Saturday, 1 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 1 September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



 भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आठ पूर्णांक दोन दशांश टक्के, इतका नोंदला गेला आहे. हा वृद्धीदर गेल्या दोन वर्षातला सर्वाधिक दर असल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. या आर्थिक वर्षामध्ये हा वृद्धीदर  साडे सात टक्क्यांच्या वर्तवलेल्या अंदाजापेक्षा जास्त असेल, असा विश्वासही अर्थ मंत्रालयानं व्यक्त केला आहे. जागतीक आर्थिक घसरणीच्या काळात देखील आर्थिक सुधारणा आणि दूरदृष्टीमुळेंच भारतीय अर्थव्यवस्थेन हा दर गाठल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. उत्पादन क्षेत्राचा १३ पूर्णांक दोन दशांश टक्के आणि बांधकाम क्षेत्रांचा आठ पूर्णांक ९९ दशांश टक्के वृद्धीदर म्हणजे अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेत असल्याचे संकेत असल्याचं अर्थ व्यवहार विभागाचे सचिव एस सी गर्ग यांनी म्हटलं आहे. सरकारनं घेतलेल्या ठाम निर्णयांमुळेच अर्थव्यवस्थेनं हा दर गाठला असल्याचं अर्थ विभागाचे सचिव हसमुख अधिया यांनी म्हटलं आहे.

****

 प्राप्ती कर विवरणपत्रं भरण्याची यावर्षीची अंतिम मुदत काल संपली असून, या वर्षी पाच कोटी एकोणतीस लाखांहून अधिक विवरणपत्रं दाखल झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या सुमारे साठ टक्क्यांनी वाढली आहे. केरळमध्ये ही विवरणपत्रं दाखल करण्याला येत्या पंधरा तारखेपर्यंत मुदतवाढ दिल्यानं या वर्षीच्या एकूण विवरणपत्रांमध्ये आणखी वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षी सुमारे तीन कोटी वीस लाख विवरणपत्रं दाखल झाली होती.

****

 विधी आयोगानं कुटुंब कायद्यांमध्ये करावयाच्या सुधारणांबाबत केलेल्या चर्चेबाबतचे दस्तावेज जारी केले आहेत. यामध्ये धर्मनिरपेक्ष तसेच व्यक्तीगत कायद्यांमधल्या कुटुंब कायद्याच्या तरतूदींबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली असल्याचं विधी आणि न्याय विभागानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यामध्ये अनेक सुधारणा आणि नवीन विधेयक आणण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये हिंदू विवाहा कायद्यामध्ये संमतीने घ्यायचा घटस्फोट आणि एकत्र नांदण्याच्या तरतूदीबाबत सुधारणा तर मुस्लीम कायद्यामध्ये वारसा कायद्याबाबत काही संहिता निर्माण करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.  

*****

 राज्यातलं पन्नास टक्के कृषी क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नाबार्डतर्फे आयोजित, ‘पाण्याचा कार्यक्षम वापर’, या अभियानाच्या जनजागृती रथाचा शुभारंभ नागपूर जिल्ह्यात त्यांच्या हस्ते  झाला, त्यावेळी ते बोलत होते. सध्या राज्यातलं फक्त अठरा टक्के कृषीक्षेत्र सिंचनाखाली असून, राज्यातल्या प्रलंबित तसंच नवीन सिंचन प्रकल्पांसाठी निधी देऊन, पन्नास टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं गडकरी यांनी सांगितलं.

****

 चौथी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद आजपासून नेदरलँडमध्ये सुरू होत आहे. आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक चार दिवसांच्या या परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. नेदरलँडच्या इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाऊंडेशन, नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्वेदिक काँग्रेस आणि पुण्याच्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद अकादमी, यांनी संयुक्तपणे या संमेलनाचं आयोजन केलं आहे.

****

 आशिया खंडाचा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार प्रदान करून, भरत वाटवाणी आणि सोनम वांगचुक या दोन भारतीयांना गौरवण्यात आलं आहे. फिलीपाईन्सची राजधानी मनिला इथे काल या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं.

****

 जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांचे मानवतावादी विचार आणि सामाजिक कार्य यांचं नेहमी स्मरण होत राहील, अशा शब्दात तरुण सागरजींना आदरांजली वाहून, त्यांच्या शिष्य आणि अनुयायांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

****

 अठराव्या आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारताला चौदावं सुवर्णपदक मिळालं.मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या एकोणपन्नास किलो वजनगटात भारताच्या अमित पनगलनं आज सुवर्णपदक जिंकलं.

****

 जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या गणपतराव पाटील पवार प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक छोटीराम मगन जारवाल यांच्यावर आठ हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल गुन्हा दाखल केला आहे. तक्रारकर्त्याच्या वेतनाचं बिल मंजुरीसाठी पाठवण्याकरता जारवालनं ही लाच मागितली होती.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 October 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी...