आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१ सप्टेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय डाक
विभागाच्या माध्यमातून सेवा देणार असलेल्या ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’चं आज पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होत आहे. देशभरात या बँकेच्या सहाशे पन्नास शाखा
असतील आणि देशातल्या तीन हजार दोनशे पन्नास ठिकाणी ही योजना सुरू केली जाणार आहे.
****
जैन मुनी
तरुण सागरजी महाराज यांचं आज नवी दिल्ली इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते एक्कावन वर्षांचे
होते.त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी तरुण सागरजी महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांचे उच्च विचार आणि सामाजिक कार्य यासाठी देश त्यांचं नेहमी स्मरण
ठेवेल, असं नमूद करत, जैन समाजाच्या दु:खात आपण सहभागी असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या
याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
****
या महिन्याच्या
पहिल्या आठवड्यात बँका सहा दिवस बंद राहणार असल्याबाबतच्या अफवांचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं
खंडन केलं आहे. अशा प्रकारच्या अफवा समाज माध्यमांमधून पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर
मंत्रालयानं एक निवेदन जारी करून, या आठवड्यात, दोन तारखेला रविवार आणि आठ तारखेला
दुसरा शनिवार असल्यानं केवळ हे दोन दिवसच बँका बंद असतील, असं स्पष्ट केलं आहे.
****
परराष्ट्र
व्यवहार मंत्रालयाच्या ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत
महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्रं उघडण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र
व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी काल दिली. या नवीन केंद्रांमुळे
राज्यात पासपोर्ट सेवा केंद्रांची एकूण संख्या आता ३६ होईल. यापैकी बारामती इथल्या
केंद्राची सुरुवात येत्या चार तारखेला होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत
देशभरात दोनशे एकोणनव्वद पासपोर्ट सेवा केंद्रं उघडण्याचं उद्दिष्ट असून, आतापर्यंत
त्यापैकी दोनशे अठरा केंद्रं सुरू झाली आहेत.
****
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीनं
येत्या 10 डिसेंबर पासून राज्य बालनाट्य स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या बालनाट्य स्पर्धांसाठी
येत्या तीस सप्टेंबर पर्यंत प्रवेशिका पाठवता येणार आहेत. राज्यातल्या, दिव्यांगांसाठी
काम करणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेत आपला सहभाग
नोंदवावा, असं आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक संजीव पलांडे यांनी केलं आहे. याबाबतची
पूर्ण माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध आहे.
*****
***
No comments:
Post a Comment