Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 12 February 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२
फेब्रुवारी २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø २०१९ चा अंतरिम अर्थसंकल्प काल लोकसभेत विरोधकांच्या गदारोळातच
आवाजी मतदानानं मंजूर
Ø महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून गड किल्ल्यांचं
जतन आणि संवर्धन होणार
Ø औरंगाबादच्या पाणी पुरवठा योजनेसाठीच्या खर्चाला अर्थसंकल्पात
विशेष बाब म्हणून समाविष्ट करावं - डॉक्टर भागवत कराड
आणि
Ø शिवसेना शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळवून देणारच
- युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दावा
****
२०१९ चा अंतरिम अर्थसंकल्प काल लोकसभेत विरोधकांच्या
गदारोळातच आवाजी मतदानानं मंजूर झाला. लेखानुदान विधेयक आणि विनियोजन विधेयक २०१९लाही
सभागृहानं मंजूरी दिली. अंतरिम अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री
पियुष गोयल यांनी नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देश सातत्यानं विकासाच्या मार्गावर
अग्रेसर असल्याचं सांगितलं. आर्थिक तूट तीन पूर्णांक चार दशांश टक्क्यापर्यंत कमी करण्यात
तर चलनवाढीचा दर देखील दोन पूर्णांक १९ शतांश टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात सरकार यशस्वी
ठरल्याचं ते म्हणाले. करांमध्ये सवलत देऊन मध्यमवर्गीयांनाही सरकारनं दिलासा दिल्याचं
गोयल यांनी सांगितलं. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीमुळे शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा मिळू
शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २२ पिकांच्या किमान हमी भावात सरकारनं दीडपट
वाढ केल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, अर्थसंकल्पावरच्या चर्चेला अर्थमंत्री उत्तर
देत असताना आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी तेलगु देसम पक्षाच्या
सदस्यांनी तर राफेल विमान खरेदी प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशीसाठी कॉंग्रेसच्या
सदस्यांनी घोषणाबाजी सुरु ठेवली होती. चर्चेदरम्यान, कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग
केला.
****
राज्याच्या एकात्मिक जल आराखड्याला राज्य जल परिषदेनं
काल मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या
सहाव्या जल परिषदेच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. या जल आराखड्यात २०३० पर्यंतच्या
पाण्याच्या मागणीचं उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून, सर्व नदी खोऱ्यातल्या पाण्याचं नियोजन
करण्यात आलं आहे. हा जल आराखडा जुन्या प्रस्तावित जल वापर, अकृषक वापर, लोकसंख्या आणि
इतर घटकांवर आधारित आहे. पाणी प्रदुषण आणि पर्यावरण व्यवस्थापनाचं नियोजनही या जल आराखड्यात
करण्यात आलं आहे.
****
आदिवासींना वन हक्काचे सातबारा
उतारे देण्यासंदर्भात विशेष मोहीम सुरु करुन हे काम एका महिन्यात पूर्ण करण्याच्या
सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. जनजाती सल्लागार
परिषदेच्या पन्नासाव्या बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. यापैकी कोणालाही एक एकरपेक्षा
कमी जमीन देऊ नये, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना
त्यांच्या मोबाईल क्रमांकाद्वारे परीक्षा क्रमांक देण्याच्या पध्दतीमुळे अप्रत्यक्षपणे
नक्कल करण्याला उत्तेजन मिळालं आहे, असा आरोप प्रदेश युवा काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत
तांबे यांनी केला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. यामुळे अनेक उमेदवारांनी
गैरमार्गाचा अवलंब केला असून, गरीब, मागासवर्गीय आणि आदिवासी उमेदवार स्पर्धेच्या बाहेर
फेकले गेले, असं ते म्हणाले.
****
यवतमाळ जिल्ह्यातल्या प्रत्येक खेड्यात ‘मागेल त्याला
अन्न” ही मोहीम राबवणार असल्याची माहिती, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष
किशोर तिवारी यांनी दिली आहे. या जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातल्या बारड तांडा या
पारधी बेड्यात ‘मागेल त्याला अन्न’ या योजनेचा शुभारंभ करतांना ते काल बोलत होते. यावेळी
बावन्न पारधी कुटुंबांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकांचं वाटप करून ह्या महिन्याचे
३५ किलो धान्य देण्यात आलं. पश्चिम विदर्भ
आणि मराठवाड्यात शंभर टक्के अन्न सुरक्षा देण्यात आली असून खेड्यातलं एकही कुटुंब अन्नापासून
वंचित राहणार नाही, असं तिवारी यांनी सांगितलं.
****
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून गड
किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन करण्याची घोषणा पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार
रावल यांनी काल केली. रायगड किल्ल्यावर काल झालेल्या दुर्ग परिषदेत ते बोलत होते. यावेळी,
‘अभिमान महाराष्ट्र : गड किल्ले संवर्धन’ या योजनेचीही त्यांनी घोषणा केली. या योजनेतून
गड किल्ल्यांचं संवर्धन ही लोक चळवळ होईल असा विश्वास रावल यांनी यावेळी व्यक्त केला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी येणाऱ्या
खर्चाला येत्या अर्थसंकल्पात विशेष बाब म्हणून समाविष्ट करण्याची विनंतीही राज्यपालांना
करणार असल्याचं मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलं आहे.
काल औरंगाबाद इथं सिंचन योजनांची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. येत्या सोळा
तारखेला राज्यपालांसोबत होणाऱ्या बैठकीत औरंगाबादचा पाणी प्रश्न मांडणार असल्याचं त्यांनी
सांगितलं. औरंगाबाद आणि लातूर शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठीच्या नियोजित योजनांचं
ढोबळ अंदाजपत्रक सादर करावं, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कृष्णा मराठवाडा
उपसा सिंचन योजना क्रमांक एक अंतर्गत, धनेगाव-
मांजरापर्यंत जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी, अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, तसंच,
औरंगाबादच्या पाणी पुरवठ्यासाठी, पुढच्या पंचवीस वर्षांचं नियोजन करून, मंडळाकडे
ढोबळ अंदाजपत्रक तत्काळ सादर करण्याची सूचना कराड यांनी केली
****
शिवसेना शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळवून देणारच,
असा दावा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या
मौजे चलबुर्गा, बुधोडा आणि किल्लारी इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते काल बोलत
होते. यावेळी, पाण्याच्या टाक्या आणि पशू खाद्याचं वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची
माहिती जमा करण्याकरता सरकारकडून कालबद्ध नियोजन करण्यात आलं असून, या योजनेचा पात्र
शेतकऱ्यांना वर्षात तीन टप्प्यात लाभ देण्यात येणार आहे. यानुसार, या महिन्याच्या पाच
ते सव्वीस तारखांदरम्यान ही कार्यवाही पूर्ण होऊन या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या
खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
****
टंचाईग्रस्त
गावांना मदत देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही राज्याचे कृषी राज्यमंत्री
सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली आणि देगलूर उपविभागातल्या
दुष्काळी परिस्थितीचा आढावा खोत यांनी बिलोली इथे काल घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
टंचाई काळात उपाय योजनेसाठी निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा आणि विभागस्तरावर दिले असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्य सेनानी डॉ. राघवेंद्र
शाईवाले यांचं काल उस्मानाबाद जिल्ह्यात गुंजोटी इथं वृद्धापकाळानं निधन झालं, ते १०४
वर्षांचे होते. गुंजोटी परिसरात निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले शाईवाले
हे, निजामकालीन श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांना मराठवाडा चॕरीटेबल
ट्रस्टच्या "जीवन गौरव" पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
****
सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद विभागीय आयुक्त पदाचा
कार्यभार काल स्वीकारला. विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी केंद्रेकर
यांच्याकडे या पदाची सूत्रं सोपवली. केंद्रेकर यांनी याआधी औरंगाबादमध्ये सिडकोचे प्रशासक
तसंच महापालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळलेला आहे.
****
स्वच्छतेमध्ये
जागतिक स्तरावर लातूर शहराची नवी ओळख निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न
करण्याचं आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे. ते काल लातूर
इथं बोलत होते. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची त्या ठिकाणीच विल्हेवाट
लावण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, असं ते
म्हणाले.
****
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातले आरोपी आनंद तेलतुंबडे
यांच्या अटकपूर्व जामिनाची मुदत येत्या बावीस तारखेपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुंबई
उच्च न्यायालयानं काल दिला. आता तेलतुंबडे यांच्या नियमित जामीनाच्या अर्जावर बावीस
तारखेला सुनावणी होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment