Saturday, 17 February 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 17.02.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 17 February 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इरानचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्यादरम्यान आज नवी दिल्लीमध्ये शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा होऊन नऊ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये हस्तांतरण करार, चाबहार बंदर, औषधी आणि कृषी क्षेत्रातल्या करारांचा समावेश आहे.

****

महिला शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे कारण एक मुलगी अवघ्या कुटुंबाचा उद्धार करते, असं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते केरळमधल्या कोळीकोड इथं आयोजित एका समारंभात बोलते होते. त्यांनी सर्व संघटनांना सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं.

****

केंद्र सरकार देशातल्या आदिवासी भागांमध्ये ५६२ एकलव्य आदर्श, निवासी शाळा उघडणार असल्याचं आदिवासी व्यवहार मंत्री ज्युअल ओराम यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारच्या २७१ शाळा यापूर्वीच मंजूर करण्यात आल्या असून त्यापैकी १९० शाळा कार्यान्वित असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

****

सहाव्या कॉमनवेल्थ संसदीय संघटनेच्या भारत विभागाच्या परिषदेचं आज पाटना इथं लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत विकास कार्यक्रमात संसदेचं योगदान, विधीमंडळ आणि न्यायप्रणालीवर चर्चा करण्यात येणार आहे. उद्घाटनपर भाषणात बोलताना विकासामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण यायला नको असं महाजन यांनी सांगितलं.

****

पेसा कायद्याअंतर्गत आदिवासी भागातल्या ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या पाच टक्के अबंध निधीचा उपयोग गावाच्या सर्वांगीण विकासासाठी करावा, असे निर्देश राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी दिले आहेत. मुंबईत आज पेसा कायद्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

****

कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या वतीनं आयोजित कृषी महोत्सवाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या तीन वर्षात सरकारचं पूर्ण लक्ष शेतकऱ्यांवर असून, शेती आणि शेती संलग्नित क्षेत्राचं अंदाज पत्रक सरकारनं ६६ हजार कोटींवर नेलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

****

धनगर आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक असून, संवैधानिक अडचणी दूर झाल्याशिवाय आरक्षण देणं शक्य नसल्याचं, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद नजीक पडेगाव इथं आज ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळा’मार्फत ‘राजे यशवंतराव होळकर महामेष योजने’चा शुभारंभ आणि शेळ्या मेंढ्या खाद्य बनवण्याकरता फिड मिलचं उद्घाटन जानकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. येत्या दोन महिन्यात चारायुक्त शिवार योजना आणणार असल्याचं सांगत, मेंढी पालन या पारंपारि व्यवसायाला चालना देण्यासाठी ही योजना संपूर्ण राज्यात राबवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

शेतकरी कर्जमाफीत सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातल्या वाडी कुरोली इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते आज बोलत होते. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देणं, ही फक्त एक घोषणा असल्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. नीरव मोदीने केलेल्या गैरव्यवहाराबात सरकारला आधीच माहिती मिळाली होती, मात्र सरकारनं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

****

तिहेरी तलाकवर बंदी घालणाऱ्या विधेयकास विरोध दर्शवत, जालना इथं आज मुस्लीम पर्सनल मंडळाच्या इस्लाहे माशरा महिला समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. गांधीचमन चौकापासून काढण्यात आलेल्या या मोर्चाचं ईदगाह मैदानावर सभेत रूपांतर झालं. या ठिकाणी समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तीन तलाक विधेयक मागे घ्यावं, या मागणीचं निवेदन तहसीलदार विपिन पाटील यांना दिलं. मोर्चात मुस्लीम महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या.

****

महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या राजूर इथं काही पक्ष, संघटनांच्या वतीनं आज रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे जालना-भोकरदन रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. जालना शहरातही गांधी चमन चौकात मराठा महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी आंदोलन करत छिंदम याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं.

****

औरंगाबाद इथल्या श्री १००८ कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाल दिगंबर जैन मंदिराचा वार्षिक महोत्सव उद्या आयोजित करण्यात आला आहे. सकाळी साडे सात ते दुपारी साडे तीन या वेळात होणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांना लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...