आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२ सप्टेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
देशात औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर
नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नियमांचा मसुदा तयार केला आहे. नोंदणी
असल्याशिवाय ई-फार्मसीच्या माध्यमातून कोणीही व्यक्ती औषधाचा साठा, विक्री करु शकणार
नाही, असं या नियमात म्हटलं आहे. ई फार्मसी करु इच्छिणाऱ्यांसाठी, केंद्र सरकारच्या
ऑनलाईन पोर्टलवर 18 AA क्रमांकाच्या फॉर्मद्वारे
अर्ज करावा लागेल.
देशभरात नागरिकांना औषधांची उपलब्धता योग्यरित्या
व्हावी, हा या नियमावलीचा उद्देश असल्याचं औषधं नियंत्रण महासंचालक ईश्वरा रेड्डी यांनी
सांगितलं.
****
इंडोनेशियातल्या जकार्ता इथं झालेल्या १८ व्या आशियाई
क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होत आहे. महिला हॉकी संघाची कर्णधार रानी रामपाल भारतीय
संघाची ध्वजवाहक राहणार आहे. भारतानं या स्पर्धेत शानदार कामगिरी केली असून गेल्या
६७ वर्षातलं आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं
आहे. १५ सुवर्ण २४ रौप्य आणि ३० कांस्य पदकं जिंकून भारतानं या स्पर्धेत पदकतालिकेत
आठवं स्थान पटकावलं आहे.
****
श्रीकृष्ण जन्माष्ठीनिमित्त आज देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबादेतही
जन्माष्टमीनिमित्त इस्कॉनच्या राधाकृष्ण मंदिरात
आज सायंकाळी भजन कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान्, उद्या साजऱ्या
होत असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या प्रार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातल्या वाहतुकीत बदल
करण्यात आला आहे. गुलमंडी, राजाबाजार, औरंगपुरा, निराला बाजार तसंच टी.व्ही. सेंटर,
बजरंग चौक, कॅनॉट प्लेस या शहरातल्या प्रमुख मार्गावरच्या वाहतुकीत बदल करण्यात आला
असून ती दुसरीकडे वळवण्यात आली आहे.
****
ज्येष्ठ शास्त्रीय गायक नाथराव नेरळकर यांचा अभिष्टचिंतन
सोहळा आज सायंकाळी सहा वाजता तापडिया नाट्यगृहात होणार आहे. निवृत्त प्रशासकीय अधिकारी
जयंत देशपांडे आणि बजाज उद्योग समूहाचे सी. पी. त्रिपाठी यांच्या हस्ते नाथरावांचा
गौरव करण्यात येईल. यावेळी त्यांच्या शिष्यांची स्वरवंदना, डॉ. मंगला वैष्णव लिखित
संगीतनाथ - नाथ नेरळकर या पुस्तकाचे आणि एका माहितीपटाचे प्रकाशनही होणार आहे.
****
विकास कामांना विरोध
न करता पाठिंबा द्यावा असं आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. केंद्र
शासनाच्या फिल्ड आऊटरिच ब्यूरो कार्यालयातर्फे स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय पोषण
आहार सप्ताह, आणि शासनाच्या विविध योजनां विषयी विशेष प्रसिद्धी कार्यक्रमाचं आयोजन
काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या गणोरी इथं करण्यात आलं होतं. त्यावेळी बागडे बोलत होते.
*****
***
No comments:
Post a Comment