Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 1 September 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
तंत्रज्ञानामुळे
जलदगतीनं न्याय मिळण्यासाठी मोठी मदत होईल, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं
आहे. ते आज नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयातल्या वकील संघटनेच्या राष्ट्रीय परिषदेला
संबोधित करताना बोलत होते. भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये न्याय मिळण्यास उशीर लागत असल्याबद्दल
त्यांनी चिंता व्यक्त करत देशभरातल्या विविध न्यायालयांमध्ये सुमारे तीन कोटी ३० लाख
प्रकरणं पडून असल्याचं त्यांनी सांगितलं. तंत्रज्ञानामुळे कामाचा दर्जा सुधारण्यास
मोठी मदत होईल, असं भारताचे सरन्यायाधिश दीपक मिश्रा यावेळी म्हणाले.
****
भारतीय
डाक विभागाच्या माध्यमातून सेवा देणार असलेल्या ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’चं आज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन झालं. ही बँक म्हणजे जन
धन योजनेचं विस्तारित रूप असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं. तीन लाख पोस्टमन आणि ग्रामीण
डाकसेवकांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलेल्या टपाल खात्याच्या माध्यमातून या बँकेचं
काम चालणार असून, येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत देशातली सगळी टपाल कार्यालयं या बँकेच्या
प्रणालीशी जोडली जातील. महाराष्ट्रामध्ये टपाल कार्यालयांच्या बेचाळीस शाखा आणि एकशे
अडुसष्ट स्वीकृती केंद्रांवर या भारतीय टपाल बँकेचं उद्घाटन झालं.
****
मुख्यमंत्री
फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा शक्ती प्रशासनात सहभागी झाल्यानं आपल्या नवीन
संकल्पना प्रत्यक्षात आणून सामान्यांच्या जीवनात बदल घडवत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत. मुख्यमंत्री फेलोशिपमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी
आयोजित कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. फेलोशिप कार्यक्रमात सहभागी झालेल्या युवांनी
प्रशासनाची आतली बाजू पाहिली आणि आपल्या नवीन कल्पनांच्या मदतीनं त्यात बदल सुचवले,
असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या हिंदी विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा
उद्घाटन समारंभ येत्या तीन तारखेला होणार आहे. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय हिंदी
विद्यापीठाचे कुलगुरू गिरीश्वर मिश्र, प्रसिद्ध हिंदी कवी अरुण कमल यांच्यासह अनेक
मान्यवर उपस्थित राहणार असून, यावेळी या विभागाच्या माजी विद्यार्थ्यांचं संमेलन तसंच
माजी विभाग प्रमुखांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचं संयोजकांनी कळवलं
आहे.
****
समानता
हे आपल्या देशाचं ध्येय असून, ते गाठणं, हे सर्वांचं कर्तव्य असल्याचं मत मुंबई उच्च
न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तानाजी नलावडे यांनी व्यक्त केलं आहे.
ते आज औरंगाबाद इथे ‘वकील दिना’च्या कार्यक्रमात बोलत होते. आरक्षणाचे लाभ तळागाळातल्या
लोकांपर्यंत पोचत नसल्याची खंतही न्यायमूर्तींनी यावेळी व्यक्त केली.
****
अहमदनगर
शहराजवळच्या केडगाव बायपासवर झालेल्या एका अपघातात एक जण ठार तर मुंबईच्या टाटा कॅन्सर
हॉस्पिटलचे २४ डॉक्टर्स जखमी झाले आहेत. यापैकी चार डॉक्टरांची प्रकृती गंभीर असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या डॉक्टरांचा चमू औरंगाबाद इथं होणाऱ्या परिषदेमध्ये
सहभागी होण्यासाठी येत असताना त्यांच्या वाहनाला हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी
अहमदनगरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
नांदेड
इथं कृषी परिषदेतर्फे उद्या कापूस बोंड अळी व्यवस्थापन कार्यशाळा आणि शेतकरी गौरव सोहळ्याचं
आयोजन करण्यात आलं आहे. सहकारमहर्षी पद्मश्री विट्ठलराव विखे पाटील यांची जयंती आणि
कृषी दिनाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
इंडोनेशियात
सुरू असलेल्या अठराव्या आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं आज दोन सुवर्ण तर एक
रजत पदक जिंकलं. मुष्टीयुद्ध स्पर्धेत एकोणपन्नास किलो वजनगटात अमित पनघळनं आणि ब्रिजच्या
सांघिक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं सुवर्णपदक जिंकलं. दुसरीकडे भारतीय महिला स्क्वॉश
संघाला, अंतिम फेरीत हाँगकाँगकडून पराभव झाल्यानं रजत पदकावर समाधान मानावं लागलं.
पंधरा सुवर्ण, चोवीस रजत आणि एकोणतीस कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत आठव्या स्थानावर
आहे. या तालिकेत चीन पहिल्या आणि जपान दुसऱ्या स्थानावर आहेत.
****
No comments:
Post a Comment