Saturday, 9 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 09.02.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०९ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात तापमानात घट झाली आहे. गारपीट, पाऊस आणि वातावरणातल्या बदलामुळे सातारा जिल्ह्यात थंडीत वाढ झाली आहे. आज सर्वात कमी तापमान महाबळेश्वर इथं नोंदवलं गेलं.



 रायगड जिल्ह्यातही हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. कोकण किनारपट्टीवर ताशी ३५ ते ४० किलोमीटरचे वारे उत्तरेकडून पश्चिमेकडे वाहू लागले. येत्या २४ तासात वादळी वाऱ्यामुळे हानी पोहोचण्याची शक्यता असल्यानं मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.



 अहमदनगर जिल्ह्यातही थंडीच्या कडाक्यामुळे जनजीवनावर परिणाम होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 येत्या लोकसभा निवडणूकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा महाराष्ट्रात प्रचारासाठी येतील अशी आशा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. ते काल पुणे इथं वार्ताहरांशी बोलत होते. आज दिल्ली इथं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होत असू, त्यामध्ये गांधी यांना याबाबतची विनंती करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

****



 राज्यात असलेली दुष्काळसदृश्य परिस्थिती, खाजगी वाहतुकीची स्पर्धा तसंच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर आणि माफक दरात व्हावा या उद्देशानं राज्य मार्ग परिवहन महामंडळानं वातानुकूलित शिवशाही शयनयान बसच्या प्रवास भाड्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. भाडेदरात कमीत कमी २३० ते ५०५ रूपये कपात करण्यात आली असल्याची घोषणा परिवहन मंत्री रावते यांनी केली. कमी झालेले नवीन दर येत्या १३ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येत आहेत.

****



 दोन महिन्याचं थकीत वेतन तत्काळ द्यावं, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी लातूर महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी काल महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं. पालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली आणि आंदोलन मागं घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर सायंकाळी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 July 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...