Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 04 November 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
०४ नोव्हेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
एलपीजी अर्थात स्वयंपाकाच्या गॅसशी संबधित सेवा
लोकांपर्यंत पोचवण्यासाठी तेल कंपन्या आणि सर्वसाधारण सेवा केंद्रांनी एका सामंजस्य
करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. एलपीजी सिलेंडर भरणा, गॅससाठी
नवीन नोंदणी आणि सिलेंडरचं वितरण आता सीएससीच्या माध्यमातून
शक्य होणार आहे. नवी दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान,
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत या
करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना गॅस - सेवा उपलब्ध
होण्याच्या दृष्टीनं हा करार महत्त्वाचा ठरेल, असं प्रधान
यांनी सांगितलं. कौशल्य विकास आणि उद्योजकता
मंत्रालयही भविष्यात सीएससीच्या सेवेचा लाभ घेऊ शकेल,
असं प्रधान यावेळी म्हणाले.
****
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात खुडपोरा गावात काल
रात्री सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले.
गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, केंद्रीय
राखीव पोलिस दल आणि विशेष कृती दलाच्या संयुक्त पथकानं या परिसराला घेराव घालून
शोधकार्य सुरू केलं. सुरक्षा दलाचे जवान जवळ आल्याचं पाहाताच दहशतवाद्यांनी
गोळीबार सुरू केला.
****
रेल्वे सुरक्षा दलानं ई-तिकिटांची
दलाली करणाऱ्यांविरोधात छापासत्र सुरू केलं आहे. देशातल्या शंभरहून अधिक
शहरांमध्ये छापे टाकण्यात येत असून, गेल्या शुक्रवारी झालेल्या कारवाईत १८५ जणांना अटक
करण्यात आली, तसंच ३६ लाख रुपये किंमतीची सुमारे एकोणीसशे ई-तिकीटं जप्त करण्यात
आली. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत असून, आतापर्यंत
एकूण ८९१ दलालांना ताब्यात घेण्यात आलंय, तर दीड कोटी रुपयांची तिकिटं
जप्त करण्यात आली आहेत.
****
छत्तीसगडमध्ये निवडणूक
प्रक्रियेला वेग आला असून, येत्या १२ तारखेला पहिल्या टप्प्यातलं मतदान १८ मतदार
संघांमध्ये होणार आहे. विविध पक्षांचे नेते प्रचार सभा घेत आहेत. राज्यात एकूण ९०
मतदारसंघ असून, दुसऱ्या टप्प्यातल्या अर्जांची छाननी काल झाली. उमेदवारी
अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या संपत आहे. येत्या २० तारखेला ७२ जागांसाठी मतदान
होईल.
****
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं १५५
उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मोरेनामध्ये रघुराज सिंग कसाना, ग्वाल्हेरमध्ये
प्रद्युम्न सिंग तोमर, सागरमध्ये नेवी जैन यांना तिकीट मिळालं आहे, तर
सिरमोरमध्ये अरुण तिवारी यांना उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या
काल नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत ही नावं निश्चित करण्यात आली.
****
दिपावलीच्या सणाचा उत्साह सर्वत्र दिसत आहे. आज
वसुबारस, अश्विन वद्य द्वादशी हा गोठ्यातल्या पशुधनाची पूजा करण्याचा दिवस मानला जातो.
खरेदीसाठी बाजारपेठांमधे तुडुंब गर्दी आहे. विविध रंगांचे आणि आकृत्यांचे
आकाशकंदील, रोषणाईचं साहित्य, फुलं, रांगोळीचे रंग, पणत्या अशा वस्तूंनी
बाजार फुलले आहेत.
****
अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत सुमारे चारशे लोकांवर
तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी
दिली आहे. उमेदवारांना
उत्पन्न स्रोताबाबत शपथ पत्र, यापूर्वी
निवडणूक लढवली असेल तर मागील निवडणुकीत दिलेल्या उत्पन्नाचा गोषवारा, तसंच
मतदार संघात काय विकास योजना राबवणार याबाबत शपथ पत्रात उल्लेख करावा लागणार आहे,
असं निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित पत्रकार परिषदेत द्विवेदी यांनी
सांगितलं.
****
मुंबई पुणे - मुंबई दरम्यान धावणाऱ्या प्रगती एक्सप्रेसचं
मध्य रेल्वेनं 'उत्कृष्ट रेक'च्या धर्तीवर अद्ययावतीकरण केलं आहे. आजपासून या
अद्ययावत रेल्वेत प्रवास सुरु करण्यात आला. मध्ये रेल्वे 'उत्कृष्ट रेक'च्या आणखी
पाच रेल्वेगाड्या सेवेत आणणार असल्याची माहिती रेल्वेचे
मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.
****
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय
- घाटीचा बाह्य रुग्ण विभाग येत्या सात नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनानिमित्त शासकीय
सुट्टी असल्यामुळे बंद राहणार आहे. मात्र आठ नोव्हेंबरला रूग्णालय सुरू राहणार असल्याचं
वैद्यकीय अधीक्षकांनी कळवलं.
****
जर्मनीत सुरू असलेल्या सार्लो खुल्या बॅडमिंटन
स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज भारताचा शुभंकर डे आणि इंग्लंडचा
राजीव ओसेफ यांच्यात होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शुभंकरनं
चीनच्या पेंगबो रेन याचा, पराभव केला.
****
भारत आणि वेस्टइंडीज दरम्यान होणाऱ्या तीन टी-ट्वेंटी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज कोलकाता इथं होणार आहे.
संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती
देण्यात आल्यानं, भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माच्या हाती देण्यात
आलं आहे. महेंद्रसिंह धोनीच्या जागेवर ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment