Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 October 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००
****
केंद्र
सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करणार असून दुष्काळ निवारणासाठी निधी कमी पडू दिला
जाणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज शिर्डी इथं, पंतप्रधान
आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरांचं वाटप केल्यानंतर आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ लोकांना मोठ्या प्रमाणावर झाला असून, गेल्या चार वर्षात
आपल्या सरकारनं एक कोटी पंचवीस लाख घरं बांधल्याचं त्यांनी सांगितलं.
****
सीमेवर
शत्रूची शस्त्रं जोपर्यंत शांत आहेत, तोपर्यंत भारताची शस्त्रंही शांत राहतील, असं
प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज राजस्थानमध्ये बिकानेर
इथं सीमा सुरक्षा दलाच्या शस्त्र पूजनानंतर जवानांना संबोधित करत होते. जम्मू काश्मीरमध्ये
नियंत्रणरेषेवर, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं उभारलेल्या अभेद्य भिंतीमुळे घुसखोरीच्या
प्रमाणात मोठी घट झाल्याचं नमूद करत, लवकरच देशाच्या संपूर्ण सीमेवर अशी भिंत उभारली
जाईल आणि त्यामुळे देश अभेद्य किल्ल्यासारखा होईल, असं सिंह यांनी सांगितलं.
****
बेल्जीयमची
राजधानी ब्रुसेल्स इथं बाराव्या आशियाई-युरोप बैठकीअंतर्गत शिखर वार्ता सुरू आहे. भारतासह
आशिया आणि युरीपमधील ५१ देशांचे प्रमुख सहभागी असलेल्या या शिखर वार्तेला काल संध्याकाळी
प्रारंभ झाला आहे. उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यामध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळाचं
नेतृत्त्व करत आहेत. हे द्वीवार्षिक आयोजन, व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा आणि पर्यटनाच्या
क्षेत्रात आशिया आणि युरोपदरम्यान संवाद आणि सहकार्याचं सर्वात मोठं माध्यम असून जागतिक
आव्हानांसाठी जागतिक भागीदारी हा याचा विषय आहे. उपराष्ट्रपती नायडू हे ब्रुसेल्स इथल्या
जैन सांस्कृतिक केंद्रामध्ये अनिवासी भारतीयांना या दरम्यान मार्गदर्शनही करणार आहेत.
****
स्वदेशी
उद्योगांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी भारतानं चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या पोलादाच्या
विशिष्ट प्रकारांच्या आयातीवर येत्या पाच वर्षांसाठी प्रति टन सुमारे एकशे शहाऐंशी
अमेरिकी डॉलर्स इतकं शुल्क लावलं आहे. काही स्वदेशी स्टील उद्योगांनी चीनच्या स्टीलच्या
उत्पादनांवर असं शुल्क लावण्याची मागणी केली होती. चीनकडून कमी गुणवत्तेच्या स्वस्त
वस्तू निर्यात केल्या जात असल्यानं स्वदेशी उद्योगांचं नुकसान होत होतं, हे लक्षात
घेत महसूल विभागानं हा निर्णय घेतला आहे.
****
मानवाधिकार
कार्यकर्ता आनंद तेलतुंबडे यांना २६ ऑक्टोबरपर्यंत अटक करू नये, असे आदेश मुंबई उच्च
न्यायालयानं आज दिले आहेत. एल्गार परिषद प्रकरणी, माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून
पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका तेलतुंबडे
यांनी केली होती, त्यावर न्यायालयानं हा निर्णय दिला.
****
स्वच्छता
अभियानांतर्गत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी
जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसर स्वच्छ केला.
****
शहरांमध्ये
दाट लोकवस्तीच्या भागात आरोग्य सेवा देण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत
सुरु करण्यात आलेल्या फिरत्या वैद्यकीय पथकाचं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या
हस्ते मुंबईत आज लोकार्पण करण्यात आलं. आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत, परिवहन मंत्री
दिवाकर रावते यावेळी प्रमुख उपस्थित होते. या योजनेच्या माध्यमातून मुंबईमध्ये पाच
तर नागपूर, नांदेड, औरंगाबाद, नवी मुंबई-पनवेल आणि कोल्हापूर या शहरांमध्ये प्रत्येकी
एक अशी दहा फिरती मोबाईल वैद्यकीय पथकं कार्यान्वित होणार आहेत.
****
मानवी
साखळी आंदोलन संघटक समिती ‘वाढती बेरोजगारी आणि सर्वांना शिक्षणाच्या समान संधी’, यासह
विविध मागण्यांसाठी औरंगाबाद इथं परवा-रविवारी मानवी साखळी आंदोलन करणार आहे. शहरातल्या
पैठणगेट ते क्रांतीचौक दरम्यान संध्याकाळी पाच वाजता हे मानवी साखळी आंदोलन होणार असल्याचं,
आंदोलक संघटनेचे अध्यक्ष प्रा.जयदेव डोळे आणि समन्वयक श्रीकांत फोपसे यांनी कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment