आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१९ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
सक्तवसुली संचालनालयानं फरार हीरे व्यापारी नीरव
मोदी याच्या चार हजार कोटी रुपयांच्या परदेशी संपत्तीची माहिती मिळवली असून, आर्थिक
गैरव्यवहार कायद्याअंतर्गत या मालमत्ता लवकरच जप्त केल्या जाण्याची शक्यता आहे. संचालनालयानं
यासंदर्भात अनेक न्यायालयीन विनंती पत्रं जारी केली आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर
ही पत्रं अमेरिका, इंग्लंड, स्वित्झर्लंड, हाँगकाँग या देशांना पाठवण्यात येणार आहे.
****
भारतीय पोलिस सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजय बर्वे
यांची महाराष्ट्र भ्रष्टाचार विरोधी पथकाचे महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली
आहे. गृह विभागानं काल हे नियुक्ती आदेश जारी केले.
****
राज्यातल्या आर्थिकदृष्ट्या
मागास महिलांचं, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी
प्रयत्न करण्यात येत असल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीनं बीड जिल्ह्यात अंबाजोगाई
इथं आयोजित महिलांसाठी उपजीविका वृद्धी - प्रक्रिया उद्योग कार्यक्रमात त्या
काल बोलत होत्या. बचत गटांना शासनस्तरावरुन आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, विविध प्रक्रिया उद्योगांसंदर्भात
तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत
असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत अर्जदारांच्या
तक्रारीचं निवारण करण्यासाठी औरंगाबाद इथं समुपदेशन केंद्र उभारण्यात येणार असल्याची
माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली आहे. मुद्रा योजना समन्वय समितीची जिल्हास्तरीय
बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काल झाली. त्यावेळी ते बोलत होते. या योजनेअंतर्गत
लाभार्थींना अधिकाधिक लाभ मिळावा या उद्देशानं, दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी आढावा
बैठक घेणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. हे समुपदेशन केंद्र सुरू करणारा
औरंगाबाद हा पहिलाच जिल्हा ठरणार आहे.
****
नाशिक शहरासह परिसरात काल सायंकाळच्या सुमारास पावसानं
दमदार हजेरी लावली. सुमारे दीड तासात ५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं जिल्हा प्रशासनानं
सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment