Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 17 October 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१७ ऑक्टोबर
२०१८ सकाळी ७.१०
मि.
****
·
आगामी तीन वर्षांत राज्यात एक लाख सौर कृषी
पंप बसवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
·
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात
तीन टक्के वाढ.
·
लातूरसाठी उजनी धरणातून २५ टीएमसी पाणी प्रस्तावाला
गती देण्याचे राज्यपालांचे निर्देश.
आणि
·
३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचं २७
आणि २८ ऑक्टोबरला जालना इथं आयोजन.
****
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत आगामी
तीन वर्षांत राज्यात एक लाख कृषी पंप बसवण्यात येणार आहेत. काल झालेल्या मंत्रिमंडळ
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापैकी २५ हजार पंप चालू आर्थिक वर्षात बसवण्यात येणार
आहेत. यामुळे कृषी पंपासाठी वीज पुरवठ्याचा महावितरणवर येणारा ताण कमी होईल, अशी अपेक्षा
आहे. यासाठी सर्वसाधारण लाभार्थींना पंपाच्या रक्कमेच्या दहा टक्के तर अनुसूचित जाती-जमातीच्या
लाभार्थींना केवळ पाच टक्के हिस्सा द्यावा लागणार आहे. या योजनेत पाच एकर क्षेत्र असलेल्या
शेतकऱ्यांना तीन अश्वशक्ती क्षमतेचे आणि पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्र धारण करणाऱ्या
शेतकऱ्यांना पाच अश्वशक्ती क्षमतेचे पंप बसवता येणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी महावितरण
मार्फत करण्यात येणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती योजनेच्या लाभार्थींची
निवड करेल.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतल्या प्रकल्पांसाठी
मिळणारं केंद्रीय अर्थसहाय्य आणि राज्य हिश्शापोटी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास
बँक-नाबार्डकडून मिळणारं कर्ज, तसंच बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत नाबार्डचा कर्ज
निधी महामंडळाच्या खात्यात थेट जमा करण्यासही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली.
****
ऊर्जा विभागानं लोकहिताच्या आणि लोकाभिमुख
अशा महत्त्वाकांक्षी तीन योजना सुरु केल्या असून, शेतकऱ्यांना आणि जनतेला याचा मोठ्या
प्रमाणात लाभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईत काल मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले सौर ऊर्जा प्रकल्प,
विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स आणि शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला नवीन वीज जोडणी देण्याकरता
उच्चदाब वितरण प्रणाली या तीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी
ते बोलत होते. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, मागेल त्याला मुख्यमंत्री सौर
कृषी वाहिनी देण्यात येईल, असं आश्वासन यावेळी दिलं.
****
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात
तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. हा भत्ता आता १३९ टक्क्यांवरुन
१४२ टक्के करण्यात आला आहे. १ जानेवारी २०१८ पासून हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावानं
लागू होणार आहे. १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या ९ महिन्यांच्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे
आदेश निर्गमित केले जातील, तर एक ऑक्टोबरपासून हा भत्ता रोखीनं देण्यात येईल, असं याबाबतच्या
शासन आदेशात म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारनं सर्वसाधारण भविष्य निर्वाह
निधीच्या व्याजदरात ० पूर्णांक ४ दशांश टक्के वाढ करून तो आता ८ टक्के एवढा केला आहे.
केंद्र सरकारचे कर्मचारी, रेल्वे आणि संरक्षण दलांच्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू
असेल.
****
लातूरचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उजनी
धरणातून २५ टीएमसी पाणी आणण्याचा प्रस्ताव तयार करण्याला गती देण्याचे निर्देश राज्यपाल
सी.विद्यासागर राव यांनी दिले आहेत. मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड
यांनी काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. मराठवाडा विकास मंडळाची
बैठक राज्यपालांच्या उपस्थितीत काल प्रथमच लातूरला झाली. या बैठकीविषयी अधिक माहिती
देताना डॉ.कराड म्हणाले........
मराठवाड्यासाठी ज्या ज्या
भागातून पाणी आणता येईल, त्या त्या भागातून पाणी आणण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच लातूरचा
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी आम्ही मागणी केली आणि लातूरच्या
पाण्यासाठी माननीय राज्यपाल यांनी आम्हाला निर्देश दिले की, डिटेल्ड प्रोजेक्टर रिपोर्ट
बनवा आमच्याकडे सबमीट करा पैशाची कमी पडणार नाही. पण लातूरकरांच्या प्रत्येकाच्या घरात
पाणी गेलं पाहिजे. आणि त्यासाठी उजनी धरणातून जर २५ टीएमसी पाणी आपणाला मिळालं आणि
लातूरकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल असं मला वाटतं.
जालना, परभणी आणि उस्मानाबाद या ठिकाणी वैद्यकीय
महाविद्यालय सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात
सोलार पार्कची उभारणी करण्यात यावी, प्रत्येक तालुक्यातल्या उत्पादनानुसार कृषी उत्पादनावर
प्रक्रिया उद्योगाची उभारणी करून शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्याबाबतही या बैठकीत
चर्चा झाल्याचं डॉ कराड यांनी सांगितलं.
****
विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना
कौशल्याभिमुख शिक्षण दिलं गेलं पाहिजे, असं राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी म्हटलं
आहे. लातूर इथं काल राजर्षी शाहू महाविद्यालयात आयोजित ‘उच्च शिक्षणातील नवे पैलू’
या विषयावरच्या राष्ट्रीय खुल्या चर्चासत्रात ते बोलत होते. आपली शिक्षण पद्धती ही
भारतीय संस्कृतीशी निगडीत असली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. दरम्यान, राज्यपालांनी
काल लातूर इथल्या विवेकानंद कर्करोग उपचार रूग्णालयालाही भेट देऊन, या रूग्णालयातल्या
अद्ययावत यंत्रसामुग्रीची पाहणी केली.
****
जालना इथं येत्या २७ आणि २८ ऑक्टोबर दरम्यान
३५ व्या ‘अस्मितादर्श साहित्य संमेलना’चं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यापीठ अनुदान
आयोगाचे माजी अध्यक्ष तथा प्रख्यात विचारवंत डॉ.सुखदेव थोरात यांच्या हस्ते या साहित्य
संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती, प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली. या
दोन दिवसीय साहित्य संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानचा ‘कवयित्री
शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार’ यंदा हिंगोली इथल्या प्राध्यापक संध्या रंगारी
यांना जाहीर झाला आहे. रंगारी यांच्या “वाताहतीची कैफियत” या कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार
देण्यात येणार आहे. येत्या रविवारी २१ तारखेला पुणे जिल्ह्यात मंचर इथं या पुरस्कारांचं
वितरण होणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातले उस्मानाबाद, तुळजापूर,
कळंब, परंडा आणि वाशी या पाच तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीमध्ये नव्यानं
समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी लोहारा या एकमेव तालुक्याचा या यादीत समावेश होता.
पावसाअभावी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या गावात आवश्यक त्या उपाययोजना करण्यास
शासनानं प्राधान्य दिलं असून आता याचा लाभ या तालुक्यांनाही मिळणार आहे. उर्वरित उमरगा
आणि भूम तालुक्यांसाठीही शासनाकडून उपाययोजना करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या पत्रात
नमूद केलं आहे.
****
प्रधानमंत्री जनऔषधी योजनेमुळे आर्थिक बचत
होत असल्याचं दिसून येत आहे. बाजारात मिळणारी औषधी आणि प्रधानमंत्री जनऔषधीच्या किमंतीत
मोठा फरक असल्यामुळे रुग्ण ही औषधी गरजेनुसार खरेदी करत आहेत.
लातूरचे सुनिल गवळी यांनी जनऔषधीमुळे आईच्या
मधुमेह विकाराच्या औषधोपचाराचा खर्च कमी झाल्याचा अनुभव व्यक्त केला. ते म्हणाले….
माझ्या आईला बऱ्याच दिवसांपासून
बीपी आणि शुगरचा त्रास होता. रुग्णालयात ट्रिटमेंट चालू होती. मेडिकलचा खर्च साधारण
१२०० ते १५०० यायचा. परंतू डॉक्टरनी मला परत जेनेरिक औषधी बदलून दिल्यामुळे तीच औषधं
मला ३५० रुपये महिन्याचं पडतं. त्याच्यामुळे मी नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे, धन्यवाद.
लातूरचेच नारायण पावले यांच्या पत्नीला सतत
डायलिसीस करावे लागते. त्यासाठी लागणाऱ्या इंजेक्शनच्या खर्चात बचत होत असल्याबद्दल
त्यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
माझी मिसेस डायलेसिसवर असते
गेली २ वर्ष झालं आणि तिला लागणारी काही इंजेक्शन्स असतात. ते इंजेक्शन मला बाजारात
३४०० रुपये एमआरपीने मिळतात. आणि जेव्हापासून जेनेरिक औषधांचा पुरवठा सुरु झाला, जेनेरिक
दुकानं चालु झालीत मला तेच इंजेक्शन मला ७२५ रुपयांत मिळतं. म्हणजे माझा आर्थिक ताणतणाव
पण कमी झाला. आणि औषधांचा तोच प्रकार आणि तिच औषधं कमी किंमतीत मिळतात त्यामुळे मी
आभार मानतो.
****
राज्य शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य
योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या पथकानं कोल्हापूर आणि
इचलकरंजी या शहरातल्या खाजगी रुग्णालयांवर कारवाई केली आहे. या योजनेमध्ये कोल्हापूर
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारींवरून गेल्या चार दिवसांपासून
सुरू असलेल्या या कारवाईत, कोल्हापूर शहरातल्या चार रुग्णालयांचा जीवनदायी परवाना रद्द
करण्यात आला तर ११ रुग्णालयांवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीची काल भवानी
तलवार अलंकार पूजा मांडण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना देवीने तलवार देऊन
दुष्टांचा संहार करण्यासाठी आशीर्वाद दिले होते, अशी आख्यायिका आहे, ही पूजा पाहण्यासाठी
काल भाविकांची अलोट गर्दी उसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद नजिक पडेगाव इथं कार आणि दुचाकीची
धडक होऊन दुचाकीस्वार दोन तरुणांचा मृत्यू झाला. काल सायंकाळी हा अपघात झाला.
****
No comments:
Post a Comment