Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 1 March 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ मार्च २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
विधानसभेत आज एका वृत्तवाहिनीनं दिलेल्या वृत्ताचा आधार
घेत भाजप सदस्य अनिल गोटे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर
आरोप केले. मुंडे यांनी विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भात कथित लाच घेतल्याची बातमी एका
वृत्तवाहिनीनं प्रसारित केली होती. या प्रकाराची न्यायालयीन चौकशी आणि तोपर्यंत संबंधित
सदस्याचं निलंबन करण्याची मागणी त्यांनी केली. या गोंधळामुळे कामकाज तीन वेळा तहकूब
करावं लागलं. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचं
कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.
****
विधान परिषदेतही भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी
संबंधितांची नार्को टेस्ट करण्याची, तर भाजपच्याच भाई गिरकर यांनी चौकशी होईपर्यंत
संबंधित सदस्यांना निलंबित करण्याची मागणी केली. सत्यतेची पडताळणी न करता अशा प्रकारचं
वृत्त दाखवणं हा सभागृहाचा आणि सदस्यांच्या अपमान आहे, असं शेकापचे जयंत पाटील यावेळी
म्हणाले. शिवसेनेचे अनिल परब यांनीही, अशा प्रकारचं वृत्त सभागृहाच्या विश्वासार्हतेवर
प्रश्नचिन्ह निर्माण करणारं असल्याचं सांगत, याविरोधात एकमुखी ठरावाची मागणी केली.
****
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारात प्रवेश घेतलेल्या
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी १५४ कोटी उपलब्ध करून देण्यात
आले असून, उर्वरित १४८ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करणार असल्याची माहिती शालेय
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिली. मुंबईसह राज्यातल्या खासगी विना
अनुदानित शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव कोट्यातून दुर्बल आणि
वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात सदस्य सुनील प्रभू यांनी लक्षवेधी
उपस्थित केली होती.
****
धर्मानं सांगितलेली तत्वं, मूल्यं आणि त्यांचा वारसा अधिक
सक्षम करुन हिंसाचार, तसंच दहशतवादासारख्या आव्हानांचा सामना केला जाऊ शकतो, असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत ‘इस्लामी वारसा-सामंजस्य आणि उदारमतवादाचा
प्रसार’ या परिषदेत बोलत होते. कोणताही धर्म असहिष्णुता आणि हिंसाचार शिकवत नाही, असं
ते म्हणाले.
****
अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी आजपासून सुरु झाली. यात्रेकरू
नेमून दिलेल्या बँकांच्या शाखांमधून नोंदणी करू शकतील. या वर्षी अमरनाथ यात्रेला २८
जूनपासून सुरुवात होईल, तसंच बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांनी यात्रा करता येणार
आहे. पंजाब नॅशनल बँक, जम्मू अँड काश्मीर बँक आणि येस बँकेच्या देशभरातल्या ४४० शाखांमधून
यात्रेसाठी नोंदणी करता येईल, अशी माहिती अमरनाथ देवस्थान मंडळानं दिली आहे.
****
महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाच्या चुकीच्या धोरणांविरोधात
औरंगाबाद इथं आज उद्योजकांनी बोंब मारून आंदोलन केलं. वाळूज आणि चिकलठाणा औद्योगिक
वसाहतीमध्ये उद्भवलेल्या अडचणी सोडवण्यासाठी एमआयडीसीनं अद्याप ठोस पावलं उचलली नसल्यानं
लाक्षणिक उपोषणही करण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास आठ दिवस सामूहिकरित्या उद्योग
बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी वाळूज, शेंद्रा आणि रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील
सुमारे ५०० उद्योजक उपस्थित होते.
****
जालना इथं आज कंत्राटी कर्मचारी समन्वय कृती समितीच्या
वतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या शासन निर्णयाची होळी करुन आंदोलन करण्यात
आलं. हा शासन निर्णय रद्द न केल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या कृती
समितीच्या वतीनं देण्यात आला आहे. आपल्या मागण्यांचं निवेदन समितीनं जिल्हाधिकाऱ्यांना
दिलं.
****
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा आरक्षणासाठी
पाच मार्च ते १६ मार्च या कालावधीत अनुक्रमे नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना आणि
औरंगाबाद इथं खुली जनसुनावणी आयोजित केली आहे. संबंधित जिल्हा स्तरावरील खुली जनसुनावणी
शासकीय विश्रामगृहात सकाळी ११ ते चार या वेळात होणार असल्याचं राज्य मागासवर्ग आयोगाचे
डॉ. राजाभाऊ करपे यांनी सांगितलं.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं उस्मानाबाद शाखेसाठी
संकल्पित संत गोरोबाकाका सांस्कृतिक सभागृहाचं भूमिपूजन येत्या रविवारी ४ मार्चला संध्याकाळी
साडेपाच वाजता उस्मानाबाद इथं होणार आहे. यावेळी परिषदेचा २०१७ चा जीवन गौरव पुरस्कार
परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव मुळे यांना प्रदान करण्यात येणार असल्याचं
परिषदेचे कार्यवाह डॉ.दादा गोरे यांनी कळवलं आहे.
****
नांदेड-लिंबगाव-चुडावा-पूर्णा दरम्यान उड्डाणपुलाच्या
कामाकरता येत्या नऊ ते ११ मार्च दरम्यान रोज अडीच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
यामुळे काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात येत आहेत, तर काही उशिरा धावणार आहेत.
नांदेड-औेरंगाबाद गाडी नऊ तारखेला रद्द करण्यात आली आहे. या कालावधीत काचिगुडा ते मनमाड
पॅसेंजर नांदेडपर्यंत, मनमाड ते काचिगुडा पॅसेंजर पूर्णापर्यंत, तर नगरसोल नांदेड पॅसेंजर
परभणीपर्यंतच धावणार आहे.
****
No comments:
Post a Comment