Friday, 2 February 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 02.02.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 February 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ फेब्रुवारी  २०१ सकाळी .५० मि.

****

·                   २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प सादर; शिक्षण-कृषी-आरोग्य आणि रेल्वे विकासावर भर

·                   नोकरदारांसाठी आयकर संरचनेत बदल नाही; ४० हजार रुपये मानक वजावट प्रस्तावित

·                   आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये खाद्य तेल, लॅपटॉप, लक्झरी कार, मोबाईल तसंच दूरचित्रवाणी संच महागणार; सोलार पॅनल, सीएनजी संच, सुकामेवा आणि पादत्राणे स्वस्त होणार

आणि

·                   दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची विजयी सलामी

****

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल आगामी आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. शिक्षण, कृषी, आरोग्य तसंच पायाभूत सुविधा विकास या मुद्यांवर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.

या अर्थसंकल्पात नोकरदारांसाठीच्या आयकर संरचनेत कोणताही बदल प्रस्तावित नाही, मात्र स्टँडर्ड डिडक्शन - अर्थात मानक वजावटची रक्कम ४० हजार रुपये करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँका तसंच टपाल खात्यातल्या विविध बचत योजनांवर व्याजातून मिळणारं ५० हजार रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे.



वार्षिक २५० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या छोट्या उद्योगांना २५ टक्के तर त्यापेक्षा अधिक उलाढाल असलेल्या उद्योगांना ३० टक्के उद्योग कर प्रस्तावित आहे. उद्योगांसाठी स्वतंत्र विशेष ओळख क्रमांकाची व्यवस्था प्रस्तावित असून, निर्गुंतवणुकीच्या उद्दीष्टात सात हजार कोटी रुपयांनी वाढ करून हे उद्दीष्ट ८० हजार कोटी रुपये निर्धारित करण्यात आलं आहे.



सर्व प्रकारच्या शेतमालाची किमान आधारभूत किंमत दीडपट करण्याचा प्रस्ताव असून, बावीस हजार ग्रामीण बाजारांचं कृषी बाजारांमध्ये रुपांतर प्रस्तावित करण्यात आलं आहे. कृषी बाजार आणि संरचना कोष स्थापन करण्यासाठी दोन हजार कोटी रुपये, ४२ मेगा फूड प्रकल्पांची उभारणी, अन्न प्रक्रिया उद्योगासाठी १४०० कोटी रुपये, तर बांबू मिशन स्थापन करण्यासाठी १२९० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.



शिक्षण क्षेत्रात आधारभूत सुविधांसाठी राईज योजना प्रस्तावित करण्यात आली असून, यासाठी एक लाख कोटी रुपये तरतूदीचा प्रस्ताव आहे. शिक्षकांसाठी एकीकृत बी एड कार्यक्रम, शिक्षण पूर्णपणे डिजिटल करण्यासाठी शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये डिजिटल फळा प्रस्तावित करण्यात आला आहे. ७० लाख नवीन नोकऱ्यांची संधी या आर्थिक वर्षात उपलब्ध होणार आहे.



अनुसूचित जाती कल्याणासाठी ५६ हजार ६१९ कोटी रुपये तर अनुसूचित जमाती कल्याणासाठी ३९ हजार १३५ कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकलव्य शाळा उभारणी प्रस्तावित आहे. राष्ट्रीय प्रशिक्षण योजनेअंतर्गत २०२० पर्यंत ५० लाख युवकांना शिष्यवृत्तीही प्रस्तावित आहे. आयुष्यमान भारत ही नवी आरोग्य योजना जाहीर करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत दरवर्षी दहा कोटी गरीब कुटुंबांना वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये तरतुदीचा प्रस्ताव आहे. देशभरात २४ नवी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालये उभारली जाणार असून, आरोग्य केंद्रांसाठी १२०० कोटी रुपये तरतुदीचा प्रस्ताव आहे. क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी दरमहा पाचशे रुपये भत्ता देण्यासाठी सहाशे कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

भारतीय पुरातत्व खात्याअंतर्गत शंभर आदर्श स्मारकांमध्ये पर्यटन सुविधांमध्ये वाढ करणार असल्याचं, जेटली यांनी सांगितलं.



रेल्वे विकासासाठी एक लाख ४८ हजार ५२८ कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे. आगामी वित्तीय वर्षात ३६०० किलोमीटर लांबीचे लोहमार्ग उभारणं प्रस्तावित असून, ६०० रेल्वे स्थानकं वायफाय तसंच सीसीटीव्ही सह अत्याधुनिक करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मुंबई उपनगरी रेल्वे सेवेत ९० किलोमीटर मार्गाचं दुहेरीकरण केलं जाणार असून, यासाठी अकरा हजार कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे. उडान योजनेअंतर्गत ५६ नवी विमानतळं आणि ३१ हेलीपॅड हवाई वाहतुक सेवेशी जोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.



ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी १४ पूर्णांक ३४ लाख कोटी रुपये तरतूद प्रस्तावित असून, उज्ज्वला योजनेअंतर्गत आठ कोटी गरीब महिलांना मोफत घरगुती गॅस जोडणी, सौभाग्य योजनेअंतर्गत चार कोटी गरीब कुटुंबांना मोफत वीज जोडणी, तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात आगामी वर्षात ५१ लाख घर उभारणीचं लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दोन कोटी शौचालय उभारणीचं उद्दीष्टही निर्धारित करण्यात आलं आहे.

देशभरात पाच लाख वाय फाय स्पॉट उभारले जाणार असून, एकूण डिजिटल इंडिया योजनेसाठी तीन हजार ७३ कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे. सर्व पथकर नाक्यांवर ई टोल प्रणाली प्रस्तावित आहे. फाईव्ह जी तंत्रज्ञानासाठी चेन्नई इथं फाईव्ह जी टेस्टबेड उभारण्यात येणार आहे.



या वर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती साजरी होत आहे, यासाठी दीडशे कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रपतींचं वेतन पाच लाख रुपये, उपराष्ट्रपतींचं वेतन चार लाख रुपये तर राज्यपालांचं वेतन साडे तीन लाख रुपये, प्रस्तावित असून, खासदारांच्या वेतनाचा दर पाच वर्षांनी आढावा घेण्यासंदर्भात एक एप्रिल २०१८ पासून नवं धोरण लागू करण्याचा मुद्दाही प्रस्तावित करण्यात आला आहे.



आरोग्य तसंच शिक्षण सेवेवरचा अधिभार एक टक्क्यानं वाढवून चार टक्के प्रस्तावित आहे. काही वस्तूंवरचं सीमा शुल्क पाच टक्क्यांनी वाढवून २० टक्के प्रस्तावित करण्यात आलं आहे, त्यामुळे आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये खाद्य तेल, सिगारेटस्, लॅपटॉप, आरामदायी चारचाकी गाड्या, मोबाईल तसंच दूरचित्रवाणी संच, इमिटेशन अर्थात बेगडी दागिने, फर्निचर, घड्याळं, क्रीडा साहित्य, खेळणी, सौंदर्य प्रसाधनं, रेशमी कपडे, आदींच्या दरात वाढ, तर सोलर पॅनेल, पादत्राणं, सुका मेवा आणि वाहनांसाठीचा सीएनजी संच, इत्यादी वस्तूंच्या दरात कपात ोणार आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

विद्यमान केंद्र सरकारचा चालू कार्यकाळातला हा अखेरचा संपूर्ण अर्थसंकल्प विकासाला चालना देणारा असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनीही हा अर्थसंकल्प सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पातून नवभारताच्या निर्मितीचा संकल्प करत, शेतकरी आणि गरीबांसह समाजातल्या विविध घटकांना न्याय देण्यात आल्याचं सांगितलं, तर या अर्थसंकल्पातून ग्रामीण आणि शहरी भागाच्या समतोल विकासाला प्राधान्य दिलं असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

****

दरम्यान, विरोधी पक्षांनी मात्र हा अर्थसंकल्प निराशाजनक आणि दिशाहीन असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी, या अर्थसंकल्पात शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी काहीही विशेष तरतूद नसल्याचं म्हटलं आहे. या अर्थसंकल्पाचा वास्तविकतेशी काहीही संबंध नसल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केली आहे.

बिजू जनता दलाचे नेते भर्तृहरी महताब यांनी प्रतिक्रया देताना, या अर्थसंकल्पात शेतकरी आणि युवकांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला असल्याचं मत व्यक्त केलं.

****

क्रिकेट

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना सहा गडी राखून जिंकत, भारतानं, सहा सामन्यांच्या या मालिकेत विजयी सलामी दिली. दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करून दिलेल्या २७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं केलेल्या १८९ धावांच्या भागीदारीच्या बळावर भारतानं ४६ व्या षटकात विजय मिळवला. ११२ धावा करणारा विराट कोहली, सामनावीर ठरला. मालिकेतला पुढचा सामना रविवारी होणार आहे.

****

सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायमुर्तींना खटल्यांचं वाटप करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय, रोस्टर पध्दत अवलंबणार आहे. यापुढं सरन्यायाधीश दीपक मिश्रा, जनहित याचिका संबंधीची प्रकरणं हाताळतील. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेत स्थळावर ही माहिती देण्यात आली आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या येत्या मार्च ते मे या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्यानं स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं काल जाहीर केला. जिल्ह्यात १८६ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होणार असून उमेदवारांना येत्या पाच तारखेपासून १० तारखेपर्यंत नामनिर्देशनपत्र भरता येणार आहेत. या अर्जांची छाननी १२ फेब्रुवारीला होईल तर उमेदवारांना १५ तारखेपर्यंत आपले अर्ज मागे घेता येतील. २५ फेब्रुवारीला मतदान, २६ तारखेला मतमोजणी तर निवडणुकांचे निकाल २७ फेब्रुवारी ला जाहीर होतील.

//**********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...