Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 18 October 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
१८ ऑक्टोबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
आधार पत्रामार्फत जारी
केलेले मोबाईल नंबर बंद होणार नसल्याचं, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर
प्रसाद यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं, अशा मोबाईल क्रमांक धारकांना आधार
पडताळणी प्रक्रियेअंतर्गत नवीन सिमकार्ड जारी करण्यास मनाई केली आहे, जुने मोबाईल क्रमांक
बंद करण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेले नाहीत. त्यामुळे जुने मोबाईल नंबर रद्द होणार
असल्याच्या बातम्या चुकीच्या आणि निराधार असल्याचं, प्रसाद यांनी म्हटलं आहे.
या मोबाईल धारकांना
आधार पुनर्पडताळणीची सक्ती केली जाणार नसून, त्यांनी आधारच्या माहितीत बदल केला, तरच
अशी पडताळणी आवश्यक असेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दूरसंचार विभाग आणि
आधार यांच्या वतीनं नवीन सिम कार्ड जारी करण्यासाठी एक मोबाईल ॲप विकसित केलं जात असून,
ते सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या दिशानिर्देशांचं पालन करणारं असेल, असंही या
वृत्तात म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाई तहरीक
उल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा एक दहशतवादी मारला गेला. पुलवामा जिल्ह्यात आज सकाळच्या
सुमारास ही चकमक झाली, शौकत अहमद भट असं मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचं नाव असून, त्याच्या
जवळून काही शस्त्र हस्तगत केल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं. काल बुधवारी दक्षिण काश्मीरमध्ये
पोलिस पार्टीवर हातगोळ्यांनी हल्ला केल्या प्रकरणात, पोलिस शौकतच्या शोधात होते. या
हल्ल्यात तीन पोलिस जखमी झाले होते. हल्लेखोरांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आलं
होतं, तर शौकत घटनास्थळावरून पसार झाला होता.
****
त्रिवेंद्रमहून दिल्लीला
जात असलेल्या राजधानी एक्स्प्रेसचे दोन डबे आज सकाळी मध्यप्रदेशात रुळावरून घसरले.
मेगनर आणि थांडला या स्थानकांदरम्यान, भरधाव ट्रकनं बंद असलेलं फाटक तोडून, रेल्वेला
दिलेल्या धडकेमुळे हा अपघात झाला. सकाळी साडे सहाच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये
ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळी मदत कार्य सुरू झाल्याची माहिती रेल्वे
विभागाकडून देण्यात आली आहे.
****
२०१९ च्या हज यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज
भरायला आजपासून सुरुवात होत आहे, तर ऑफलाईन प्रक्रियेला येत्या २२ तारखेपासून सुरुवात
होणार आहे. भारत आणि सौदी अरेबियाच्या संबंधित विभागाला हज यात्रेकरुंसाठी चांगल्या
सुविधा पुरवण्याकरता वेळ मिळावा, यासाठी अर्ज भरण्यास नेहमीपेक्षा लवकर सुरुवात केल्याचं,
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं.
****
विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आज सर्वत्र साजरा
होत आहे. वाईटावर चांगल्याचा विजय या प्रतिकात्मक स्वरुपात हा सण साजरा केला जातो.
नवरात्रोत्सवाची आज सांगता होत आहे. या निमित्तानं आदिशक्तीची साडे तीन शक्तीपीठं म्हणजेच
माहूर इथलं रेणुका देवी मंदीर, तुळजापूर इथलं तुळजा भवानी मंदीर, कोल्हापूर इथलं अंबाबाई
मंदीर, नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथलं सप्तश्रृंगी मंदीर, तसंच अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी
देवी मंदिरात आयोजित विविध धार्मिक अनुष्ठानांची आज सांगता होत आहे.
****
धम्मचक्र प्रवर्तन दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दसऱ्याच्या
दिवशी, आपल्या लाखो अनुयायांसह नागपूर इथं बौध्द धर्माची दीक्षा घेतली होती. या अनुषंगानं,
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीनं
नागपूर इथं दीक्षा भूमीवर मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. औरंगाबाद इथं बुद्धलेणी परिसरात श्रामणेर शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद
हिंद सेनेचा ७५ वा स्थापना दिवस येत्या रविवारी २१ तारखेला साजरा होत आहे. या निमित्तानं
नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर विशेष ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी
दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून चर्चा करताना, पंतप्रधानांनी ही माहिती दिली.
दरम्यान, शिर्डी इथं, साईबाबांच्या समाधी शताब्दी
सोहळ्याची उद्या सांगता होत आहे. या समारोप सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित
राहणार असून, यावेळी पंतप्रधानांच्या उपस्थितीत पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत सुमारे
अडीच लाख घरांचा ई गृहप्रवेश होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment