Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 September 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२
सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
·
इंडिया
पोस्ट पेमेंट बँक सेवेला पंतप्रधानांच्या
हस्ते प्रारंभ; राज्यात बेचाळीस
शाखा आणि एकशे अडुसष्ट स्वीकृती केंद्रांवर सेवा
·
चर्मकार
समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी चर्मकार आयोगाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची
घोषणा
·
इंडोनेशियातल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताला दोन
सुवर्ण, एक रजत आणि एक कांस्यपदक
आणि
·
चौथ्या
क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ८ बाद २६० धावा
*****
टपाल कार्यालयात बँकिंग सुविधा देण्याच्या योजनेला काल प्रारंभ झाला. इंडिया
पोस्ट पेमेंट बँक ही एक ऐतिहासिक घटना असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
सांगितलं. नवी दिल्लीत झालेल्या या प्रणालीच्या उद्धाटनाप्रसंगी ते बोलत होते.
यामुळे बँकीग सेवा घरा घरात जाऊन एका नव्या सामाजिक व्यवस्थेची
सुरुवात होईल असंही ते म्हणाले. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचून तीन लाखापेक्षा
जास्त पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवकांच्या योगदानानं कार्यरत असलेल्या टपाल खात्याच्या
विस्तृत जाळ्याशी ही सुविधा जोडली जाणार आहे.
घनकचरा व्यवस्थापनासंबंधीचं धोरण आणि नियम राज्य सरकारनं
यापूर्वीच तयार केले असून ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये या बँकेच्या महाराष्ट्र सर्कल गिरगाव शाखेचं तर राज्यपाल
सी. विद्यासागर राव यांनी राजभवनात अंधेरी शाखेचं उद्घाटन केलं.
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, आणि बीडसह राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये या बँकेचा
काल संबंधित जिल्ह्यांच्या खासदार आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात
आला.
****
घनकचरा व्यवस्थापनासंबंधीचं
धोरण आणि नियम राज्य सरकारनं यापूर्वीच तयार केले असून ही बाब सर्वोच्च
न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी
दिले आहेत. त्याचबरोबर राज्यातल्या गृहसंकुलं
आणि इतर बांधकामांवरची बंदी उठवण्याची विनंतीही सर्वोच्च न्यायालयाला
करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला फडणवीस यांनी दिले आहेत. वाढत्या वसाहतीमध्ये
घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत योग्य धोरण आखलं नसल्याबाबत महाराष्ट्रासह अनेक
राज्यांना सर्वोच्च न्यायालयानं दंड आकारल्याबाबतचं वृत्त काल प्रसारित झालं होतं,
योग्य धोरण आणेपर्यंत या राज्यांमध्ये बांधकामं करता येणार नसल्याचा आदेशही
न्यायालयानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत.
तांत्रिक अडचणीमुळे याबाबतची माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर होऊ शकली नव्हती,
असं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे.
****
राज्यातल्या चर्मकार समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी
चर्मकार आयोगाची स्थापना करण्यात येणार असून, या आयोगाच्या माध्यमातून समाजाच्या अडचणी
दूर करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत परळ इथं उभारण्यात
येणाऱ्या संत रोहिदास भवनच्या भूमिपूजन, आणि
कोनशिला समारंभाप्रसंगी मुख्यमंत्री काल बोलत होते. चर्मकार समाजाच्या सर्व
अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या
खड्ड्यांमुळे दुरव्यवस्था झालेल्या रस्त्यांवरून राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षानं सरकारवर जोरदार टीका केली आहे. रस्त्यांची अवस्था एवढी खराब आहे
की जागतिक विक्रमांच्या गिनीज बुकातच त्यांची नोंद होईल, आणि
तशी नोंद झाल्यानंतरच मग फडणवीस सरकारला, रस्ते
खराब झाले आहेत हे लक्षात येईल, अशी कोपरखेळी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेतले
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मारली. मुंबईत काल ते वार्ताहरांशी बोलत होते.
****
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचा अंतिम मसुदा तयार झाला असून, लवकरच हे महामंडळ कार्यान्वित करण्याचा
प्रयत्न असल्याचं, ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. बीड इथं आयोजित
राज्यस्तरीय ऊसतोड कामगार मेळाव्यात त्या काल
बोलत होत्या. ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाब
शासन सकारात्मक असल्याचं, त्यांनी या वेळी सांगितलं.
****
जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे लातूर जिल्ह्यातली
भुगर्भ पाणी पातळी साडेतीन ते पाच मीटरपर्यंत वाढली आहे. सरासरी पेक्षा जरी कमी पाऊस
पडला असला तरी पुढील पाच वर्ष टंचाई उदभवणार नाही, आणि टँकरची गरज भासणार नाही, असं मत लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री,
संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केलं आहेत. जलसंधारण कामं अंमलबजावणी निमित्त लातूर आणि रेणापूर तालुक्यांच्या कार्यशाळेत ते
काल बोलत होते. जलसंधारणाची शंभर टक्के कामं पूर्ण झाली, तर लातूर जिल्हा जलयुक्त होईल,
असही ते म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
समानता हे आपल्या देशाचं ध्येय
असून, ते गाठणं, हे सर्वांचं कर्तव्य असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठाचे न्यायमूर्ती तानाजी नलावडे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं वकील दिनाच्या
कार्यक्रमात काल ते बोलत होते. आरक्षणाचे लाभ तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचत नसल्याची
खंतही न्यायमूर्तींनी यावेळी व्यक्त केली. शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि गोरगरीबांच्या
उन्नतीसाठी या देशात १९८० पासून कायदे झाले नाहीत, न्यायालय आता केवळ श्रीमंताची झाली
असल्याचंही नलावडे यांनी म्हटलं.
****
यापूर्वीच्या सरकारनं मुस्लिमांना
जाहीर केलेलं पाच टक्के आरक्षण लागू करावं यासाठी राज्यात विभागवार आरक्षण परिषदांमधून
जनजागृती केली जाणार असल्याची माहिती, खासदार हुसेन दलवाई दिली आहे. ते काल उस्मानाबाद
इथं राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षण परिषदेत बोलत होते. शिक्षणाचं मागासलेपणा, नोकऱ्यांमध्ये
अल्पप्रमाण यासारख्या विषयांवर जनजागृती केली जाणार असल्याचं हुसेन यांनी आपल्या भाषणात
सांगितलं.
****
इंडोनेशियात
सुरू असलेल्या अठराव्या आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं काल दोन सुवर्ण तर एक
रजत पदक जिंकलं. मुष्टीयुद्ध स्पर्धेत एकोणपन्नास किलो वजनगटात अमित पंघलनं तर ब्रिजच्या सांघिक स्पर्धेत भारताच्या
शिवनाथ सरकार आणि प्रणव वर्धन या पुरूषांच्या संघानं सुवर्णपदक जिंकलं. दुसरीकडे भारतीय महिला स्क्वॉश संघाला, अंतिम फेरीत हाँगकाँगकडून पराभव झाल्यानं
रजत पदकावर समाधान मानावं लागलं. पुरूषांच्या
हॉकीमध्ये भारतानं काल पाकिस्तानला पराभूत करून कांस्य पदक मिळवलं. या स्पर्धेत पंधरा
सुवर्ण, चोवीस रजत आणि तीस
कांस्य पदकं मिळवत भारत
पदक तालिकेत आठव्या स्थानावर आहे. आतापर्यंत
झालेल्या स्पर्धेतली भारताची ही सर्वाधिक पदक संख्या आहे.
****
चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात
काल दिवसअखेर इंग्लंडनं तिसऱ्या दिवस अखेर दुसऱ्या डावात ८ बाद २६० धावा केल्या.
यामुळे इंग्लंडकडे आता २३३ धावांची आघाडी झाली आहे. यापूर्वी पहिल्या डावात इंग्लंडनं
२४६ आणि भारतानं २७३ धावा केल्या होत्या. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड २-१ ने
आघाडीवर आहे.
****
प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत गरीबांना मोफत
गॅस जोडणी देण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत २८ लाख ८१ हजार गॅसच्या जोडण्या देण्यात
आल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातही या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. औरंगाबाद शहरातल्या
वानखेडे नगर भागातल्या रहिवाशी सुषमा तायडे आणि शुभांगी हिरेकर यांनी गॅस जोडणीमुळे
मोठी सुविधा झाल्याचं सांगितलं.
माझ नाव शुशमा तायडे आहे.
एन १३ भारत नगर, औरंगाबाद. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस मिळालेला आहे.
यापूर्वी आम्हा फार समस्या येत होत्या स्वयंपाक करतांना. पहिले आम्ही स्टो वापराचो.
रॉकेल कधी-कधी मिळत नव्हतं आम्हाला. खोळंबा व्हायचां फार जास्त. आणि आता सद्या गॅस
मिळालेला आहे. तर वेळेची बचत होते आहे. पैसाची आर्थिेक बचत पण फार होते आहे. शासनाची आभारी आहे.
शुभांगी अशोक खेरेकर. वार्ड
क्रमांक ५. माझ्या घरामध्ये गॅस नव्हता. अक्षरश्या मला रॉकेलसाठी फिरावे लागायचं. आज
माझ्या घरामध्ये गॅस आहे. आणि आज मी त्याच्यावर अन्न शिजवतेय. आम्हाला गॅस सोबत रेगूलेटर,
शेगडी हे सगळ फक्त आणि फक्त १०० रूपयामध्ये
उपलब्ध करून दिलं. याबद्दल आम्ही पंतप्रधान योजनेचे अभिनंदन करतो.
****
बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचा
मुख्याध्यापक, नंदकिशोर मोदी याला काल बीडच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागानं दीड लाख
रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. विद्यालयातल्या चार शिक्षक आणि एक लिपिक यांची
नेमणूक नियमबाह्य असल्याचं कारण देत संस्थेनं त्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं होतं.
या प्रकरणाची बीडच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे सुरु असलेल्या चौकशीत बाजू मांडण्यासाठी
मोदी यानं तक्रारदार लिपिकाकडे दोन लाख रूपयांची लाच मागितली होती.
****
जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांचं काल नवी दिल्लीत
दीर्घ आजारानं निधन झालं. ते एक्कावन वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार
करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक
मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment