Friday, 2 February 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 02.02.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 2 February 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणाऱ्या तसंच, आवश्यकता असलेल्या क्षेत्रांना पाठबळ देणं हा यंदाच्या अर्थसंकल्पामागचा हेतू होता, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्ली इथं अर्थसंकल्पावर आधारित खुल्या परिसंवादात आघाडीच्या उद्योजकांशी चर्चेदरम्यान, ते बोलत होते. कर संकलनाची व्याप्ती आणि संभाव्य करदात्यांना कराच्या कक्षेत आणणं, हे देशापुढचं मोठं आव्हान असल्याचं ते म्हणाले. आरोग्य क्षेत्र आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हे दोन मुद्दे प्राधान्यानं हाताळल्याचं त्यांनी नमूद केलं. अर्थसंकल्पात नमूद केलेली ‘आयुष्यमान भारत’ ही आरोग्यसेवा योजना एक एप्रिलपासून लागू होईल आणि त्यात रुग्णालयातला खर्च आणि इतर गोष्टींचा अंतर्भाव असेल अशी माहिती त्यांनी दिली.

****

संविधानाअंतर्गत न्यायपालिका एक स्वतंत्र संस्था असून, आपली अंतर्गत प्रकरणं मार्गी लावण्यास ती सक्षम असल्याचं, केंद्रीय कायदे राज्यमंत्री पी पी चौधरी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं. न्यायपालिकेचं स्वातंत्र्य राखण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं ते म्हणाले.

****

आर्थिकदृष्ट्या मागास घटकातल्या उद्योजकांना अर्थसहाय्य करणाऱ्या चार विविध योजनांना आज मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प योजना आणि शेतकरी कुशल योजना यांचा समावेश आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती आणि सामुहिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी या योजना महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दरम्यान, मुंबई इथं नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या खासगी विद्यापीठातर्फे आयोजित शिक्षण ते उद्योजकताया विषयावरील एक दिवसीय परिसंवादातही मुख्यमंत्री सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याकडे लक्ष देण्याचं तसंच मानसिकता बदलून प्रयोगशील राहण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

केंद्रीय लोकसेवा आयोगानं घेतलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेत पुण्याच्या श्रुती श्रीखंडेनं देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेस्थळावर आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत देशभरातून २३२ उमेदवार उत्तीर्ण झाले असून, मुलांमध्ये निपर्ण दत्ता यानं पहिला क्रमांक पटकावला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात ‘शालार्थ वेतन प्रणाली’ची सेवा बंद असल्यानं ती पूर्ववत होईपर्यत शिक्षकांची वेतन देयकं ऑफलाईन स्वीकारली जातील, असं आश्वासन शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी दिलं आहे. ज्या शालार्थ वेतन प्रणाली मधून वेतन देयकं अपडेट केली जातात, ते संकेतस्थळ बंद असल्यामुळे शिक्षकांच्या वेतन देयकामध्ये अडचणी येत होत्या. त्यामुळे वित्त विभागाकड़े ऑफलाइन पद्धतीनं वेतन देयकं स्वीकारण्याची परवानगी मागितली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

जालना तालुक्यातल्या हातवण लघू प्रकल्पाच्या कामास गती देण्यात येणार असल्याचं पशुसंवर्धन, दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितलं. बापकळ इथं आज आयोजित धरण परिषद आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या लघू प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या जमिनीचा मोबदला, समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनीप्रमाणे मिळवून देण्याची ग्वाही खोतकर यांनी यावेळी दिली.

****

जालना शहरातल्या योगेशनगर भागात मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं स्थानिक नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं. योगेशनगर भागात पथदिवे सुरू करावे, सार्वजनिक नाल्याचं बांधकाम करून स्वच्छतागृहांची उभारणी करावी आदी मागण्यांचं निवेदन नागरिकांनी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना दिलं. या वेळी महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.

****

पेट्रोल, डीझेल दरवाढीविरूध्द आज नांदेड इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बैलगाड्या, सायकल रिक्षा, सायकलचालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आदी यावेळी उपस्थित होते, असं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे.

****

नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या ‘खेलो इंडिया शालेय स्पर्धे’च्या आजच्या चौथ्या दिवशी जलतरण प्रकारात कर्नाटकच्या श्रीहरी नटराजनं सुवर्ण पदक पटकावलं. उंच उडी प्रकारात दिल्लीच्या शाहनवाज खाननं, थाळी फेक प्रकारात मध्य प्रदेशच्या इकराम अली खाननं, तर मुलींच्या धावण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या ताई बमहाने हीनं सुवर्ण पदक जिंकलं.

****

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडे सहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. उपान्त्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा तर ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानचा पराभव केला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...