Friday, 15 February 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 15.02.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 February 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००

****

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी त्याचं स्वरुप, वेळ आणि स्थळ निवडण्याची मुभा सुरक्षा दलांना देण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज उत्तरप्रदेश मधल्या बुंदेलखंड भागात संरक्षण मार्गिकेच्या पायाभारणी समारंभात बोलत होते. पुलवामा इथं काल पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यानं केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ४० जवान शहीद आणि पाच जखमी झाले आहेत. शेजारी राष्ट्राची अवस्था वाईट असून रोजच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना विविध देशांकडे भीक मागावी लागत असल्यानं, त्यातून हा हल्ला झाला असल्याची टीका पंतप्रधानांनी, पाकिस्तानचा नामोल्लेख न करता यावेळी केली. प्रत्येक भारतीय संतप्त असून, देशातील १३० कोटी जनतेला आपण केंद्रीय पोलिस दलाच्या ४० जवानांचं बलिदान वाया जाऊ देणार नसल्याची ग्वाही देतो, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

****

दरम्यान, राज्यभरात ठिकठिकाणी या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आज तुळजापूर शहरात हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचा झेंडा जाळून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध सभा आणि मोर्चे काढून तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. वसमत शहरात व्यापाऱ्यांनी निषेध मोर्चा काढून वसमत व्यापारपेठ बंद ठेवली.

उस्मानाबाद इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं दहशतवाद्यांच्या पुतळ्याचं दहन केलं. परभणी इथं विविध पक्ष संघटनांनी या हल्ल्याचा निषेध केला.

धुळे शहर आणि जिल्ह्यातही पाकिस्तान पुरस्कृत दशहतवाद्यांच्या कृत्याचा निषेध करत सर्व पक्षीय पदाधिकारी, विविध संघटनांनी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. मुंबई, पालघर, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर इथं या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला.

हल्ल्यातल्या शहिदांना आज मंत्रालयात महसूल राज्यमंत्री संजय राठोड, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या उपस्थितीत श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

****

या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार वितरण सोहळा स्थगित करण्यात आला आहे. आज पुणे इथं हा कार्यक्रम होणार होता. या सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असं सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. 

****

पुरोगामी महाराष्ट्र आणि धर्मनिरपेक्ष भारत निर्मितीसाठी माणुसकी हाच एक धर्म असे विचार मांडणारे बंजारा समाजाचे गुरु संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं, तर महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मंत्रालयात संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

राज्यात केंद्र पुरस्कृत ‘प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना’ डिसेंबर २०१८ पासून राबवण्यासाठी मान्यता देतानाच, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरीय स्वतंत्र समित्यांच्या नियुक्तीचा शासन निर्णय आज कृषी विभागातर्फे जाहीर करण्यात आला. राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समितीच्या अध्यक्षपदी मुख्य सचिव राहणार आहेत.

****

गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या पर्जन्यमानामुळे दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटीचा सुमारे एक हजार ४५४ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता राज्य शासनानं वितरित केला आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी आज ही माहिती दिली. दुसऱ्या हप्त्यात औरंगाबाद विभागाला ५२५ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. ३१ मार्चपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या सूचना संबंधित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

****

माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीसांच्या सायबर प्रकल्पाला देशपातळीवरील दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहे. केरळमधल्या कोची इथं झालेल्या दोन वेगवेगळ्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

****

परभणी जिल्ह्यातल्या सेलू शहरात प्रधानमंत्री आवास योजना तसंच रमाई घरकुल योजनेतल्या लाभार्थ्यांना नियमानुसार मोफत रेती उपलब्ध करुन देण्यात यावी या मागणीसाठी आज रिपब्लिकन सेनेचे जिल्हा संघटक सुबोध काकडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. शासनस्तरावरुन घरकुल योजनेतल्या लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करुन देण्याची घोषणा करण्यात आली होती. 

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...