Sunday, 6 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.05.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 May  2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ मे २०१ सकाळी .५० मि.

****



Ø खरीप पीक कर्ज पुरवठ्याचं जिल्हानिहाय नियोजन मिशन मोडमध्ये करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Ø अॅट्रॉसिटी कायदा शिथील केला जाणार नाही - केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांची ग्वाही

Ø राज्यात सतरा केंद्रांवर आज वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता चाचणी

Ø अहमदनगर दुहेरी हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी उल्हास माने याला अटक

आणि

Ø उस्मानाबाद इथं सामुहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी एका आरोपीला २७ वर्ष तर बाकी तीन आरोपींना प्रत्येकी २२ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

*****



 खरीप पीक कर्ज पुरवठ्याचं जिल्हानिहाय नियोजन मिशन मोडमध्ये करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत बोलत होते. खरीप हंगामात गुणवत्ता पूर्ण बियाणं, खतं पुरवठा करतानाच, १०० टक्के कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज देण्यासाठी विशेष लक्ष द्यायला हवं, असं ते म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेच्या दृष्टीने हा महिना महत्त्वाचा आहे, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. गेल्या वर्षभरात राबवल्या जात असलेल्या, मागेल त्याला शेततळे, उन्नत शेती समृध्द शेतकरी, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, आदी योजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. सुमारे तीनशे कोटी रुपयांचं कृषी यांत्रिकीकरण राबवणारं महाराष्ट्र देशातलं एकमेव राज्य असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

****



 प्लास्टिक तसंच थर्माकोल उत्पादक, विक्रेते, वाहतूक आणि साठवणूकदार यांच्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश अप्पर मुख्य सचिव सतीश गवई यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. प्लास्टिक बंदीसंदर्भात २३ मार्च पासून तीन महिन्यांपर्यंत नागरिकांविरूध्द दंडात्मक कारवाई न करण्याचे आदेश अपर मुख्य सचिवांनी दिलेले आहेत. मात्र विक्रेते, साठेबाज, वाहतुकदार यांच्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल येत्या आठ जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयात सादर केला जाणार असल्याचं, अपर मुख्य सचिवांनी सांगितलं.

****



 राज्यात कुपोषणाला आळा घालण्यासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. राज्यात सप्टेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या पाच महिन्यांच्या कालावधीत आदिवासी भागातल्या ३०० बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची तक्रार एका याचिकेत करण्यात आली आहे. यासंदर्भात न्यायालयानं काही दिशानिर्देश जारी केले होते. त्याच्या अंमलबजावणीबाबतही न्यायालयानं काल राज्य सरकारकडे विचारणा केली. मेळघाट आणि नंदुरबार सारख्या आदिवासी भागात वैद्यकीय सुविधा, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र आणि डॉक्टरांची संख्या याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

****



 वनेतर क्षेत्रातल्या वृक्षाच्छादनामध्ये महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आलं आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार राज्यात दोन वर्षात वनेतर क्षेत्रात २७३ चौरस किलोमीटरनं वाढ झाली असून, याचं सर्व श्रेय शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमात, पर्यावरण रक्षणात सहभागी झालेल्या जनतेला आणि संस्थांना आहे, असं ते म्हणाले. राज्यात एक जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****



 अनुसूचित जाती-जमाती अन्याय प्रतिबंधक अॅट्रॉसिटी कायदा शिथील केला जाणार नाही अशी ग्वाही, केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांनी दिली आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. यासंदर्भातल्या उच्चस्तरीय समितीनं हा कायदा जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं याबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल केली असून, गरज भासल्यास तसा अध्यादेशही जारी केला जाईल असंही त्यांनी सांगितलं.

****



 वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश पात्रता चाचणी - एन ई ई टी 'नीट' आज देशभरात होत आहे. राज्यात औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, सोलापूर, अहमदनगरसह सतरा शहरांमध्ये ही परीक्षा होत आहे. सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत परीक्षा होणार आहे, सर्व परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रांवर सकाळी साडे सात वाजता हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. परीक्षार्थींनी पोषाखाबाबतचा नियम पाळावा, तसंच प्रतिबंधित साहित्य सोबत बाळगू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

*****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****



 अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी उल्हास माने याला काल कर्जत तालुक्यात अटक करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी ही माहिती दिली. जामखेड बाजार समितीच्या आवारात, गेल्या महिन्यात योगेश राळेभात आणि राकेश राळेभात यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, या हत्या प्रकरणानंतर उल्हास माने फरार होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे.

****



 उस्मानाबाद तालुक्यातल्या बेंबळी इथं महिलेवर सामुहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयानं तीन आरोपींना २२ वर्ष सक्तमजुरी, तर एका आरोपीला २७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. चौघा आरोपींना प्रत्येकी ५२ हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. २६ ऑक्टोबर २०१५ रोजी ही घटना घडली होती. 

****



 २९ व्या रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत राबवण्यात आलेल्या वाहतूक संरक्षण जनजागृती पंधरवड्याचा काल समारोप झाला. औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालयाच्या वाहतुक विभागाच्या वतीनं यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. शहरातून हेल्मेट जनजागृती दुचाकी फेरी काढण्यात आली.

****



 शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे द्यावेत, बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानापोटी अनुदान मिळावं या आणि अन्य मागण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं काल खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यात काल चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. या मागणीचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं.

****



 जालना जिल्ह्यातल्या पात्र शेतकरी लाभार्थ्यांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींचं काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. या कामात टाळाटाळ करणारे आणि विलंबास जबाबदार असणारे अधिकारी - कर्मचारी यांच्यावर कारवाईचा इशारा लोणीकर यांनी दिला आहे.

****



 परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यात खडका इथं, अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी थेट कारवाई करून, तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. काल पहाटे ही कारवाई झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याप्रकरणी सोनपेठच्या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.



 दरम्यान, बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात कौडगांव थडी शिवारात गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या महसुल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केल्याचं वृत्त आहे. याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरुन माजलगाव पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

****



 स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शेतकरी स्वाभिमान अभियान यात्रा काल औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं पोहोचली. यानिमित्त शहरात विशेष सभा घेण्यात आली. खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केलेल्या भाषणातून राज्य सरकारच्या कृषी विषयक धोरणावर जोरदार टीका केली.

****



 बीड शहरात जालना रस्त्यावर काल एका टायरच्या दुकानाला आग लागून मोठं नुकसान झालं. आगीच्या भडक्यामुळे दुकानाबाहेर उभ्या दोन खासगी बस तसंच चार दुचाकी जळाल्या तसंच जवळच्या एका रुग्णालयापर्यंत आग पोहोचल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.

****



 सातारा जिल्ह्यात कऱ्हाड इथं आयोजित पहिल्या अखिल भारतीय लोककला संमेलनाचे अध्यक्ष म्हणून औरंगाबाद इथले लोककला - संस्कृतीचे ज्येष्ठ तज्ज्ञ,  प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर मांडे यांची निवड झाली आहे. लोकशाहीर पठ्ठेबापूराव कुलकर्णी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षाच्या अनुषंगाने येत्या अकरा ते तेरा मे दरम्यान हे संमेलन होत आहे.

****



 राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे, या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य सेवेचे सहायक संचालक डॉ. के. आर खरात यांनी नागरिकांना वाढत्या उष्म्यापासून बचावासाठी आवश्यक उपाय योजना करण्याचं आवाहन केलं आहे.



 बीड जिल्ह्यात तापमानात वाढ झाल्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालयातर्फे उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत.



 दरम्यान, जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यात काल दोन तरुणांचा मृत्यू झाला, हे मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. जळगाव इथं काल सुमारे ४३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...