दल, त्यांनी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन केलं.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनीही हा अर्थसंकल्प सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पातून नवभारताच्या निर्मितीचा संकल्प करत, शेतकरी आणि गरीबांसह समाजातल्या विविध घटकांना न्याय देण्यात आल्याचं सांगितलं, तर या अर्थसंकल्पातून ग्रामीण आणि शहरी भागाच्या समतोल विकासाला प्राधान्य दिलं असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी, हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या आकांक्षा पूर्ण करणारा असल्याचं म्हटलं आहे.

****

दरम्यान, विरोधी पक्षांनी मात्र हा अर्थसंकल्प निराशाजनक आणि दिशाहीन असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी, या अर्थसंकल्पात शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी काहीही विशेष तरतूद नसल्याचं म्हटलं आहे.
या अर्थसंकल्पाचा वास्तविकतेशी काहीही संबंध नसल्याची टीका, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केला आहे.
बिजू जनता दलाचे नेते भर्तृहरी महताब यांनी प्रतिक्रया देताना, या अर्थसंकल्पात शेतकरी आणि युवकांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला असल्याचं मत व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे जयप्रकाश नारायण यादव यांनी हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचं, म्हटलं आहे.

****

देशातल्या ५० कोटी जनतेसाठी सुरु करण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजने’मुळे जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळण्याबरोबरच आरोग्य क्षेत्रही मजबूत होईल, असं नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे. या योजनेमुळे रोजगाराच्याही अनेक संधी निर्माण होतील, कोणत्याही कागदपत्रांशिवाय आणि नगदी व्यवहारांशिवाय या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  

****

जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं आज सकाळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफांचा मारा केला. पाकिस्तानी सैन्यानं नागरी वसाहतींना लक्ष्य केल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं. या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर देण्यात आलं.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून प्रारंभ झाला. आज पहिला सामना डर्बन इथं खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली असून, अखेरचं वृत्त हाती आलं, तेव्हा, दक्षिण आफ्रिकेच्या दहाव्या षटकात एक बाद ४८ धावा झाल्या होत्या.

****

No comments: