Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 February
2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
सरकार देशाच्या विकासासाठी आवश्यक ती पावलं उचलत
असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तामिळनाडूमधल्या तिरुपुर इथं झालेल्या
सभेत ते आज बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात देशाच्या विकासासाठी आवश्यक असलेले अनेक
निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. आयुष्मान भारत ही जगातली सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना
असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी तिरुपुर इथं कामगार रुग्णालयाच्या कोनशिलेचं अनावरण, तसंच त्रिची विमानतळाच्या नवीन
इमारतीची पायाभरणी केली.
****
जम्मू-काश्मीर मध्ये कुलगाम जिल्ह्यातल्या देवसर
भागात आज सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार
झाले. या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच जवानांनी शोध मोहीम सुरु केली.
दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक उडाली.
****
खनिज आणि खाणकाम क्षेत्रातल्या उद्योगांना प्रोत्साहन
देण्यासोबत या क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या भरपूर संधी आणि गुंतवणुकीला चालना मिळावी, यासाठी राज्याचं नवीन सर्वंकष खनिज
धोरण तयार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
नागपूर इथं आज खनिज आणि खाणकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या
मिनकॉन कॉनक्लेव्ह- २०१९ या उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. खनिज
क्षेत्रातल्या उद्योगांना वीजदरात सवलत देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी
सांगितलं.
****
औरंगाबाद इथं आज ‘कृतिशील
शिक्षक महाराष्ट्र’ समूहाच्या वतीनं पहिलं राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन घेण्यात
आलं. सकाळी शहरात क्रांतीचौक ते महसूल प्रबोधिनी दरम्यान ग्रंथदिंडी काढण्यात आली.
संमेलनाध्यक्ष बाल साहित्यिक डॉ. विशाल तायडे यांनी यावेळी बोलतांना, शिक्षक मराठी
भाषा जपण्याचं आणि संवर्धनाचं काम करत आहेत, त्यामुळे मराठी भाषा कधीच नाश पावणार नसल्याचं
मत व्यक्त केलं. या संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, चर्चासत्र आदी कार्यक्रम
घेण्यात आले.
****
हिंगोली इथं आज अटल महाआरोग्य
शिबिर पार पडलं. या शिबिरात एक लाख रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचं शिबिर समन्वयक
रामेश्वर नाईक यांनी सांगितलं. दंतचिकित्सा आणि शस्त्रक्रियेसाठी चार मोबाईल व्हॅन
उपलब्ध करण्यात आल्या होत्या.
****
पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये
आज वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी राज्यभरातले
भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लग्नाचे औचित्य साधून शहरातून विठ्ठल रुक्मिणीची
मिरवणूक काढण्यात आली.
****
औरंगाबाद शहरात चोरी करणाऱ्या
टोळीला बुलडाणा पोलिसांनी अटक केली. गेल्या चार तारखेला या टोळीनं समर्थ नगर परिसरात
चोरी करुन पन्नास तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये रोख रक्कम चोरली होती.
या आरोपींना आज औरंगाबादच्या न्यायालयात हजर केलं असता, त्यांना १३ तारखेपर्यंत पोलिस
कोठडी सुनावण्यात आली.
****
औरंगाबाद शहरातल्या सातारा
परिसरातल्या राधामोहन प्रतिष्ठानतर्फे वसंत पंचमीनिमित्त आज दुपारी सरस्वती देवीची
सामूहिक आरती करण्यात आली. यानंतर संगीत मैफलीत अभय आणि अर्पिता कुलकर्णी यांचं गीतगायन
झालं. सायंकाळच्या सत्रात सुरेश दंडे यांचं गझलगायन, सुरेश विधाते आणि कृष्णकुमार विधाते
यांचं व्हायोलिन वादन आणि शरद दांडगे यांचं तबलावादन होणार आहे.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान
हॅमिल्टन इथं झालेला तिसरा आणि शेवटचा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना न्यूझीलंडनं चार धावांनी
जिंकला. या विजयाबरोबरच न्यूझीलंडनं तीन सामन्यांची मालिकाही दोन - शून्यनं जिंकली
आहे. आज अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करत भारतीय संघासमोर २१३ धावांचं
लक्ष्य ठेवलं होतं. मात्र भारतीय संघ निर्धारित षटकात सहा गडी गमावत २०८ धावाच करू
शकला.
//***********//
No comments:
Post a Comment