Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 18 October 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ ऑक्टोबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
§
केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांचा राजीनामा
मंजूर
§
नाशिक
जिल्ह्यातून पैठणच्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याला नाशिकचे लोकप्रतिनिधी आणि राजकीय
पक्षांचा विरोध
§
विदर्भातल्या
सिंचन घोटाळ्याचा तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश
आणि
§
ज्येष्ठ
साहित्यिक के.ज पुरोहित उर्फ शांताराम यांचं निधन
****
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री
एम जे अकबर यांनी मंत्रिपदाचा दिलेला राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला
आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार अकबर यांचा राजीनामा तात्काळ मंजूर करण्यात आला
असल्याचं राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पत्रकारितेत
असतांना अकबर यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप काही महिला पत्रकारांनी मी टू मोहिमेच्या
माध्यमातून केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या पदाचा काल राजीनामा दिला. आपल्यावर झालेल्या आरोपांविरोधात व्यक्तीगत स्तरावर लढा देणार
असून त्यासाठी राज्यमंत्री पदावरून दूर होणं संयुक्तिक असल्याचं अकबर यांनी राजीनामा
दिल्यानंतर जारी केलेल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून पैठणच्या जायकवाडी
धरणात पाणी सोडण्याला नाशिक जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांकडून विरोध
होत आहे. राज्यातला सर्वात जास्त मृत पाणीसाठा जायकवाडी धरणात असून त्यातून गरजेनुसार पाणीसाठा वापरावा अशी सूचना भारतीय जनता पक्षाच्या आमदार
देवयानी फरांदे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना केली आहे. नाशिक जिल्ह्यातले
दहा तालुके अपुऱ्या पावसामुळे दुष्काळानं होरपळत असताना मराठवाड्यासाठी पाणी देऊ नये
अशी मागणी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस
या पक्षांनी काल वार्ताहरांशी बोलतांना केली.
दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उद्या
जिल्ह्याच्या पाणी आरक्षणासाठी संबंधित यंत्रणांची बैठक घेणार आहेत.
****
उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याचं नमूद करत, पाण्याच्या
साठ्यांच्या अधिग्रहणासह चारा लागवडीचं नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी काल दिल्या. सोलापूर जिल्ह्यातल्या पर्जन्यमान, पीकस्थिती आणि राज्य शासनाच्या
विविध योजनांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी
काल घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातली विकासकामं येत्या दोन महिन्यांत पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.
राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे, मात्र आपण
याबाबत योग्य वेळी बोलू, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना
सांगितलं.
*****
विदर्भातल्या सिंचन घोटाळ्याचा तपास चार आठवड्यात
पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत. त्याचबरोबर
या सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सहभाग आहे किंवा नाही
याबाबतचे स्पष्टीकरणही चार आठवड्यात सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या
सिंचन घोटाळ्याशी संबंधित दोन जनहित याचिका न्यायालयात दाखल झाल्या असून, या याचिकांच्या
सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसल्यानं जिल्ह्यात
निर्माण झालेल्या टंचाईसदृश्य परिस्थितीला यशस्वीरीत्या हाताळण्यासाठी सगळ्या उपाययोजनांसह
प्रशासनानं सज्ज राहण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिल्या
आहेत. सिल्लोड तालुक्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर घेतलेल्या बैठकीत ते
काल बोलत होते. शासन या टंचाई सदृश्य परिस्थितीला यशस्वीपणे हाताळण्यासाठी सर्वतोपरी
प्रयत्नशील असून या सर्व परिस्थितीतून मार्ग काढून शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची,
शेतीसाठीच्या पाण्याची आणि जनावरांच्या चारा पाण्याची सोय प्रशासनामार्फत चोखपणे करण्यात
येईल, अशी ग्वाही डॉक्टर सावंत यांनी यावेळी दिली.
बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीही काल परळी
इथं आढावा बैठक घेतली. दुष्काळसदृष्य परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकार
महत्त्वाचं पाऊल उचलणार आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. याशिवाय काल त्यांनी अंबाजोगाई,
केज आणि धारूर तालुक्यातल्या गावांना भेटी देऊन पिकांची पाहणी करत लोकांशी संवाद साधला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
विजयादशमी
अर्थात दसरा आज सर्वत्र साजरा होत आहे. आज महानवमीला नवरात्रोत्सवाची सांगता होत आहे. मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं तुळजाभवानी, नांदेड
जिल्ह्यात माहूर इथं रेणुका, बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवी तसंच औरंगाबादच्या कर्णपूरा इथल्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षेसह इतर व्यवस्था
करण्यात आली आहे. तुळजापूर
इथं तुळजाभवानी देवीचा सीमोल्लंघन सोहळा आज पहाटे पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. देवीच्या
पाच दिवसांच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ होत आहे.
देवीच्या साडे तीन शक्ती पीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या
वणी इथल्या सप्तशृंगी देवी मंदिरात आज नवरात्राच्या अखेरच्या दिवशी आणि अष्टमी निमित्त
लाखो भाविकांची गर्दी झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सणानिमित्त
राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबईत शिवसेनेचा तर बीड जिल्ह्यात सावरगाव घाट इथं
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यात सावरगाव इथं
उभारण्यात आलेल्या भगवानबाबा यांच्या स्मारकाचं लोकार्पण केलं जाणार आहे.
****
धम्मचक्र
प्रवर्तन दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. यानिमित्त
आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठ परिसरालगत बुद्धलेणीच्या पायथ्याशी श्रामणेर शिबीराचं आयोजन करण्यात आलं
आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीनं नागपूर
इथं दीक्षा भूमीवर मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
****
ज्येष्ठ साहित्यिक के.ज पुरोहित
यांचं काल संध्याकाळी मुंबईत निधन झालं. ते पंचाण्णव वर्षांचे होते. साहित्य विश्वात
ते ‘शांताराम‘ या टोपणनावानं प्रसिद्ध होते. १९८९ मध्ये अमरावती इथे झालेल्या अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. राज्य सरकारच्या विंदा
करंदीकर जीवन गौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिवावर
काल रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात पंतप्रधान आवास
योजना ही गोरगरीब आदिवासी बांधवाच्या जीवनात परिवर्तन निर्माण करणारी ठरली आहे. नवापूर
तालुक्यातल्या वाटवी गावच्या जयवंती कोकणी यांनी या योजनेतून घर मिळाल्यामुळं आपल्या
जीवनात आमूलाग्र बदल झाल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या……
आमचं आधी घर
होत. कच्या विटाचं, कवलारू घराचं, कच्या भिंतीचं होत. मग ते घरकूल आलं, आम्हाला प्रधानमंत्री
आवास योजनेतून २०१७-१८ मध्ये. मग त्या पैश्यातून आम्ही चांगल्या पक्याविटाचं बाधंल.
एकदम स्वच्छ आणि प्रसंन्नता वाटेल असे घर बाधंल. आणि तिथे आमचे मूल पण प्रसन्न राहतात.
नंतर मग आम्हाला स्वच्छालय पण दिलं. मागच्या दारी आम्ही स्वच्छालय पण बाधून घेतल. सर्व
घरातील मंडली आम्ही स्वच्छालयाचा वापर करतो.
अक्कलकुवा तालुक्यातल्या भगदरी गावाचे शिंगा वसावे
यांनीही या योजनेबाबत समाधान व्यक्त केलं आहे. ते म्हणाले….
मी उमीलापाड्याचा
रहिवासी असून, माझे पहिले कुड्याचे घर होते. आता प्रधानमंत्री आवास योजनेमधून मला घरकूल
मिळाल. आम्हाला हे पक्या रूम मध्ये राहायला मिळाल. त्या बद्दल पियम साहेबांचा फार-फार
आभारी आहे. आनंद जीवन जगत आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम आणि उमरगा या तालुक्यांचा
दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करुन संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर
करण्याची मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे
केली आहे.
जिल्ह्यातले हे दोन तालुके वगळता इतर तालुक्यांचा
समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करण्यात आल्याचं आमदार ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना
लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे. भूम आणि उमरगा ता तालुक्यांमध्येही यंदा सरासरीपेक्षा
कमी पाऊस झाला असून, भूजल पातळीही खालावल्याचं ठाकूर यांनी पत्रात नमूद केलं आहे.
****
औरंगाबाद इथं मराठवाडा युवक विकास मंडळाच्या वतीनं
दरवर्षी प्रमाणे यावर्षी उद्यापासून तीन दिवस
प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. या व्याख्यान मालेत उद्या ‘शहरी नक्षलवाद - राष्ट्रीय सुरक्षेला धोका’ या
विषयावर कॅप्टन स्मिता गायकवाड या पहिलं पुष्प
गुंफणार आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment