Wednesday, 7 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.08.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर एनईएफटीची सुविधा आता चोवीस तास चालू ठेवण्याचा निर्णय रिजर्व्ह बँकेनं जाहीर केला. या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून या निर्णयावर अंमलबजावणी होणार आहे. रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकेचे पतधोरण आढावा आज जाहीर केला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सध्या ही सुविधा कामकाजाच्या दिवसांत सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उपलब्ध असते. भारतीय रिजर्व्ह बँक आरबीआयने रेपो दरात शून्य पूर्णांक ३५ शतांश टक्क्यांनी कपात केली आहे. या निर्णयानंतर रेपो दर पाच पूर्णांक चाळीस शतांश टक्के तर, रिव्हर्स रेपो दर पाच पूर्णांक पंधरा शतांश टक्के इतका झाला आहे. आज जाहीर झालेल्या पतधोरणात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर आधीच्या ७ टक्क्यावरुन खाली आणत सहा पूर्णांक नऊ दशांश टक्के, तर ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवटयाचा दर ३ पूर्णांक एक दशांश टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. समितीची बैठक येत्या १ ऑक्टोबरला होणार आहे.
****
दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या पार्थिव देहावर आज दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनी स्वराज यांना अखेरचा निरोप दिला. त्यापूर्वी स्वराज यांचा पार्थिव देह भाजप मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. हजारोंच्या संख्येत नागरिकांनी स्वराज यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सुषमा स्वराज यांचं काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं, त्या ६७ वर्षांच्या होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, स्वराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, युवा सेना नेते आदित्य ठाकरे, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वराज यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे
****
संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या दोन्ही योजनांतर्गत आता दरमहा एक हजार रुपये निर्वाहवेतन मिळेल. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाच्या अंमलबजावणीला मान्यता देण्यात आली.

या दोन्ही योजनेत लाभ घेणाऱ्या विधवा लाभार्थ्यांना एक अपत्य असल्यास दरमहा अकराशे रुपये तर दोन अपत्यं असल्यास दरमहा बाराशे रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. राज्यातल्या  ३२ लाख लाभार्थ्यांना या वाढीव अर्थसहाय्याचा लाभ मिळणार असून, राज्यशासनावर वार्षिक एक हजार ६४७ कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
****
राज्यात कोल्हापूर सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. बचावकार्यावर देखरेख ठेवण्यासाठी, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसंच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कोल्हापूर इथं दाखल झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जिल्ह्यातली पूरपरिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबई गोवा महामार्गावर आलेलं पाणी ओसरलं आहे.

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यानं, उजनी धरण जवळपास शंभर टक्के भरलं आहे. धरणातून सध्या दीड लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं भीमा नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे.

पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या सुमारे एक लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून,  धरणातला पाणीसाठा साठ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मराठवाड्यात विविध भागात तुरळक पाऊस सुरू आहे. औरंगाबाद शहर परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जालना जिल्ह्यातही सकाळपासून तुरळक पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेनं आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सोयीसुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी दिले आहेत. आज मुंबईत झालेल्या बैठकीत सागर यांनी हे आदेश दिले. आरोग्य केंद्रात रिक्त असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या जागा भरण्यासाठी महापालिकेने शासनाकडे पंधरा दिवसात प्रस्ताव द्यावा, त्यास तत्काळ मान्यता देण्यात येईल, असं सागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. या संदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता.
****
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक आणि स्टायपेंड - विद्यावेतनाच्या मुद्दयावरून पुकारलेल्या या संपात तीनशे पस्तीस डॉक्टर सहभागी झाले आहेत.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 17 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...