आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०७
फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.००
वाजता
****
रिजर्व्ह बँक आज चालू आर्थिक वर्षातल्या सहाव्या
द्वैमासिक पतधोरणाचा आढावा जाहीर करणार आहे. बँकेच्या मौद्रिक धोरण समितीची परवा मंगळवारपासून
मुंबईत बैठक सुरू आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नियुक्तीनंतर तसंच केंद्राच्या
अंतरिम अर्थसंकल्पानंतरचं हे पहिलंच आर्थिक धोरण आहे. गेल्या दोन धोरणांप्रमाणे या
ही वेळेस, व्याजदर आहेत तेच कायम राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
****
नांदेड जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत
एकूण ३८४ गावांची निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक आर बी चलवदे
यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि
वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी पन्नास टक्के अनुदान दिलं जातं.
****
लातूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री
किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी ग्रामपातळीवर प्रसिध्द
करण्यात येणार आहे. या यादीवर आक्षेप असल्यास शेतकऱ्यांनी येत्या १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत
तलाठ्याकडे लेखी आक्षेप नोंदवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या बिलोलीच्या नगराध्यक्षा मैथिली
कुलकर्णी यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं
स्थगिती दिली आहे. कुलकर्णी यांनी २०१२-१३ मध्ये नगरसेवक असतांना, प्रवास आणि इतर भत्यांच्या
रक्कमेचा हा अपहार केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या तत्कालीन नगरसेवकांनी केला
होता, त्यावरुन नगरविकास राज्यमंत्र्यांनी हा अपात्रतेचा आदेश जारी केला होता. खंडपीठानं
काल त्यावर स्थगितीचे आदेश दिले.
****
वृक्षारोपण तसंच जल पुनर्भरणातून वातावरणाचा समतोल
राखणं आवश्यक असल्याचं, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी म्हटलं आहे. काल बीड जिल्ह्यात
अंबाजोगाई इथं दुष्काळमुक्ती संवाद यात्रेचा प्रारंभ तसंच राष्ट्रीय पाणी परिषदेचं
उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पर्यावरण संवर्धनाशी निगडित विविध समस्यांवर यावेळी
चर्चा करण्यात आली.
*****
***
No comments:
Post a Comment