Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 02 March 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मार्च २०१८ सकाळी ६.५० मि.
****
· आर्थिक घोटाळे करून परदेशात पळून जाणाऱ्यांची सर्व
संपत्ती जप्त करण्याची तरतूद असलेलं ‘फरारी आर्थिक गुन्हेगार विधेयक २०१८’ ला केंद्रीय
मंत्रीमंडळाची मंजुरी
· विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित एका कथित ध्वनीफितीचे विधीमंडळाच्या दोन्ही
सभागृहात पडसाद
·
मुंबईत
अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं काम पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
आणि
·
औरंगाबाद
शहरातल्या मोकळ्या जागांवर कचरा टाकण्याच्या महानगरपालिकेच्या प्रयत्नांना स्थानिक
नागरिकांचा विरोध कायम; कोंडी सोडवण्यासाठी विभागीय आयुक्त आज नारेगावच्या आंदोलकांशी
चर्चा करणार
****
देशात आर्थिक घोटाळे करून परदेशात पळून जाणाऱ्यांची सर्व
संपत्ती जप्त करण्याची तरतूद असलेलं ‘फरारी आर्थिक गुन्हेगार विधेयक २०१८’ ला केंद्रीय
मंत्रीमंडळानं काल मंजुरी दिली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर
काल वार्ताहरांना ही माहिती दिली. शंभर कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेचे आर्थिक घोटाळे
या विधेयकाच्या कक्षेत असणार आहेत. संसदेच्या, येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात हे विधेयक मांडण्यात येणार असल्याचं जेटली
यांनी सांगितलं.
*****
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
यांच्याशी संबंधित एका कथित ध्वनीफितीचे काल विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पडसाद
उमटले. एका वृत्तवाहिनीनं दिलेल्या वृत्ताचा आधार घेत भारतीय जनता पक्षाचे सदस्य
अनिल गोटे यांनी विधान सभेत हा मुद्या उपस्थित केला. मुंडे यांनी विधिमंडळाच्या
कामकाजासंदर्भात कथित लाच घेतल्याची बातमी वृत्तवाहिनीनं प्रसारित केली होती. या
प्रकाराची न्यायालयीन चौकशी करावी आणि तोपर्यंत संबंधित सदस्याचं निलंबन करण्याची
मागणी त्यांनी केली. त्यांच्या मागणीनंतर सभागृहात झालेल्या गोंधळामुळे कामकाज तीन
वेळा तहकूब करावं लागलं. मुंडे यांनी हे प्रकरण म्हणजे वैयक्तिक बदनामी करण्याचा
प्रकार असल्याचं सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. आपण कोणत्याही अग्निपरीक्षेला
तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. याचवेळी मुंडे यांनीही ग्रामविकास मंत्र्यांच्या
स्वीय सहायकाच्या
ध्वनीफितीचा मुद्या सभागृहात उपस्थित केला. दुसरीकडे आमदार प्रशांत परिचारक यांचं
निलंबन रद्द करण्याच्या निर्णयाला शिवसेनेनं विरोध करत सभागृहात गदारोळ केला. या
आरोप प्रत्यारोपामुळे सभागृहात गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी
सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.
****
विधान परिषदेतही भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी या
प्रकरणी संबंधितांची नार्को टेस्ट करण्याची, तर
भाजपच्याच भाई गिरकर यांनी चौकशी होईपर्यंत संबंधित सदस्यांना निलंबित करण्याची
मागणी केली. सत्यतेची पडताळणी न करता अशा प्रकारचं वृत्त दाखवणं हा सभागृहाचा आणि
सदस्यांचा अपमान आहे, असं शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यावेळी
म्हणाले.
****
राज्य महिला आयोग येत्या आठ मार्च म्हणजेच जागतिक महिला
दिनापासून, पीडीत महिलांसाठी एक विशेष समुपदेशन मदतवाहिनी सुरु करणार आहे. महिला आयोगाच्या
अध्यक्ष विजया रहाटकर यांनी काल याबाबत माहिती दिली. आयोगानं यासाठी समुपदेशकांची नियुक्ती
केली असून, पीडीत महिलांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन समुपदेशन करणं तसंच त्यांच्या
समस्या, हक्क आणि गरज भासल्यास कायदेशीर बाबींबाबत माहिती दिली जाईल असं रहाटकर यांनी
वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी
महाराज स्मारकाचं काम सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत
एल अँड टी कंपनीला देण्यात आले. आगामी पावसाळ्यापूर्वी काम सुरू करण्याची सूचना त्यांनी
या वेळी कंपनीला केली.
****
तूर खरेदीची मर्यादा प्रतिहेक्टरी किमान दहा क्विंटलपर्यत
वाढवण्यात आली आहे. राज्य सहकारी पणन महासंघ, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ-
नाफेड, तसंच विदर्भ सहकारी पणन महासंघ या सर्व तूर खरेदी करणाऱ्या संस्थांना यासंबधीचे निर्देश पणन विभागानं दिले आहेत.
****
भारतीय स्टेट बँकेनं कर्जावरच्या
व्याज दरात काल शून्य पूर्णांक दोन दशांश टक्क्यांनी तर पंजाब नॅशनल बँकेनं शून्य पूर्णांक
१५ शतांश टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ तात्काळ लागू झाली असून, भारतीय स्टेट बॅँकेचा
आता हा व्याज दर आठ पूर्णांक पस्तीस शतांश टक्के तर पंजाब नॅशनल बॅँकेचा आठ पूर्णांक
६५ शतांश टक्के इतका झाला आहे. यामुळे गृह आणि मोटारीसाठीच्या कर्ज दरात वाढ होण्याची
शक्यता आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या विविध भागातल्या मोकळ्या जागांवर कचरा
टाकण्याच्या महानगरपालिकेच्या प्रयत्नांना स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केल्यामुळे
प्रशासन हतबल झालं आहे. काल जांभाळा शिवारात कचरा टाकण्यासाठी जाणारी गाडी जमावानं
पेटवण्याची घटना मिटमिटा इथं घडली. औरंगाबाद लेणीजवळ असलेल्या हनुमान टेकडीमागील मोकळ्या
जागेत कचरा टाकण्यासाठी महानगरपालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांच्या उपस्थितीत पंधरा
ट्रक कचरा आणण्यात आला होता. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे या पथकाला माघारी परतावं
लागलं. कांचनवाडी आणि नक्षत्रवाडी इथे नागरिकांनी कचऱ्याला विरोध करत आंदोलन केलं,
मात्र कांचनवाडी इथे बळाचा वापर करत कचऱ्याच्या काही गाड्या रिकाम्या करण्यात आल्या.
नारेगावच्या लोकांनी चार महिन्यांची मुदत देऊनही प्रशासनानं कोणतीही कारवाई का केली
नाही, असा प्रश्न, पालिकेच्या स्थायी समितीच्या कालच्या बैठकीत सदस्य राजू वैद्य यांनी
विचारला. यावर, प्रशासन याबाबत संवेदनशील असून, हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत आहे,
असं शहर अभियंता एस.डी. पानझडे यांनी सांगितलं. याबाबतीत उपाय शोधण्याची जबाबदारी शासनानं
आता विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्यावर सोपवली असून, ते आज यासंदर्भात
नारेगाव आणि मिटमिट्याच्या नागरिकांशी चर्चा करणार आहेत.
****
महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाच्या चुकीच्या धोरणांविरोधात
औरंगाबाद इथं काल उद्योजकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. वाळूज आणि चिकलठाणा
औद्योगिक वसाहतीमध्ये उद्भवलेल्या अडचणी सोडवण्यासाठी मंडळानं अद्याप ठोस पावलं उचलली नसल्याच्या निषेधार्थ सकाळी
साडेनऊ वाजेच्या सुमारास सुरू झालेलं हे आंदोलन दिवसभर सुरू होतं. वाळूज, शेंद्रा आणि
रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील सुमारे ५०० उद्योजक या आंदोलनात सहभागी झाले होते.
****
जालना इथं काल कंत्राटी कर्मचारी समन्वय कृती
समितीच्या वतीनं कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या शासन निर्णयाची होळी करुन
आंदोलन करण्यात आलं. हा शासन निर्णय रद्द न केल्यास बेमुदत काम बंद आंदोलन
करण्याचा इशारा या कृती समितीच्या वतीनं देण्यात आला आहे. आपल्या मागण्यांचं
निवेदन समितीनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.
****
नांदेड-
पूर्णा मार्गादरम्यान उड्डाणपुलाच्या कामाकरता येत्या नऊ ते ११ मार्च
दरम्यान रोज अडीच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या
अंशतः रद्द करण्यात येत आहेत, तर काही उशिरा धावणार आहेत. नांदेड-औेरंगाबाद गाडी नऊ
तारखेला रद्द करण्यात आली आहे. या कालावधीत काचीगुडा ते मनमाड प्रवासी रेल्वेगाडी
नांदेडपर्यंत, मनमाड ते काचीगुडा पूर्णापर्यंत, तर
नगरसोल -नांदेड प्रवासी रेल्वे परभणीपर्यंतच धावणार आहे.
****
आज धूलिवंदन. अर्थात
रंगांचा उत्सव. एकमेकांना रंग लावून जिव्हाळा आणि आनंद व्यक्त करत देशभरात
हा सण हर्षोल्हासात साजरा करण्यात येत आहे. काल, या
सणाच्या पूर्व संध्येला होलिकोत्सव साजरा झाला. यामध्ये
ठिकठिकाणी पारंपारिक होळी पेटवून वाईट, नकारात्मक गोष्टींचं दहन करुन
चांगल्याची सुरुवात करण्याचा संकल्प करण्यात आला.
राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला
होळी तसंच रंगोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
****
उस्मानाबाद इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीनं
उभारण्यात येणाऱ्या संत गोरोबाकाका सांस्कृतिक सभागृहाचं भूमिपूजन येत्या रविवारी
डी. वाय. विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी. डी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. याच
कार्यक्रमात परिषदेचा २०१७ चा जीवन गौरव पुरस्कार परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे
अध्यक्ष मधुकरराव मुळे यांना प्रदान करण्यात येणार असल्याचं परिषदेचे कार्यवाह डॉ.
दादा गोरे यांनी कळवलं आहे.
//***********//
No comments:
Post a Comment