Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 2 September 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ सप्टेंबर २०१८ दुपारी
१.०० वा.
****
पाकिस्तानला दिली जाणारी ३०० दशलक्ष
डॉलर्सची मदत रद्द करण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. दहशतवाद रोखण्यात पाकिस्तानला
आलेलं अपयश, हे या निर्णयामागचं प्रमुख कारण असून, हा निधी ३० सप्टेंबरपर्यंत इतर आवश्यक
बाबींवर खर्च करायचा असल्यामुळे या निर्णयाला अमेरिकी काँग्रेसनं मंजुरी द्यावी, अशी
मागणी करण्यात आल्याचं पेंटागॉनचे प्रवक्ते कोन फॉकनर यांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रपति रामनाथ कोविंद आज सकाळी सायप्रस, बल्गेरिया,
आणि झेक प्रजासत्ताक या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात
ते आज सायप्रसला पोहोचतील.
सायप्रस संसदेच्या विशेष सत्राला कोविंद
संबोधित करणार आहेत, तसंच सायप्रस विद्यापीठात व्याख्यानही देणार आहेत. मंगळवारी राष्ट्रपती बल्गेरियाला
पोहोचणार असून, दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात ते झेक प्रजासत्ताकला जाणार आहेत.
****
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू
यांच्या गेल्या वर्षभरातल्या कामकाजाच्या अनुभवावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आज नवी दिल्ली इथं करण्यात आलं. 'मूव्हिंग ऑन... मूव्हिंग
फॉरवर्ड: अ ईयर इन ऑफिस' या २४५ पानी पुस्तकात नायडू यांनी सात प्रकरणांमध्ये ४६५ अनुभव
लिहिले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलतांना नायडू यांच्या
कारकीर्दीबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, माजी
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
देशातल्या सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्कनी माहिती तंत्रज्ञान
निर्यातीला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर
प्रसाद यांनी म्हटलं आहे. कोलकाता इथं भारतीय सॉफ्टवेअर पार्क इनक्युबेशन सेंटरच्या
पायाभरणी सोहळ्यात ते काल बोलत होते. देशातल्या सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्क्समधून
1992-93 साली 52 कोटी रुपये मूल्याची होणारी निर्यात 2016-17 या वर्षापर्यंत 3 लाख
50 हजार कोटी रुपयांवर पोचली आहे, असं प्रसाद यांनी यावेळी सांगितलं. देशभरात डिजिटल
समावेशकता, तसंच लिंगभाव समानता आणण्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांनी
महत्वाची भूमिका बजावली आहे, असं प्रसाद यावेळी म्हणाले.
****
आयकर विवरणपत्र भरणाऱ्यांच्या संख्येत या वर्षी
७० पूर्णांक ८६ शतांश टक्यांनी वाढ झाली आहे. या वर्षीच्या आर्थिक वर्षात गेल्या ३१
ऑगस्टपर्यंत पाच कोटी ४२ लाख आयकर विवरणपत्रे भरण्यात आली आहेत. गेल्या वर्षी ही संख्या
३ कोटी १७ लाख एवढी होती.
****
गुरुग्राम जमीन व्यवहार प्रकरणी हरयाणा पोलिसांनी
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री
भूपिंदर सिंह हुडा यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
वड्रा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट
लिमिटेड या कंपनीनं गुरुग्राममध्ये हुडा यांच्या कार्यकाळात 7 कोटी 50 लाख रुपयांची
जमीन खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी या जमिनीचा विकास करण्यासाठी हुडा यांच्या
मदतीनं व्यावसायिक परवाना मिळवून, डीएलएफ कंपनीला ती जमीन 58 कोटी रुपयांना विकली,
असं या तक्रारीत म्हटलं आहे.
****
पुण्यात ३१ डिसेंबरला घेण्यात आलेल्या एल्गार परिषद
प्रकरणी शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग आदी आरोपींना आज न्यायालयासमोर
हजर करण्यात आलं. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यास न्यायालयानं 90 दिवसांची मुदतवाढ
दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
यंदाच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शासनानं
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग स्तरावर 108 शिक्षकांची निवड केली आहे. यात 38 प्राथमिक
शिक्षक, 39 माध्यमिक शिक्षक, 18 आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक,
आदींचा समावेश आहे. येत्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी हे पुरस्कार सातारा इथं प्रदान
केले जाणार आहेत.
****
२०१८-१९ या वर्षासाठी राज्यातल्या ३० जिल्ह्यांमध्ये
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येत आहे. द्राक्ष, केळी संत्री,
मोसंबी, पेरू, डाळींब, आंबा, काजू या फळपिकांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. ज्या
महसूल मंडळात अधिसूचित फळपिकांचे क्षेत्र २० हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त आहे अश
महसूल मंडळात ही योजना आहे.
****
बुलडाणा जिल्हयातल्या पर्यटन स्थळाचा ‘अ’ दर्जा प्राप्त झालेल्या
लोणार सरोवर परिसरातील पुरातन वास्तूंची पडझड होत असून, रामगया आणि कुमारेश्वर मंदिर
परिसरातल्या पुरातन बांधकामात आढळणाऱ्या पाण्यावर तरंगणाऱ्या विटा, तसंच दगड आता फारसे दिसत नसल्यानं चिंता व्यक्त करण्यात
येत आहे. या सरोवराला २००२ मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं. मात्र
वन विभाग आणि पुरातत्व विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
******
***
No comments:
Post a Comment