Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 April 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
राज्यानं उघड्यावर शौचमुक्त योजनेचा पहिला टप्पा पूर्ण केला असून राज्याचा ग्रामीण
भाग उघड्यावर शौचापासून शंभर टक्के मुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी केली आहे. ते आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते. ग्रामविकास मंत्री पंकजा
मुंडे, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी
उपस्थित होते. २०१२ पर्यंत पन्नास टक्के ग्रामीण भागात शौचालयं नव्हती, असं एका पाहणीतून
स्पष्ट झालं होतं, २०१४ पासून आतापर्यंत राज्यात साठ लाख एक्केचाळीस हजार एकशे अडोतीस वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आल्याची
माहिती, मुख्यमंत्र्यांनी दिली. ही बांधलेली शौचालयं वापरण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता
निर्माण करणं, हा आजपासून सुरू होणाऱ्या या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश असल्याचं
फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अक्षय्यतृतीयेच्या
शुभेच्छा दिल्या आहेत. या सणानं सर्वांच्या जीवनात समृद्धी आणि आनंद आणावा अशी आशा
पंतप्रधानांनी आपल्या या संदेशात व्यक्त केली आहे. महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज
साजरी होत आहे. पंतप्रधानांनी आज लंडन इथं थेम्स नदीच्या किनाऱ्यावर उभारलेल्या महात्मा
बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पंतप्रधानांनी जनतेला
परशुराम जयंतीच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.
****
महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज राज्यासह
देशभरात विविध कार्यक्रमांसह साजरी करण्यात आली. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी मुंबईत, सह्याद्री अतिथीगृहात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केलं. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती
साजरी करण्यात आली. यावेळी उपायुक्त वर्षा ठाकूर, यांच्यासह कार्यालयातल्या अधिकारी
तसंच कर्मचाऱ्यांनीही बसवेश्वर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जालन्यामध्ये
जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी पी.बी.खपले यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या
प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. लातूर, बीडसह सर्वच ठिकाणी विविध उपक्रमातून महात्मा
बसवेश्वर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
****
जिल्ह्यांच्या
विकासदरात वाढ होण्यासाठी सरकारनं जिल्हा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय
वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी ही माहिती दिली. या योजनेचा आराखडा निश्चित
करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर जिल्ह्यांच्या
विकास दरात तीन टक्के वाढ होणं अपेक्षित आहे. सध्या ही योजना देशातल्या पाच जिल्ह्यांमध्ये
प्रायोगिक तत्वावर राबवली जाणार असून, यात महाराष्ट्रातल्या रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग
या जिल्ह्यांचा समावेश आहे.
****
१९९३च्या मुंबई
बॉम्बस्फोटातला आरोपी ताहिर मर्चंट याचा आज पहाटे पुण्यात ससून रुग्णालयात मृत्यू झाला. बॉम्बस्फोटप्रकरणी
पुण्यातल्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ताहीर याला मध्यरात्रीनंतर. छातीत
दुखत असल्यानं, ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर ह्रदयविकाराच्या झटक्यानं
त्याचा मृत्यू झाला. मार्च १९९३च्या स्फोटानंतर भारत सोडून पळालेल्या ताहीर मर्चंट
उर्फ ताहीर टकल्याला २०१० मध्ये अबूधाबीतून अटक करण्यात आली होती. विशेष टाडा न्यायालयानं
त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं त्याच्या फाशीला स्थगिती
दिली होती.
****
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि
ॲनिमेटेड चित्रपटांचे प्रणेते भीमसैन यांचं काल रात्री जुहूमधल्या एका रुग्णालयात निधन
झालं. ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते. त्यांनी दिग्दर्शित केलेला घरौंदा हा चित्रपट
गाजला होता. दूरदर्शनवरून प्रसारित झालेले राष्ट्रीय एकात्मता संदेश देणारे त्यांचे
ॲनिमेटेड लघुपट प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत.
****
आज जागतिक वारसा दिन आहे. जगभरातल्या,
जागतिक वारसा, असा दर्जा मिळालेल्या ठिकाणांचं संरक्षण करणं किती महत्त्वाचं आहे, याबाबत
जागृती करण्याच्या उद्दिष्टानं हा दिवस साजरा करण्यात येतो. पिढ्यानपिढ्यांसाठी वारसा,
असं यावर्षीचं घोषवाक्य आहे.
****
बीड इथं येत्या
२१ आणि २२ तारखेला व्यसनमुक्ती संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याचे सामाजिक
न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आकाशवाणीच्या दिलखुलास या मुलाखतवजा
कार्यक्रमात ही माहिती दिली.
*****
***
No comments:
Post a Comment