Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 19 October 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ ऑक्टोबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
v प्रधानमंत्री
आवास योजनेच्या दोन लाख ५० हजार घरकुलांचा आज पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ई - गृहप्रवेश; साईबाबा विश्वस्त संस्थेच्या विविध विकास कामांचा शुभारंभही
करणार
v शिवसेना
आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात राम मंदिर बांधण्याचं आवाहन
v ऊसतोड
कामगार मंडळासाठी १०० कोटी रूपयांचा निधी राज्य शासन देणार असल्याची ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा
आणि
v दीक्षा भूमीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही- मुख्यमंत्र्यांचं
आश्वासन
****
प्रधानमंत्री आवास योजनेच्या दोन लाख ५० हजार
घरकुलांचा ई - गृहप्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज अहमदनगर
जिल्ह्यात शिर्डी इथं होणार आहे. या योजनेच्या लाभार्थींशीही, पंतप्रधान
व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. २०२२
पर्यंत सर्वांसाठी घरं धोरणाअंतर्गत राज्यात १० लाख ५१ हजार पात्र लाभार्थ्यांना
हक्काची पक्की घरं देण्याचा निर्धार सरकारनं केला आहे, त्याअंतर्गत
या दोन लाख ५० हजार घरकुलांचं काम पूर्ण झालं असून, त्यासाठी
तीन हजार ४७२ कोटी रूपये निधी खर्च आला आहे.
याचबरोबर पंतप्रधान साईबाबांच्या समाधी
शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारोहातही सहभागी होणार आहेत. यावेळी पंतप्रधान साईबाबा
विश्वस्त संस्थेच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करतील. याशिवाय शताब्दी वर्षानिमित्त
काढण्यात आलेल्या चांदीच्या नाण्याचं अनावरणही त्यांच्या हस्ते होईल.
****
विजयादशमीचा सण देशभरात काल उत्साहात साजरा करण्यात
आला. प्रथेप्रमाणे ठिकठिकाणी सायंकाळी सीमोल्लंघन तसंच रावण दहन करण्यात आलं. देशात
म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या करवीर संस्थानचा दसरा महोत्सव मानाचा समजला जातो. श्रीमंत
छत्रपती शाहू महाराज यांनी शमी पूजन करुन सीमोल्लंघन केलं.
राज्यात काल शिवसेनेनं मुंबईत, राष्ट्रीय स्वयंसेवक
संघानं नागपूरमध्ये तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातल्या सावरगाव
इथं दसरा मेळावा घेतला.
मुंबईत शिवसेनेच्या मेळाव्या बोलतांना पक्ष प्रमुख
उद्धव ठाकरे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर न झाल्यास शिवसेना रस्त्यावर तरले असा इशारा
दिला. अयोध्येला राम मंदिर कधी उभं राहणार असा सवालही ठाकरे यांनी केंद्र सरकारला यावेळी
बोलतांना केला. सरसंघचालक मोहन भागवत यांनी
राम मंदिराबद्दल शिवसेनेचेच विचार मांडले आहेत असं ठाकरे म्हणाले. लवकरात लवकर राम
मंदिर बांधावं अशी मागणी करत येत्या २५ नोव्हेंबर रोजी आपण अयोध्येला जाणार असल्याचं
त्यांनी यावेळी जाहीर केलं. सध्या सुरू असलेल्या ‘मी टू’ या मोहिमेविषयी बोलतांना ठाकरे
यांनी कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तिविरुद्ध मी टूची तक्रार आली तरी कारवाई केलीच पाहिजे
असं मत व्यक्त केलं.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या मेळाव्यात
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केलं. अयोध्येमध्ये
राम मंदिर बनल्यास देशात परस्पर सद्भावनेचं आणि सलोख्याचं वातावरण बनेल असं मत त्यांनी
यावेळी व्यक्त केलं. देशाला संरक्षणासंदर्भात स्वयंपूर्ण होण्याची आवश्यकता असल्याचं
भागवत म्हणाले. देशातलं तंत्रज्ञान अधिक बळकट करण्यावर भागवत यांनी भर दिला.
सावरगावच्या मेळाव्यात बोलतांना ग्रामविकास मंत्री
पंकजा मुंडे यांनी, निर्सगानं मराठवाड्याकडे पाठ फिरवली असली तरीही सरकार
शेतकऱ्यांकडे पाठ फिरवणार नसल्याचं, सांगितलं. ऊस तोड कामगारांसाठी आज ‘ऊसतोड कामगार मंडळ’ जाहीर होणार असल्याचं
आश्वासन त्यांनी यावेळी
दिलं. या महामंडळासाठी १०० कोटी
रूपयांचा निधी राज्य शासन देणार असल्याचं त्या म्हणाल्या. सावरगाव इथं संत भगवान बाबा
यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना यावेळी
करण्यात आली.
****
लातूर इथं पारपत्र कार्यालयाचा
शुभारंभ खासदार डॉ. सुनील गायकवाड
यांच्या हस्ते काल करण्यात आला.
आता हज यात्रेला जाणाऱ्या हज यात्रेकरुंसाठी लातूर इथून स्वतंत्र विमान सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं खासदार
गायकवाड यांनी सांगितलं. ते म्हणाले..
आज लातूरला
पासपोट सेवा केंद्रांच उदघाटन करण्यात आलं. आणि यामुळे लातूर जिल्ह्यातील आणि परिसरातील
सर्व जनतेला याचा खूप फायदा होणार आहे. लवकरच उडान सेवामध्ये लातूर वरून विमान सेवाही
सुरू करण्याविषयी माझा पर्यंत आहे. परंतू ज्या दरम्यान हजयात्रे करून साठी आपण एक विशेष
विमान याठिकाणाहून उड्डान कराव या साठी सिव्हीलेशन मिनिस्टरला विनंती केलेली आहे. आणि
निश्चितच तशी सुरूवात याठिकाणी होईल असं मला वाटत.
मराठवाड्यात उस्मानाबाद,
हिंगोली, आणि परभणी इथंही लवकरच पारपत्र
कार्यालयं सुरु
होणार असल्याची माहिती टपाल
खात्याचे विभागीय अधिकारी बी आरमुगम यांनी यावेळी दिली. या पूर्वी सुरू झालेल्या पाच
पारपत्र कार्यालयातून, आतापर्यंत ३२
हजार ४० नागरिकांनी पारपत्र काढल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
विजयादशमीबरोबरचं धम्मचक्र प्रवर्तन दिनही काल सर्वत्र
साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दसऱ्याच्या
दिवशी, आपल्या लाखो अनुयायांसह बौध्द धर्माची दीक्षा घेतली होती. या अनुषंगानं, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
स्मारक समितीच्यावतीनं नागपूर इथं दीक्षा भूमीवर मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी लाखो अनुयायांनी गर्दी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील या कार्यक्रमात
सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दीक्षाभूमीच्या विकासासाठी घोषित केलेल्या
१०० कोटी रूपयांपैकी ४० कोटी रूपयांचा धनादेश समितीकडे सुपूर्द केला. दीक्षाभूमीच्या
विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
भारतीय बौद्ध महासभेच्या परभणी जिल्हा शाखेच्या वतीनं
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पंचरंगी ध्वजाला मानवंदना देण्यात
आली. औरंगाबाद इथं बुद्धलेणी परिसरात श्रामणेर शिबीराचं आयोजन करण्यात आलं.
****
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत परभणी जिल्ह्यात
सुमारे आठ हजार कुटुंब या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. जिंतूर तालुक्यातले या योजनेचे
लाभार्थी संतोष राठोड यांना घरं मिळाल्यानं या योजनेविषयी समाधान व्यक्त करत केंद्र
शासनाचे आभार मानले आहेत. राठोड म्हणाले….
माझ्या घरावर
पहिले झोपडेपत्तर होते. पंतप्रधान आवास योजने मुळे मला माझ्या घरच्यांना या योजनांचा
फायदा झाला. आज माझ्या घरावर पक्के छत असल्याने मला उन्हापासून, पावसापासून आराम भेटल्याने
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे.
****
नांदेड रेल्वेस्थानकावर तिकीट विक्रीत ७७ लाखाहून
अधिक रूपयांचा अपहार करणाऱ्या पाच जणांना औरंगाबाद लोहमार्ग न्यायालयानं २२ ऑक्टोबरपर्यंत
पोलिस कोठडी सुनावली आहे. मुख्य बुकिंग सुपरवायझरसह अन्य चार कर्मचाऱ्यांनी गेल्या
आठ दिवसात तिकीट विक्रीतून जमा झालेली रक्कम बँकेत जमा न करता हा अपहार केला आहे.
****
अर्जेंटिना इथं सुरु असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत
तिरंदाजीमध्ये भारताच्या आकाश मलिक यानं रौप्य पदक पटकावलं आहे. युवा ऑलिम्पिक स्पर्धेत
तिरंदाजीत पदक मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला
आहे. भारतानं या स्पर्धेत तीन सुवर्ण आणि नऊ रौप्य पदकासह एकूण १३ पदकं जिंकली.
डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत
सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर
असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीचा तिनं २१-१५,२१-१७ असा पराभव केला.
****
भीमा - कोरेगांव प्रकरण तसंच कथित माओवाद्यांशी संबंध
असल्याच्या संशयावरून अटकेत असलेले कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी त्यांच्या विरुद्ध
पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात
दाद मागितली असून आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे. आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवलं
जात आहे आणि आपल्या विरुद्ध कोणताही पुरावा नसल्यानं प्रथम माहिती अहवाल रद्द करावा,
अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment