Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 2 September 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
२०१७
या वर्षात दक्षिण आशियात आलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांपैकी सर्वात जास्त पर्यटक भारतात
आले होते, असं संयुक्त राष्ट्र पर्यटन संघटनेच्या आकडेवाडीत नमूद करण्यात आलं आहे.
भारतातली सुधारलेली परिस्थिती आणि व्हिसा प्रक्रियेत आलेली सुलभता हे याचं मुख्य कारण
असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. गेल्या वर्षी दीड कोटीपेक्षा जास्त पर्यटक भारतात आले़.
त्यात युरोप आणि आफ्रिकेतल्या पर्यटकांची संख्या सर्वात जास्त होती.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळात अनुसूचित जाती आणि जमातीतील लोकांवर अत्याचार
वाढले असं म्हणणं चुकीचं ठरेल, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते. मात्र जातीशी संबंधित अत्याचार देशात सुरूच आहेत,
असं सांगून सरकार कोणत्याही पक्षाचं असो, गुन्हेगारांविरूद्ध सरकारनं पावलं उचलायला
हवीत असं ते पुढं म्हणाले. २०१९ ची निवडणूक दक्षिण मध्य मुंबईतून लढवणार असल्याचे संकेतही
त्यांनी यावेळी दिले.
****
स्टेट
बँक आणि आयसीआयसीआय बँकेनं आपल्या गृह, वाहन आणि इतर कर्जांच्या व्याजदरात दोन दशांश
टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ कालपासून लागू झाली आहे. याआधी या बँकांनी द्वैमासिक
वित्तीय धोरण आढाव्याआधी जून महिन्यात कर्जाच्या व्याजदरात वाढ केली होती. रिझर्व्ह
बँकेनं जूनमध्ये रेपो दरात २५ शतांश टक्क्यांची वाढ करुन तो सहा पूर्णांक २५ शतांश
केला होता.
****
राष्ट्रपति
रामनाथ कोविंद तीन देशांच्या विदेश दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज सायप्रसला पोहोचले.
लारनाका विमानतळावर त्यांचं सायप्रसच्या उर्जा, वाणिज्य आणि उद्योग तसंच पर्यटन मंत्र्यांनी
स्वागत केलं. राष्ट्रपति तिथल्या विद्यापीठात व्याख्यान देणार असून आणि तिथल्या भारतीयांशीही
संवाद साधणार आहेत.
****
उत्तर
प्रदेशातल्या अनेक शहरांत जोरदार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सतत झालेल्या
पावसामुळं पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत पावसाशी संबधित
अनेक घटनांमध्ये राज्यात २० हून अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान गेल्या तीन
महिन्यांच्या कालावधीत देशातली आठ राज्य वगळता, इतर राज्यांत मॉन्सून सामान्य राहिला.
आणखी १५ दिवस देशात मॉनसून सक्रीय राहील, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
****
भारतीय
दूरसंचार निगम लिमिटेड-बीएसएनएलतर्फे ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेली सीडीएमए तरंग
सेवा येत्या पाच सप्टेंबरपासून कायमची बंद करण्यात येत आहे. मोबाईल क्षेत्रात वाढलेल्या
कंपन्या आणि आलेल्या नव्या तंत्रज्ञानामुळे या सेवेची मागणी कमी झाली. त्यामुळे ही
सेवा बंद करण्यात येत असल्याचं बीएसएनलच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
****
राज्य
सरकारच्या सर्व संकेतस्थळांमध्ये दिव्यांगांना वापरता येतील, अशा रितीनं बदल करावेत,
असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. स्वयंसेवी संघटनेनं दाखल केलेल्या जनहित
याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. वेबसाईट्समध्ये बदल केल्यानंतर
त्याबाबतचा अहवाल पुढच्या तीन महिन्यात सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.
****
गडचिरोलीमध्ये
नक्षलवाद्यांनी काल मध्यरात्री दोन जणांची धारदार शस्त्रानं गळा चिरुन हत्या केली.
हे दोघे जण ३५ आणि ४० वर्ष वयोगटातले आहेत. आज सकाळी त्यांचे मृतदेह सापडले. हे दोघेही
पोलिसांचे खबरे असल्याचा संशय नक्षलवाद्यांना होता. २० ते २५ सशस्त्र नक्षलवादी रात्री
सोनू पदा आणि सोमजी पदा यांच्या गावी गेले. त्यांना झोपेतून उठवून गावाबाहेर आणले आणि
त्यांची हत्या केली.
****
धुळे
शहराचा आणि पर्यायाने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा झाला तर राजकारण बाजूला ठेवून
एकत्र यायला हवं, असं प्रतिपादन माजी कृषि मंत्री शरद पवार यांनी आज धुळ्यात केलं.
विशेष निधी अंतर्गत उभारण्यात आलेल्या धुळे महानगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचं
लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. धुळे महापालिकेच्या वतीने मानपत्र
देऊन पवार यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं.
****
औरंगाबाद
महानगरपालिकेत उद्या सकाळी ११ वाजता लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी
हजर रहाण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
****
भारत
आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत इंग्लडनं भारतासमोर विजयासाठी २४५
धावांचं आव्हान ठेवलं आहे. आठ बाद २६० धावांवरून इंग्लंडनं तिसऱ्या दिवसाच्या खेळाची
सुरूवात केली. मोहम्मद शमीनं दिवसातील पहिल्याच चेंडूवर स्टुअर्ट ब्रॉडला बाद केलं.
त्यानंतर कुरननं धावसंख्या वाढवण्याचे प्रयत्न केले. पण, अतिरिक्त धाव घेण्याचा नादात
तो धावबाद झाला आणि इंग्लंडचा दुसरा डाव २७१ धावांवर गडगडला. दुसऱ्या डावाचा खेळ सुरू
केला, तेव्हा भारताच्या तीन बाद २९ धावा झाल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment