Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 01 March 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ मार्च २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø मानवी तस्करी-प्रतिबंधक
विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
Ø कर्जमाफीपासून
वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आजपासून ऑनलाईन अर्ज करण्यास परवानगी
Ø राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या
महागाई भत्यात तीन टक्क्यांनी वाढ
Ø दहावीच्या
परीक्षेला आजपासून सुरुवात
आणि
Ø औरंगाबाद शहरातल्या
कचरा व्यवस्थापनासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांनी शपथपत्र सादर करण्याचे मुंबई उच्च
न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
*****
मानवी तस्करी-प्रतिबंध, संरक्षण आणि पुनर्वसन विधेयकाचा
मसुदा केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूर केला आहे. काल नवी दिल्ली इथं आयोजित केंद्रीय
मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. यानुसार आता मानवी तस्करीचा गुन्हा वारंवार
करणाऱ्याला, जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली असून अशा प्रकरणांचा छडा लावण्यासाठी
स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याकरता महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या निर्भया निधीतून,
आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. तसंच अशा
प्रकरणांच्या तपासाची मुख्य जबाबदारी
राष्ट्रीय तपास यंत्रणा –एन.आय.ए.कडे सुपूर्द करण्यासाठी संबंधीत कायद्यातही सुधारणा करण्याचा प्रस्तावही काल या बैठकीत संमत
झाला.
****
भीमा-कोरेगाव
मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे, विधान
परिषदेचं कामकाज काल दिवसभरासाठी स्थगित झालं. पुणे
जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव इथं झालेली दंगल ही राज्य सरकार पुरस्कृत होती, असा
गंभीर आरोप विरोधकांनी विधानपरिषदेत केला. याप्रकरणी कथित जबाबदार
असलेले संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना तात्काळ अटक करण्याची
मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज सुरवातीला २० मिनिटांसाठी
तहकूब झालं होतं.
जातपंचायतीच्या नियमांनुसार कौमार्य चाचणी
करण्याबाबत जाहीर वाच्यता करणाऱ्या व्यक्तीवरही यापुढे गुन्हा नोंदवण्यात येणार, असल्याची
घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी काल
विधानपरिषदेत केली. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी कौमार्य चाचणी आणि अशा वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत, जातपंचायतींवर
कठोर कारवाईची मागणी करणारी लक्षवेधी सूचना मांडली होती.
दुसरीकडे
विधानसभेत काल
विरोधकांनी बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदतीच्या मुद्यांवरुन गदारोळ केला. स्थगन
प्रस्तावाद्वारे या मुद्यावर चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली. मात्र
मागणी मान्य न झाल्यानं विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे
सभागृहाचं कामकाज सकाळच्या सत्रात तीनवेळा तहकूब झालं.
****
सैनिकांबाबत क्षमायाचना आणि दिलगिरी व्यक्त करण्यात
आल्यानंतर, विधान परिषद सदस्य, प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घेण्यात येत असल्याचं, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे सांगितलं.
****
छत्रपती
शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत यापूर्वी कर्जमाफीसाठी अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या
शेतकऱ्यांना आजपासून नव्यानं ऑनलाईल अर्ज करता
येणार आहेत. ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत असणार आहे. या पूर्वी या योजनेतंर्गत अर्ज
केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नसल्याचं याबाबतच्या शासन निर्णयात नमूद
करण्यात आलं आहे.
****
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या
महागाई भत्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी
करण्यात आला. एक जुलै, २०१७
पासून सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतल्या मूळ वेतनावरील महागाई भत्याचा
दर, १३६
टक्क्यांवरून १३९ टक्के करण्यात आला आहे. १ फेब्रुवारीपासून ही वाढ रोखीने देण्यात
येणार आहे तर एक जुलै, २०१७ ते ३१ जानेवारी, २०१८
या सात महिन्यांच्या कालावधीतल्या थकबाकीबाबत स्वंतत्रपणे निर्णय घेण्यात येणार असल्याचं
या शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. २४ मार्चपर्यंत ही
परीक्षा चालणार आहे, मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे
यांनी काल पुण्यात वार्ताहरांना ही माहिती दिली. बारावीच्या परीक्षेप्रमाणेच दहावीच्या
परीक्षेसाठीही विद्यार्थ्यांना साडे दहा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणं बंधनकारक
आहे, असं त्या म्हणाल्या. या परीक्षेसाठी एकूण
१७ लाख,५१ हजार, ३५३ विद्यार्थी बसले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी परीक्षार्थींची
संख्या घटली असल्याचं त्या म्हणाल्या.
****
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर काल मुंबईत
विलेपार्ले इथल्या स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. चित्रपट
सृष्टीतल्या ज्येष्ठ तसंच नवोदित अभिनेते अभिनेत्रींसह हजारो चाहत्यांनी आपल्या लाडक्या
अभिनेत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
****
कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती
यांचं काल तामिळनाडूमधल्या कांचीपुरम इथं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. ते गेल्या
काही दिवसांपासून आजारी होते. कांची कामकोटी पीठाचे ते ६९वे शंकराचार्य होते.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
*****
औरंगाबाद शहरातल्या कचरा व्यवस्थापनाचं
व्यवस्थित नियोजन करावं, आणि या कचऱ्याच्या संदर्भात राज्य शासनाची काय भूमिका आहे,
या बद्दल राज्याच्या मुख्य सचिवांनी शपथपत्र सादर करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठानं काल दिले. नारेगाव इथल्या कचरा डेपो प्रकरणी, दाखल जनहित याचिकेच्या
सुनावणी दरम्यान काल न्यायालयानं हे आदेश दिले.
दरम्यान, कचरा विल्हेवाटी संदर्भात मंगळवारी झालेल्या
सुनावणी दरम्यान ज्या जागा महानगरपालिकेनं सुचवल्या होत्या, त्या जागांच्या पाहणीचा
अहवाल काल महानगर पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, आणि पोलीस आयुक्त यांनी न्यायालयाला
सादर केला. या ठिकाणी त्वरित कचरा डेपो उभारता येणार नाही, त्यामुळे नारेगाव इथं कचरा
टाकण्यासाठी तीन महिने मुदतवाढ देण्याची मागणी प्रशासनानं काल झालेल्या सुनावणीत न्यायालयाकडे
केली. या प्रकरणाची सुनावणी आता येत्या सोमवारी होईल.
****
मराठवाड्यातल्या
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्त
कार्यालयावर रूमणं मोर्चा काढण्यात आला. हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारनं बोंडअळीग्रस्त
शेतकऱ्यांना जाहीर केलेली आर्थिक मदत सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात १० दिवसात जमा करावी,
या मागणीसह विविध मागण्यांचं निवेदन संघटनेच्या वतीनं यावेळी
प्रशासनाला देण्यात आलं.
****
उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक
कार्यालय, पाच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयं आणि १८ पोलीस ठाण्यांना आय.एस.ओ.
नऊ हजार एक मानांकन प्राप्त झालं आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी याबाबत पुढाकार
घेतला होता. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
पोलीस ठाण्यातली कागदपत्रं, अभिलेखे, फाईलींग
अद्यावतीकरण याचं वर्षानुवष चालणाऱ्या न्यायालयीन खटल्यांच्या मुद्देमाल याचं सूसुत्रीकरण
करण्यात आलं. या शिवाय परिसर स्वच्छता, रंगरंगोटी, वाहनं पार्कींग, वृक्षलागवड या भौतिकसुविधा,
पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना शुध्द पिण्याचं पाणी बसण्यासाठी आसनं, पोलीस ठाणे
परिसरातील सर्व विभागांचा नकाशा, निर्भयापेटी, सूचनापेटी, या सुविधा उपलब्ध करुन देण्यात
आल्या आहेत.
शिवाय
सामान्य नागरिकांच्या पासपोर्ट, चारित्र्य प्रमाणपत्रांसारख्या कागदपत्रांची निर्धारीत
कालावधीत देण्यासाठी आणि गुणवत्तापुर्ण सेवा देणारे गुणात्मक सकारात्मक बदल्य या
24 पोलीस आस्थापनांमध्ये घडून आलेले आहेत. –देविदास पाठक,आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद.
****
वीज देयकाचा रीतसर नियमितपणे भरणा करणाऱ्या वीज ग्राहकांना
अखंडित वीज पुरवठा करण्याचे निर्देश औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी वीज महावितरण
कंपनीला दिले आहेत. औरंगाबाद इथं जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत ते काल बोलत
होते. ग्रामीण भागात महावितरणने गटानुसार वीज जोडणी दिली आहे, मात्र गटातले काही ग्राहक
देयकाचा भरणा करत नसल्यानं, इतर ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे थकीत
देयकं वसूल करून, वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश खासदार खैरे यांनी दिले.
****
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या
नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावर पोस्ट टाकणाऱ्या एका तरुणाविरोधात जालना
इथं सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील अग्रवाल असं या तरुणाचं नाव असून, तो भारतीय जनता
पक्षाचा कार्यकर्ता आहे. अर्थमंत्र्यांच्या नावाने पक्षातल्या काही जणांना मैत्री विनंती
प्राप्त झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. वरिष्ठ पातळीवरून तक्रार प्राप्त झाल्यानंतर
पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
****
वाईट आणि नकारात्मक बाबींचा नाश करत चांगल्या आणि
सकारात्मकतेचा अंगिकार करण्याची संकल्पना असलेला होळीचा सण आज राज्यात उत्साहात साजरा
होत आहे. संध्याकाळी ठिकठिकाणी होळी पेटवून पूजा केली जाईल.
*****
***
No comments:
Post a Comment