Sunday, 21 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.07.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जुलै २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  अनुवांशिक आजारांच्या निर्मुलनासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन करावं - केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांचं आवाहन
Ø  भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विधानांतून जनतेच्या मनात आमदारांबाबत संभ्रम - अजित पवार यांचा आरोप
Ø  काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार
Ø  जीएम अर्थात जनुक सुधारित अन्नधान्य अपायकारक नाही - कृषी तज्ज्ञ अजीत नरदे यांचा निर्वाळा
आणि
Ø  पी व्ही सिंधूची इंडोनशिया खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक
****

 अनुवंशिक आजारांच्या निर्मुलनासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन करावं, असं आवाहन केंद्रीय आरोग्य तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी केलं आहे. ते काल हैदराबाद इथं, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या प्रयोगशाळेतल्या शास्त्रज्ञांशी बोलत होते. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सर्वांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी देशभरात दीड लाख आरोग्य केंद्र सुरू करणार असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं. यापैकी वीस हजार केंद्रांचं काम या वर्षअखेरपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली.
****

 राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काल मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. पक्षाचे खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख तसंच निवडणूक समितीशी नड्डा यांनी विविध विषयांवर चर्चा केली. आज मुंबईत गोरेगाव इथं, ते भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
****

 राज्याला दुग्ध आणि मत्स्यव्यवसायात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची इच्छाशक्ती वाढवा असे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिले आहेत. काकोल्हापूर इथं पशुवैद्यकीय दवाखान्यांना जानकर यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात दररोज मोठ्या प्रमाणावर अंडी, दूध आणि मत्स्यबीजाची गुजरात, तेलंगणा, कर्नाटक राज्यांमधून आयात होते, त्यामुळे महाराष्ट्र याबाबतीत स्वयंपूर्ण होणं आवश्यक असल्याचं जानकर म्हणाले
****

 अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल प्रारंभ करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातल्या कसारा या गावातून या राज्यस्तरीय लसीकरणाला प्रारंभ झाला. राज्यातल्या एक वर्षापर्यंतच्या सुमारे २० लाख बालकांना दरवर्षी मोफत लस देण्यात येणार असून राज्य शासनाच्या नियमीत लसीकरणात त्याचा समावेश करण्यात आल्याचं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचं उद्घाटनही आरोग्यमंत्र्यांनी केलं.
****

 सायबर गुन्ह्यांच्या तपासामध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं, राज्य सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी म्हटलं आहे. महिला आणि बालकांसंबंधीच्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी सुरू केलेल्या सीसीपीडब्ल्यूसी या संकेतस्थळासंबंधी काल मुंबईत आयोजित कार्यशाळेत ते काल बोलत होते. वाढत्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे सायबर गुन्हे वाढत असून या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर यंत्रणा सज्ज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****

 भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानांतून जनतेच्या मनात आपल्या आमदारांबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी केला आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही आमदार पुढच्या काही दिवसांत भाजपात येणार असल्याचं विधान पाटील यांनी केलं होतं. पाटील यांनी असं संभ्रमाचं वातावरण निर्माण करू नये, असं आवाहन पवार यांनी केलं.
****

 दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री तसंच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहेत. दीक्षित यांचं काल नवी दिल्लीत हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. १९८४ मध्ये उत्तर प्रदेशमधल्या कन्नौजमधून खासदार म्हणून निवडून आलेल्या शीला दीक्षित यांनी १९९८ ते २०१३ अशी सलग १५ वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्या सध्या दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, यांच्यासह राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शीला दीक्षित यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. एक कुशल, सहृदयी आणि परिपक्व राजकीय व्यक्तिमत्त्व आपण गमावलं असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****

 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, निर्मला पुरंदरे यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं, त्या ८६ वर्षांच्या होत्या. वनस्थळी संस्थेच्या संस्थापक असलेल्या पुरंदरे यांनी, या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागतल्या महिलांच्या सबलीकरणासाठी भरीव काम केलं. विद्यार्थी समितीच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात सुमारे अडीचशे बालवाड्या सुरु केल्या, तर  अकरा हजारहून अधिक बालवाडी शिक्षकांना प्रशिक्षण दिलं. सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी त्यांना पुण्यभूषण, आदिशक्ति, सावित्रीबाई पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या त्या पत्नी होत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 जीएम अर्थात जनुक सुधारित अन्नधान्य आरोग्याला अपायकारक नसल्याचं शेती प्रश्नाचे अभ्यासक, अजीत नरदे यांनी स्पष्ट केलं आहे. शेतकरी संघटनेचे दिवंगत कार्यकर्ते हेमंत देशमुख यांच्या १७ व्या स्मृती दिनानिमित्त काल औरंगाबाद इथं आयोजित व्याख्यानात बोलत होते. या तंत्रज्ञानात शेतीमधला समतोल साधण्याची ताकद असून कमी पर्जन्यमान असलेल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचंही नरदे यांनी नमूद केलं. जीएम तंत्रज्ञानामुळे कीटकनाशकांचा खप घटला असून उत्पादन खर्च कमी झाला आहे. 

 दरम्यान, औरंगाबाद इथल्या देवगिरी महाविद्यालयात आज जीएम अन्नधान्या संदर्भात ‘शेती - झिरो बजेट’ ची की ‘बी.टी.ची’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत होणाऱ्या या परिसंवादात कृषी शास्त्रज्ञ आणि शेती विषयाचे अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत.
****

 भारताची बॅटमिंटनपटू पी व्ही सिंधूनं इंडोनशिया खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सिंधूनं चीनच्या चेन यू फई हिचा २१-१९, २१-१० असा पराभव केला. आज या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूची जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी लढत होणार आहे.
****

 पंतप्रधान पीक विमा योजनेत विमा हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा आज रविवारी देखील सुरू राहणार आहेत. पीकविमा भरण्याची अंतिम तारीख २४ जुलै असून शेतकऱ्यांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता रविवारी सर्व शाखा फक्त पीक विमा भरण्यासाठी खुल्या ठेवण्याचा निर्णय बँकेच्या व्यवस्थापनानं घेतला आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीनं करण्यात आलं आहे.
****

 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आला असून  विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी असे अभ्यासक्रम तयार करण्यात आले असल्याचं कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी सांगितलं आहे. कुलगुरूंनी काल हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर येथील नारायणराव वाघमारे महाविद्यालयाला अचानक भेट देऊन महाविद्यालयाची पाहणी केली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
****

 बीड जिल्हयात गेवराई इथं काल रस्ता अपघातात तीन युवक ठार झाले. सैन्यभरतीसाठी सराव करणाऱ्या या तरुणांना अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. तळेवाडी फाटा इथं, महामार्ग पोलिस चौकीसमोर हा अपघात झाला.
****

 औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतल्या इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांवर व्यावसायिक करापेक्षा पाच पट कर आकारण्यात येणार आहे. महाराष्ट्र इंग्रजी शाळा संघटना - मेस्टाचा या कर आकारणीला तीव्र विरोध असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत दिली. शहरात सुमारे शंभर अनधिकृत इंग्रजी शाळांवर कारवाईची मागणीही त्यांनी यावेळी केली.
****

 मराठवाडा साहित्य परिषेदचे विविध ग्रंथपुरस्कार आज प्रसिध्द समीक्षक डॉ.वसंत पाटणकर यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. औरंगाबाद इथं परिषदेच्या डॉ.ना.गो नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****

२०१६-१७ या वर्षासाठीचे राष्ट्रीय युवा पुरस्कार काल जाहीर झाले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या ओंकार नौलिहाळकर आणि नाशिक जिल्ह्यातल्या कळवण इथल्या विनीत मालपुरे या तरुणांची यंदाच्या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. येत्या १२ ऑगस्ट रोजी या पुरस्कारांचं वितरण होईल. ४० हजार रूपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****

 लातूर जिल्ह्यातल्या आष्टा ते उदगीर आणि टेंभुर्णी लातूर या राष्ट्रीय महामार्गाचं काम लवकरात लवकर सुरु करावं अशी मागणी लातूरचे खासदार सुधाकर श्रुंगारे यांनी लोकसभेत केली आहे. केंद्र सरकारकनं या कामाच्या नुतनीकरणास मंजुरी दिलेली आहे.
****

 हज यात्रेसाठी औरंगाबादहून १६० यात्रेकरु आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास रवाना होणार आहेत. चाळीस दिवसांच्या यात्रेसाठी जाणाऱ्या या सर्वांना काल ओळखपत्र, ई-ब्रेसलेट, टोकन नंबर देण्यात आले.
*****
***

No comments: