Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 October 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१
ऑक्टोबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
§
लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या भुकंपग्रस्त भागातल्या वाढीव
कुटुंबियांना घर देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
§
आत्मसन्मान
आणि सार्वभौमत्वाशी तडजोड न करता शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत कटिबद्ध - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
§
जोड
व्यवसाय म्हणून महिलांनी पशुपालन करण्याचं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं आवाहन
आणि
§
अनुसूचित
जमाती समावेश करण्याची मागणी पूर्ण होत नसल्याबद्दल धनगर आरक्षण एल्गार मेळावा आणि
मेंढपाळ हक्क परिषदेत नाराजीचा सूर
****
लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या भुकंपग्रस्त
भागातल्या वाढीव कुटुंबियांना त्यांच्या मागणीनुसार अतिरिक्त जागा किंवा घर देण्यात
येईल, तसंच पुनवर्सनासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार भूखंड देण्यात
येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीनं आयोजित
‘लातूर आणि उस्मानाबाद जिल्हे दुष्काळमुक्ती निर्धार’ समारंभात ते काल बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर,
उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि भारतीय
जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा उपस्थित होते. भुकपंग्रस्त भागातल्या पिण्याच्या
पाण्यासाठी ज्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना केल्या होत्या. त्या विज बील न भरल्यामुळे
बंद पडल्या आहेत. या योजना पुन्हा शंभर टक्के सौर उर्जेचा वापर करुन सुरु करण्याची
घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
यावेळी वन विभागाच्या स्मृतीस्तंभाला भेट
देऊन मान्यवरांनी भुंकपात मरण पावलेल्या नागरिकांना आदरांजली वाहिली.
भारतीय जैन संघटना दुष्काळमुक्तीसाठी उस्मानाबाद
आणि लातूर जिल्ह्यात जलसंधारणाची कामं कशी करणार आहे याची माहिती शांतीलाल मुथा यांनी
दिली.
आपल्या भाषणात खासदार
पवार यांनी भुकंपाच्या काळातली आठवणींना उजाळा दिला. शिवराज पाटील चाकुरकर यांनी आपत्ती
व्यवस्थापनात सामुहिक कार्याला महत्व असल्याचं सांगुन आपत्तीच्या काळात कसे सहकार्य
केलं याची माहिती दिली.
****
भारताचा शांततेवर दृढ विश्वास असून,
शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, मात्र आत्मसन्मान आणि सार्वभौमत्वाशी तडजोड करून नव्हे, असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद
साधताना बोलत होते. २०व्या शतकात जगात झालेल्या दोन युद्धांमधे एक लाख भारतीय सैनिकांनी,
भारताचा याच्याशी संबंध नसतानाही आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. संयुक्त राष्ट्राच्या
शांती सेनेत मोठं योगदान देणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. जगात शांतता नांदावी यासाठी
दशकांपासून शूर भारतीय सैनिक मोठी भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले.
दहशतवादाच्या आडून छुपं युध्द पुकारणाऱ्यांना भारतीय
सैन्यानं तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं, असं सांगून २०१६ मधे केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्याचं
स्मरण देश करत आहे असं पंतप्रधान म्हणाले. या निमित्त देशात विविध ठिकाणी सैन्य दलानं
प्रदर्शनं आयोजित केली आहेत. भारताच्या सामर्थ्याचं आणि जनतेचं रक्षण करण्यासाठी आपले
जवान प्राणांची बाजी कशी लावतात याची जनतेला, विशेष करून युवकांना माहिती मिळावी हा
या मागचा उद्देश आहे. येत्या आठ ऑक्टोबरला ‘हवाई दल दिन’ साजरा होणार आहे त्याविषयी
बोलतांना, १९४७, १९६५, १९७१ आणि १९९९ मध्ये हवाई दलानं बजावलेल्या कामगिरीचा गौरवपूर्ण
उल्लेख त्यांनी केला.
‘स्वच्छ भारत अभियान’ केवळ भारतातच नव्हे तर जगात
यशोगाथा ठरलं आहे, असं मोदी यांनी सांगितलं. स्वच्छताविषयक जगातले सर्वात मोठं संमेलन,
‘महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलन’
भारतानं आयोजित केलं आहे. जगभरातले स्वच्छता मंत्री आणि तज्ञ याला उपस्थित राहणार असून
आपले अनुभव विषद करणार आहेत. महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंतीदिनी त्याची सांगता
होणार आहे. डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला यांसारख्या महान व्यक्तिंनी
गांधीजींच्या विचारातून सामर्थ्य प्राप्त केलं. गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्याला जन
चळवळीचं स्वरूप दिलं हे त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातलं सर्वात मोठं योगदान आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
****
२०१४
साली पाकिस्तानच्या पेशावरमधल्या शाळेवर झालेला दहशतवादी हल्ला भारताच्या मदतीनं झाल्याच्या
पाकिस्तानच्या आरोपाचं भारतानं खंडन केलं आहे. हा आरोप म्हणजे त्या हल्ल्यात मृत्युमुखी
पडलेल्या मुलांच्या स्मृतींचा
अपमान आहे, असं संयुक्त राष्ट्रातल्या भारताच्या राजनैतिक अधिकारी एनाम गंभीर यांनी
म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी
यांनी भारतावर केलेल्या आरोपांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानचे हे आरोप
बिनबुडाचे आहेत आणि शेजारील राष्ट्रांमध्ये अस्थिरता पसरवण्याचा हा प्रयत्न आहे, असं
त्या म्हणाल्या.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
महिलांनी जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करुन आपली आर्थिक
उन्नती साधली पाहिजे, असं राज्याच्या ग्राम
विकास तथा महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे
म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात परळी इथं
काल प्रथमच संगणकीय प्रणालीद्वारे होत असलेल्या
विसाव्या शासकीय पशुगणना कार्यक्रमाचा
शुभारंभ मुंडे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी
त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव
जानकर, आमदार आर. टी. देशमुख, आमदार भीमराव धोंडे, आणि आमदार लक्ष्मण पवार, उपस्थित
होते. महिला आर्थिकदृष्ट्या जोपर्यंत सक्षम होत नाहीत, तोपर्यंत देशाचा विकास होणार
नाही, यासाठी महिलांचं सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्याकरता महिलांनी नगदी उत्पन्न देणाऱ्या
शेळीपालन, कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय करावा.
यासाठी महिला आणि बालविकास विभागासह पशुसंवर्धन विभागातर्फे मदत केली जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद इथं काल ‘धनगर आरक्षण एल्गार मेळावा आणि
मेंढपाळ हक्क परिषद’ झाली. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते या परिषदेचं
उद्घाटन झालं. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याची
मागणी पूर्ण होत नसल्याबद्दल परिषदेत नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान,मेंढपाळांच्या वाड्यांवर पडणारे दरोडे आणि
त्यात स्त्रीयांवर होणारे अत्याचार लक्षात घेता या कुटुंबांच्या स्वसंरक्षणार्थ बंदुकीचा
परवाना मिळणाची मागणी परिषदेत झाली. राज्यभरातून
पारंपरिक वेशभूषेत आलेले धनगर समाज बांधव यावेळी
मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
लातूर इथं आयोजित दोन दिवसीय १७व्या प्रतिभा संगम
साहित्य संमेलनाचा समारोप काल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अशोकराव कुकडे आणि सिनेअभिनेते
प्रविण तरडे यांच्या उपस्थितीत झाला. अखिल भारतीय विद्यार्थ्यी परिषदेतर्फे याचं आयोजन
करण्यात आलं होतं. संमेलनात काल कथा कथन, अभिवाचन,
गीतकार संदिप खरे यांची मुलाखत झाली. पथनाट्य सादरीकरण आणि विविध स्पर्धांचं पारितोषिक
वितरण करण्यात आलं.
****
परभणी
जिल्ह्याच्या पालम तालुक्यात स्वच्छ
भारत योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शौचालयं बांधण्यात आली असून या शौचालयांचा वापर करण्यासाठी
नागरिकांना प्रेरीत केलं जात आहे. पेठ शिवनी इथले भगवान कारंजे
यांनीही आपल्या घरी शौचालयाचं बांधकाम
केलं आहे. या शौचालयामुळे मोठी सुविधा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
मी भगवान गणपतराव
कारंजे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील
मौजे पेठ शिवनी येथिल रहिवासी आहे. स्वच्छ भारत अभियान योजनें अंतर्गत घरी शौचालयाचे बांधकाम केले. त्यापोटी मला शासनाकडून
१२ हजार रूपये अनुदान मिळाले. या योजनेमुळे मी शौचालय बांधू शकलो. मी व माझे कुटूंब
शौचालयासाठी बाहेर जाणे, त्यामुळे बंद झाले. घरी शौचालय झाल्यामुळे आमची शौचालयांची
वेवस्था झाली. आमच्या कुटूंबात या मुळे समाधान लाभले. हे सर्व प्रधानमंत्र्यामुळे झाले.
त्याबद्दल त्यांचे आभार.
****
मुदखेड-नांदेड-परभणी रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचं काम प्रगतीपथावर असून
यासाठी येत्या चार ते नऊ ऑक्टोबर दरम्यान रेल्वे विभाग काही काळासाठी रेल्वे वाहतूक बंद करणार आहे. यामुळे या काळात काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या
असून, काही उशिरा धावतील तर काहींच्या मार्गात बदल होईल, असं रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं
कळवलं आहे.
****
कुपोषणमुक्तीसह
भावी पिढी सशक्त आणि सक्षम बनवण्यासाठी पोषण अभियान प्रभावी असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे यांनी म्हटलं आहे. नांदेड इथं काल पोषण अभियान महारॅली काढण्यात आली, त्यावेळी
ते बोलत होते. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी
यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन
विकास योजना आणि हनी मिशन अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्या मधल्या
निसर्ग परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात
बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन मधुमक्षिका पालन पेटीचं वाटप करण्यात आलं. वन्य जीवांसाठी
आरक्षित असलेल्या अभयारण्यालगतच्या गावातल्या लोकांना रोजगार मिळावा आणि अभयारण्यात
मानवी हस्तक्षेप थांबावा, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment