Sunday, 4 November 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 04.11.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 4 November 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ४ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

देशात आयुर्वेदाच्या प्रसारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज ‘उद्योजकता आणि व्यापार विकास’ या विषयावरच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. आयुर्वेदाची बाजारपेठ वाढावी यासाठी सरकार गेल्या चार वर्षांपासून विविध प्रकारे पुढाकार घेत असल्याचं, तसंच देशात २० लाख आयुर्वेदीय औषधं उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले. नवउद्योजकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आयुर्वेदात जागतिक स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचं नाईक यांनी सांगितलं.

****

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या सीमा सुरक्षा बलाच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे. पंजाबच्या फिरोजपूरमधल्या ममदोट पोलीस स्टेशनमध्ये बीएसएफच्या २९व्या बटालियनमध्ये ऑपरेटरचं काम करणारा जवान शेख रियाजउद्दीन हा आयएसआय संघटनेला गुप्त माहिती पुरवत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग अठराव्या दिवशी घट झाली. आज मुंबईत पेट्रोलच्या दरात २१ पैशांनी, तर डिझेलच्या दरात १८ पैशांनी घट झाली. आता मुंबईत पेट्रोलसाठी ८४ रुपये २८ पैसे, तर डिझेलसाठी ७६ रुपये ८८ पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या अठरा दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत चार रुपये पाच पैसे, तर डिझेलच्या किंमतीत दोन रुपये ३३ पैसे घट झाली आहे.

****

भारतीय नौदलातले माजी व्हाईस अॅडमिरल मनोहर प्रल्हाद तथा एम. पी. आवटी यांचं आज पहाटे सातारा जिल्ह्याल्यात विंचुर्णी इथं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. १९७१ च्या बांग्लादेश युध्दात त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल वीरचक्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आवटी यांनी पुण्यात खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख, नौदल मुख्यालयातल्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख, मुंबईतल्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिलं होतं. याच पदावरून मार्च १९८३ मध्ये ते निवृत्त झाले होते.

****

औरंगाबाद इथं आज तिसऱ्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महोत्सवाचं उद्घाटन झालं. उद्घाटनानंतर भिक्खू संघानं धम्मदेसनेतून उपदेश दिला. व्यावहारिक जीवनात सद्सद्विवेक बुध्दीचा वापर करून जीवनात वाटचाल केली पाहिजे, असं यावेळी सांगण्यात आलं. सायंकाळी या महोत्सवाचा समारोप केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत होणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या इसापूर धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूरच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्राला, इसापूर धरण, जलाशय, नदी, नाल्यावरच्या, तसंच मुख्य कालव्यावरच्या प्रवाही आणि मंजूर उपसा सिंचन योजना धारकांना हे पाणी मिळणार आहे. रब्बी हंगामात तीन आणि उन्हाळी हंगामात चार पाळ्या पाणी देण्याचं प्रस्तावित आहे. इसापूर धरणात सध्या सरासरी ६६ टक्के इतका पाणीसाठा आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं. बाजार समितीसाठी काल झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी करण्यात आली. एकूण १५ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं नऊ, काँग्रेसनं चार, तर भारतीय जनता पक्षानं दोन जागांवर विजय मिळवला.

****

अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी मुंबईचा माजी रणजीपटू सौरभ नेत्रावळकर याची नियुक्ती झाली आहे. सौरभ डावखुरा जलदगती गोलंदाज असून २०१० साली झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्यानं भारतीय संघातून खेळताना सर्वाधिक बळी टिपले होते.

****

भारत आणि वेस्टइंडीज दरम्यान होणाऱ्या तीन टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज कोलकाता इथं होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यानं, भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माच्या हाती देण्यात आलं आहे. महेंद्रसिंह धोनीच्या जागेवर ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं आहे. वेस्ट इंडीजचं नेतृत्व कार्लोस ब्राथवे करणार आहे.

****

राज्यात येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होईल, तर मराठवाड्यात आणि विदर्भात हवामान कोरडं राहील, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. आज सर्वात कमी १८ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तपामान महाबळेश्वर इथं नोंदवण्यात आलं. दरम्यान, आज नाशिक आणि सातारा शहर परिसरात पावसानं हजेरी लावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.   

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...